मुसळधार पावसाने पनवेल तालुक्याला झोडपले

नवीन पनवेल : ७ जुलै रोजी पहाटेपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेक नागरिकांना बसला आहे. पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. तर काहींनी घरात बसणे पसंत केले. पनवेल महापालिका हद्दीतील पडघे गावात एक रिक्षा पावसाच्या पाण्यात वाहून गेली. सुदैवाने या रिक्षामध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

७ जुलै रोजी पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. पडघे गावातील छोट्याशा ब्रिजवर उभी ठेवण्यात आलेली रिक्षा या पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेली. मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील मोरबे गावातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. मोरबे गावाजवळ काही किलोमीटर अंतरावर धरण आहे. या धरणातील पाणी जास्त प्रमाणात बाहेर आल्याने आणि मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सदरची परिस्थिती ओढवली असल्याचे नागरिकांनी सांगितले. रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक देखील बंद करण्यात आली होती. काही वाहने देखील या पाण्यात अडकली.

हरिग्राम गावातील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. केवाळे मध्ये नवीन बांधकाम सुरू असल्याने त्याचा फटका हरिग्राम गावाला बसत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.  सतत पडणाऱ्या पावसामुळे गाढी नदीला अचानक पाणी आले. नद्या दुथडी भरुन वाहत होत्या. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. ७ जुलै रोजी दुपारनंतर पाऊस कमी झाल्याने नद्यांचे देखील पाणी कमी झाले. तसेच रस्त्यांवर आलेले पाणी निघून गेले. चिपळे येथील धोकादायक पुलावरुन वाहतूक सुरू आहे. या पुलाच्या खाली पावसाचे पाणी लागले होते.

३५ ते ४० घरांमध्ये पाणी...

मुसळधार पावसामुळे भोकरपाडा गावात जाण्या-येण्यासाठी असलेल्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे गावात जाण्या-येण्यास समस्या निर्माण झाली होती. धो धो कोसळत असलेल्या पावसामुळे येथील स्वप्ननगरी चाळीतील जवळपास ३५ ते ४० घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले.

पनवेल तालुक्यातील चिपळे जवळील भोकरपाडा गावात स्वप्ननगरी चाळ आहे. ७ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे या चाळीतील अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे घरातील वस्तूंचे नुकसान झाले.

महापालिकेची नाले सफाई की हात की सफाई - महेश गुरव

७ जुलै रोजी बरसलेल्या मुसळधार पावसामुळे कळंबोलीकरांची तारांबळ उडाली. विविध भागात पाणीच पाणी झाले. या तुंबलेल्या पाण्याचा नागरिकांना मोठा त्रास  झाला. कळंबोली विभाग पाण्याखाली गेल्यामुळे महापालिकेकडून करण्यात आलेल्या नालेसफाईचा पुरता फज्जा उडाला. महापालिकेकडून करण्यात आलेली नालेसफाई हातसफाई आणि दिखावी असून ती नालेसफाई नसून तिजोरीवर मारलेला डल्ला असल्याचे आरोप शिवसेना कळंबोली विभागप्रमुख महेश गुरव यांनी केला आहे. पनवेल महापालिकेची या वर्षी पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई दिखावा असल्याने कळंबोली शहर पाण्याखाली जावून नागरिकांचे नुकसान झाले आहे.

‘सिडको'च्या वसाहती पनवेल महापालिकेकडे  हस्तांतरीत करण्यात आल्याने येथील नालेसफाई महापालिकेकडून करण्यात आली. त्यामुळे कळंबोली रहिवाशांनी शहरात पाणी साचणार नाही, याबाबत काही प्रमाणात सुटकेचा निःश्वास टाकला होता. पण, पनवेल महापालिका ‘सिडको'चा बाप निघाली. हात सफाई केलेल्या नालेसफाईने कळंबोली शहरात पाणीच पाणी साचल्याने नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. केएल-४, सुधागड हायस्वुÀल, सेंट जोसेफ स्वुÀल, स्टेट बँक परिसर, कारमेल हायस्वुÀल, करावली नाका, एल.आय.जी. भागात पाणी कमरेच्या वर भरल्याने तळमजल्यावरील घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. गाड्याही पाणी खाली गेल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे

आदई पाण्याखाली, अनेक घरात शिरले पाणी...

आदई गाव पहिल्याच झालेल्या मुसळधार पावसात पाण्याखाली गेले. आदई गावात अनेक इमारतींची कामे सुरु आहेत. इमारती बांधताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याचा फटका नागरिकांना बसत असल्याचे नागरिक बोलत आहेत.

पहिल्याच पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. अनेक ठिकानी पाणी साचलेले आहे. आदई येथील काही ठिकाणच्या रस्त्यावर गुडघ्याच्या वर पाणी साचल्याने गाड्या अर्ध्या पाण्याखाली गेल्या. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पहिल्याच मुसळधार पावसात अशी अवस्था आहे. त्यामुळे संपूर्ण पावसाळा पाण्याखाली काढावा लागण्याची भिती व्यक्त केली जात आहे. एकंदरीत यंदचा पावसाळा आदईकरांसाठी आव्हानात्मक असणार, ते निश्चित आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘एनडीआरएफ'तर्फे नमुंमपा कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे