वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
करटोली रानभाजीला महिलांची पसंती
आदिवासी महिलांना पावसाळी रानभाजी विक्रीतून आर्थिक कमाई
उरण : पावसाळा सुरु झाल्यानंतर सर्वसामान्यांना रानभाज्यांचे वेध लागतात. गेल्या काही दिवसात कोकणात पडणाऱ्या संततधार पावसामुळे रानावनात पिकणाऱ्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये विक्रीसाठी येत आहेत. या रानभाज्यांना ग्राहकांची पसंती असून, मागणी देखील वाढत आहे. पावसाळी रानभाजी मध्ये करटोली भाजीला महिलांची प्रथम पसंती असून, करटोली भाजी २०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.
पावसाच्या सुरुवातीलाच रानभाजी शेवळ तयार झाली असून, नंतर रानावनातील झाडाझुडपात आढळणारे रानातील फळ भाजी म्हणजेच करटोली. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात करटोली भाजी विक्रीसाठी उरण बाजारपेठेत येत असून, यावर्षी करटोली भाजीला प्रतिकिलो २०० रुपये एवढा भाव मिळत आहे. आयुर्वेदानुसार आरोग्यासाठी उत्तम असलेली करटोली भाजी सुरुवातीच्या पावसात मिळत असल्याने या भाजीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. खाण्यासाठी चविष्ट आणि रुचकर असलेली करटोली रानभाजीला गृहिणींचीही मोठ्या प्रमाणात पसंती असते. उरण तालुक्यातील आदिवासी महिलांना पावसाळी रानभाजी विक्रीतून चांगली कमाई होत आहे .
उरण बाजारातील राजपाल नाका, गांधी चौक, आनंद नगर आदि ठिकाणी करटोली भाजी विकावयास येत असून, खवय्ये करटोली भाजी आवडीने विकत घेत आहेत.
वेल उगवल्यानंतर साधारणतः महिनाभरात करटोली वेळीला फळे येतात. करटोली फळभाजी खाण्यासाठी अत्यंत रुचकर असल्याने ग्राहकांची या भाजीला चांगली मागणी आहे. यावर्षी दोनशे रुपये प्रति किलो दराने करटोली भाजीची विक्री केली जात आहे. झाडाझुडपात वाढत असणारी करटोली रानभाजी आहे. करटोली भाजी विक्रीतून चांगली आर्थिक कमाई होत असून, रोजगार मिळत आहे. - सौ.नंदिनी प्रशांत म्हात्रे, भाजी विक्रेती -कावाडे, अलिबाग.
पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्या खाण्यासाठी अत्यंत चविष्ट आणि रुचकर असतात. करटोली भाजी तर आरोग्यासाठी अत्यत गुणकारी आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला काही दिवसच करटोली भाजी मिळत असल्याने आवर्जुन करटोली भाजी खरेदी करतो. - सौ. रजनी मानापुरे, पाल्याची वाडी - केगाव, उरण.