छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
स्फोटाने हादरली डोंबिवली
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी मधील कंपनीत स्फोट झाला आहे. एमआयडीसी फेज-२ मधील केमिकल्स कंपनीमध्ये २३ मे रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. सदरचा स्फोट मोठा जबरदस्त असल्याने परिसरातील इमारतींच्या काचा देखील फुटल्या. स्फोटाचे २ ते ३ आवाज ऐकू आले, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या स्फोटानंतर धुराचे मोठे लोट परिसरात दिसत आहेत. त्यावरुन सदरची आग मोठी असल्याचा अंदाज आहे. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. घटनास्थळी तातडीने बचाव कार्य हाती घेतले आहे. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या स्फोटानंतर आजुबाजुच्या काही कंपन्यांना देखील आग लागल्याचे वृत्त आहे. शिवाय या परिसरातील वाहनांचे देखील स्फोटात मोठे नुकसान झाले आहे.
२३ मे रोजी अंबर केमिकल्स कंपनीत झालेल्या स्फोटाने अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. या स्फोटाचा वेळी अनेक इमारतींना मोठे हादरे बसले. एमआयडीसी फेज-२ मधील म्हात्रे पाडा, रिजेंसी इस्टेट, एमआयडीसी निवासी, सोनार पाडा, आदि भागात नुकसान झाले आहे. या भागात काही लोखंडी भागांचे अवशेष पडले आहेत.
स्फोट झालेल्या परिसरातील नागरिक भयभयीत झाले असून अशा प्रकारच्या दुर्घटना काही महिन्यांच्या अंतराने वारंवार होत असल्याने या परिसरात असणाऱ्या विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, ‘डोंबिवली एमआयडीसी'मधील अती धोकादायक कंपन्या त्वरित येथून हलविण्यात याव्यात, अशी येथील जनतेची मागणी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले.
डोंबिवली मध्ये प्रोबेसच्या स्फोटाची पुन्हा पुनरावृत्ती...
१६ मे २०१६ रोजी डोंबिवली मधील प्रोबेस कंपनीत स्फोट होऊन १२ जणांचा मृत्यू तर २०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेमध्ये नागरिकांच्या करोडो रुपयांचे मालमत्तेचे नुकसान झाले होते. यानंतर २३ मे रोजी त्याच घटनेची पुनरावृत्ती डोंबिवली एमआयडीसी फेज-२ मधील अंबर केमिकल्स मध्ये स्फोट होवून झाली आहे. दरम्यान, प्रोबेस कंपनीतील स्फोटाची चौकशी समिती नेमली होती. पण, या ‘चौकशी समिती'चा अहवाल जनतेसमोर आणण्यात आलाच नाही. परिणामी, त्या अहवालातील सुचनांची अंमलबजावणी करण्यात आली नाही.
आता पुन्हा तेच होणार, चौकशी समिती नेमली जाणार. प्रोबेस स्फोटातील नुकसान झालेल्या मालमत्ता धारकांना आणि काही जखमी होऊन जायबंदी झाले होते, त्यांनाही अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही.