छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
गेट टुगेदरची आवश्यकता व उपयुक्तता
सध्या ‘गेट टुगेदर हा परवलीचा शब्द झाला आहे. पूर्वी फक्त तरुण तरुणी यांचे गेट टुगेदर होत असत. घरच्या जबाबदाऱ्या, आर्थिक परिस्थिती, शारीरिक अथवा मानसिक कारणांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक अशी ‘गेट टुगेदर' आयोजित करत नसत.
पूर्वी लग्न, मुंजी इत्यादी कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने अनेक नातेवाईक एकत्र येत असत. सध्या हे सोहळे कमी झाले आहेत. आणि जे होतात ते अतिभव्य प्रमाणात अथवा अगदी जवळच्या नातेवाईकांपुरते मय्राादित असतात.
कुटुंब म्हणजे एकमेकांशी नाते असलेल्या माणसांचा समूह. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे तसेच कुटुंबनियोजनामुळे अनेक कुटुंबात एक अपत्य दिसून येत आहे. त्यामुळे नातेवाईकांची संख्या घटली आहे. रक्ताची नाती जन्माने मिळतात. मानलेली नाती मनाने जुळतात; पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात त्या रेशमी बंधनांना ‘मैत्री' म्हणतात. ‘मैत्री' नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव. मैत्रीच भरून काढते आयुष्यातील प्रत्येक नात्यांची उणीव, असे म्हणतात ते खरे आहे.
साधारणपणे गेल्या पन्नास वर्षाचा विचार केला तर मित्र मैत्रिणींचे ‘गेट टुगेदर' आयोजन करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्याचे कारण म्हणजे आर्थिक नियोजन, छोटे कुटुंब यामुळे मुलांची लग्नं झाली की अनेक कुटुंबात फक्त आई, वडील असतात. त्यापैकी अनेकजण निवृत्त झालेले असून त्यांना पेन्शन मिळते. तसेच ज्येष्ठ नागरिक संघ इत्यादी संघटना यांच्या माध्यमातून विविध उपक्रमात सहभागी होण्याची संधी असल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक ‘गेट टुगेदर' आयोजित करतात.
माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर
तसा विचार केला तर प्रत्येकाला अनेक मित्र असतात. पण पाचवीपासून दहावीपर्यंत जे एकत्र असतात त्यांचे ‘गेट टुगेदर' झाले तर त्याची रंगत काही वेगळीच असते असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे विशेषतः मुबंई-पुणे परिसरातील अनेक माजी विद्यार्थी समाज माध्यमामुळे एकत्र होऊ लागले आहेत. राजकारणी व्यक्तींना १९७५ साल वेगळ्या कारणासाठी लक्षात असले तरी ह्याच वर्षी १०+ २ +३ हा अभ्यासक्रम १९७५ साली सुरु झाला. त्याची आठवण ठेऊन ह्या वर्षी ज्यांनी अभ्यासक्रमाचा महत्वाचा टप्पा पूर्ण केला अशा महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी सुवर्ण महोत्सव वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला. १९७५ ह्याच वर्षी जुन्या अभ्यासक्रमाची (अकरावी मॅट्रिक) शेवटची बॅच होती. त्यांनीसुद्धा असा समारंभ केला. आता दरवर्षी प्रत्येक बॅच असे कार्यक्रम आयोजित करणार आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण व स्वरूप
आपले माजी विदयार्थी कोठे राहतात याचा विचार करून ठिकाण ठरवावे. प्रवासापेक्षा सर्वांचा सहवास जास्त लाभावा असा उद्देश ठेवून खाण्याचा व प्रवासाचा खर्च लक्षात घेऊन ठिकाण ठरवावे. शक्य असेल तर दोन दिवसाचा कार्यक्रम ठरवावा. त्यामुळे खर्च थोडा जास्त होत असला तरी करमणूकीचे कार्यक्रम, गप्पा टप्पा यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. जर कां सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत असलो तर त्यानिमित्ताने ‘स्मरणिका प्रकाशित करावी.त्यात दहावीत असलेल्या विद्यार्थी/विद्यार्थिनी तसेच शिकवायला असलेल्या शिक्षकांची नांवे समाविष्ट करावीत.जे विद्यार्थी/विद्यार्थिनींचे निधन झाले असेल त्यांची माहिती द्यावी. इतरांचा फोटोसह अल्परिचय द्यावा. आपल्या ग्रुपमधील कथा, कविता, लेख यांचा समावेश करावा. हा उपक्रम खर्चिक असल्याने यासाठी आपल्या वर्गातील ज्यांचे व्यवसाय असतील त्यांनी सढळ हस्ते देणगी देऊन आपल्या व्यवसायाची जाहिरात करावी.
हा उपक्रम भव्य प्रमाणात करायचा असेल तर त्याचे नियोजन कमीत कमी सहा महिने आधी करावे लागेल. त्यासाठी १ - स्मरणिका समिती २- कार्यक्रम नियोजन समिती ३ - अर्थ समिती ४ - सांस्कृतिक समिती आणि सर्व समित्यांवर अंकुश ठेवणारी सर्वात महत्वाची पाचवी ‘सुकाणू समिती' स्थापन करावी. शक्य असेल तर ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत मिळत असल्याने त्या सवलतीचा लाभ घ्यावा.
गेट टुगेदर साठी योग्य ठिकाणे
रायगड जिल्हा मुंबई पुण्यापासून जवळ असल्याने व अलिबाग, पनवेल, खोपोली, कर्जत या परिसरात मोठया प्रमाणात फार्म हाऊस असल्याने निसर्गरम्य ठिकाणी ‘गेट टुगेदर' साजरे केले तर अविस्मरणीय ठरेल यात शंकाच नाही. -दिलीप प्रभाकर गडकरी