वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
सफाई अपनाओ, बिमारी भगाओ अभियान
पनवेल : आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात १ जुलै ते ३१ ऑगस्ट दरम्यान स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० अंतर्गत ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ' अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत गेल्या २ दिवसांमध्ये चारही प्रभाग समितीमध्ये विशेष स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात आले. सदर मोहिमांमध्ये महापालिकेच्या स्वच्छता दूतांबरोबरच नागरिकांनी देखील मोठा सहभाग नोंदविला.
केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ‘सफाई आपनाओ, बिमारी भगाओ' अभियानांतर्गत पहिल्या आठवड्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम आयोजित करण्याविषयी सूचित करण्यात आले होते. त्यानुसार उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सुचनेनुसार प्रभाग समिती-ब अंतर्गत रोडपाली येथे जय महाराष्ट्र रिक्षा नाका आणि बस स्टॉप येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये प्रभाग क्रमांक-७ चे स्वच्छता दुत, ‘जय महाराष्ट्र रिक्षा नाका'चे सर्व रिक्षावाले तसेच ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला.
याबरोबर प्रभाग समिती-ड पनवेल विभागामध्ये पनवेल बस स्थानक येथे ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ' स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी बस स्थानकांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग नोंदविला. तसेच पनवेल रेल्वे स्टेशन, प्रभाग समिती-अ मध्ये खारघर रेल्वे स्टेशन आणि एनएमएमटी बस पार्किंग खांदा कॉलनी येथे विशेष  स्वच्छता मोहीम घेण्यात आली.
कळंबोली येथील मनसे मैदान परिसर येथेही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहीम अंतर्गत प्रभाग क्र.१६ चे स्वच्छता दूत आणि जेट मशीनच्या सहाय्याने मनसे मैदान शेजारील सेक्टर-३, नवीन पनवेल शौचालय आतील आणि शौचालय परिसरात साफसफाई करण्यात आली. सदर ठिकाणी प्रभाग समिती-क, कामोठे विभागामध्ये प्रभाग क्रमांक-१२ येथील स्वच्छता दुत यांच्या मार्फत खांदेश्वर स्टेशन(ट्रान्सपोर्ट हब) येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सदर ‘विशेष स्वच्छता अभियान'मध्ये घनकचरा आणि स्वच्छता विभागाचे विभाग प्रमुख अनिल कोकरे, मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, शौचालय अधीक्षक भावेश चंदने, चारही प्रभागातील सर्व स्वच्छता निरीक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, यापुढेही सातत्याने स्वच्छता मोहिमेचे काम सुरुच राहणार आहे. तसेच या अभियानांतर्गत आठवडानिहाय विविध उपक्रम घेण्यात येणार आहे.