छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
महापालिका जलवाहिन्यांनी अडवली पादचाऱ्यांची वाट
वाशी : सीबीडी-बेलापूर येथे आग्रोळी गावानजिक नवी मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या जलवाहिनीचे सुटे भाग पदपथावर धोकादायक परिस्थितीत ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे येथील पादचाऱ्यांची वाट अडली असून, वाहन चालकांना देखील धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे सदर जलवाहिनीचे सुटे भाग हटवून पदपथ मोकळा करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरु लागली आहे.
नवी मुंबई शहरात महापालिका तर्फे काही ठिकाणी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. पावसाळा दरम्यान कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे जलवाहिनी टाकण्याच्या कामाला खो लागला आहे. त्यामुळे या कामासाठी आणलेले जलवाहिन्यांचे सुट्टे भाग नवी मुंबई शहरातील पदपथांवर पसरुन ठेवण्यात आले आहेत. सीबीडी-बेलापूर येथील आग्रोळी गावानजिक सिडको अर्बन हार्ट येथील पदपथावर जलवाहिन्यांचे सुट्टे भाग ठेवण्यात आले आहेत. सीबीडी मधील सिडको अर्बन हार्ट येथील सदर मुख्य रस्ता असून, या ठिकाणी पोलीस मुख्यालय, सिडको भवन आणि कोकण भवन कार्यालय आहे. तसेच येथील रस्ता सायन-पनवेल महामार्गाला जोडला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते. याशिवाय नागरिकांची देखील ये-जा असते. त्यातच येथील पदपथावर जलवाहिन्या ठेवल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालावे लागत आहे. पावसाळ्यात ठेवण्यात आलेले जलवाहिन्यांचे सुटे भाग खाली घसरुन रस्त्यावर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पदपथावरील जलवाहिन्यांचे सुटे भाग तात्काळ हटवावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
नवी मुंबई महापालिका तर्फे फेरीवाल्यांनी पदपथावर अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. मात्र, दुसरीकडे महापालिकेनेच पाईप पदपथावर ठेवले असल्याने महापालिकेवर कारवाई कोण करणार?. सामान्य माणसाला एक न्याय आणि महापालिकेच्या विभागाला एक न्याय का?. पदपथावरील पाईपमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. - सुधीर दाणी, नागरिक - सीबीडी-बेलापूर.