संध्याकाळपासून पहाटे 5 पर्यंत धडक कारवाई

नवी मुंबई : 13 मे रोजी सायं. 4 नंतर आकस्मिक वादळ व पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने तसेच या कालावधीत मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना लक्षात घेत राज्य शासनाच्या आदेशाच्या पार्शवभूमीवर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी 14 मे रोजी दूरदृश्य प्रणालीव्दारे तातडीने बैठक घेतली.

या बैठकीत आयुक्तांनी नमुंमपा क्षेत्रात ठिकठिकाणच्या होर्डिंग स्वरुपातील जाहिरात फलकांचे संरचनात्मक परीक्षण (Structural Audit) करण्याच्या यापूर्वीच 30 एप्रिल रोजी दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी झाली असल्याची खातरजमा करुन घ्यावी आणि अनधिकृत होर्डींग हटविण्याची कार्यवाही सुरू करावी, असे स्पष्ट निर्देश दिले होते. त्याचप्रमाणेसिडको, एमआयडीसी, रेल्वे, सायन पनवेल महामार्ग अशा ठिकाणी असलेल्या होर्डींगबाबतही संरचनात्मक परीक्षण करून घेणेबाबत सूचित केले होते.

त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागाने लगेचच तत्पर कार्यवाही सुरू करून परवाना विभागाकडून परवानाधारक होर्डींगची माहिती प्राप्त करून घेत अनधिकृत होर्डींग हटविण्याच्या कार्यवाहीला तत्परतेने सुरूवात केली.

अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्वच विभागांमध्ये तेथील विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त यांचे समक्ष तोडक कार्यवाहीस सुरूवात करण्यात आली. 15 एप्रिल रोजी सायं. 5 वाजल्यापासून 16 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत अनधिकृत होर्डींग विरोधातील धडक कारवाईत आकाराने मोठे होर्डींग स्वरूपातील 15 अनधिकृत जाहिरात फलक अविश्रांत काम करून हटविण्यात आले.

यामध्ये बेलापूर स्टेशन लगत तसेच बेलापूर अग्निशमन केंद्राच्या बाजूला सार्वजनिक शौचालयाच्या जवळ पदपथावर असलेल्या अशा 2 ठिकाणच्या मोठ्या होर्डींग निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे सेक्टर 1 शिरवणे येथे प्लॉट क्र. 43 वर असलेले 3 मोठे अनधिकृत होर्डींगही हटविण्यात आले.

वाशीगाव मधील कृष्णा रेस्टॉरंट जवळ विनापरवानगी उभारण्यात आलेले 2 मोठे होर्डींग तसेच तुर्भे विभागात सानपाडा स्टेशनच्या पूर्व भागात असलेल्या 4 अनधिकृत होर्डींगवर तोडक कारवाई करण्यात आली. घणसोली विभागात एमआयडीसी भागात गवळीदेव स्थळाच्या पुढे सेंट्रल रोडवर असलेली दिशादर्शक कमानीची लोखंडी फ्रेम होर्डींग काढण्यात आले.

ऐरोली विभागात सेक्टर 3 बसडेपो मधील 1 अनधिकृत होर्डींग तसेच दिघा येथे हॉटेल मुंबई एक्सप्रेसच्या समोरील 2 मोठे अनधिकृत होर्डींग निष्कासित करण्यात आले.

अशाप्रकारे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागामार्फत 15 एप्रिल रोजी संध्याकाळपासून पहाटे 5 वाजेपर्यंत अनधिकृत होर्डींग हटविण्याची धडक कारवाई करण्यात आली. आजही ठाणे बेलापूर रोडवर कोपरखैरणे विभागात अनधिकृत मोठे होर्डींग हटविण्याची कार्यवाही सुरू आहे.

दरम्यान, यापुढील काळात ही कारवाई अशीच तीव्रतेने सुरू राहणार असून नवी मुंबईत कोणतीही दुर्घटना घडू नये याकरिता महापालिका दक्ष असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी स्पष्ट केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पनवेल मध्ये ३३ अनधिकृत होर्डिंग