छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
विद्युत वाहक तारांची, पोलची वेळेत देखभाल-दुरुस्ती करा
उरण : ‘महावितरण'कडून विद्युत वाहक तारांची आणि पोलची वेळच्या वेळी देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने उरण तालुक्यातील रहिवाशांना करण्यात येत असलेला विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
उरण शहर, तालुक्यातील ३५ ग्रामपंचायत हद्दीतील गावे तसेच छोटे-मोठे व्यावसायिक यांना ‘महावितरण'च्या माध्यमातून विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, स्थानिक ग्रामस्थ ,ग्रामपंचायत यांच्याकडून मागणी करुन देखील या भागातील जीर्ण झालेल्या विद्युत वाहक तारांची आणि लोखंडी पोलची वेळच्या वेळी देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. त्यातच ‘महावितरण'च्या दुर्लक्षितपणामुळे विद्युत वाहक तारा अंगावर पडून मुक्या प्राण्यांबरोबर रहिवाशांना देखील आपले प्राण गमवावे लागले आहे.
त्यामुळे ‘महावितरण'च्या अभियंत्यांनी उरण तालुक्यातील जीर्ण झालेल्या विद्युत वाहक तारा आणि सडलेले लोखंडी पोलच्या देखभाल-दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावी, अशी मागणी धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी केली आहे.