कोकण भवन येथे सोशल मिडीया-आधुनिक सुरक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न

नवी मुंबई : दैनंदिन जीवनात समाज माध्यमांचा काळजीपूर्वक वापर कसा करावा, इंटरनेट विषयक सुरक्षा कशी बाळगावी, सोशल मिडीयावरुन धोके कसे ओळखावे या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कोकण विभागीय माहिती कार्यालयातर्फे १५ मे रोजी सोशल मिडीया-आधुनिक सुरक्षा या विषयावर एकदिवसीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत ‘माहिती-जनसंपर्क महासंचालनालय'च्या कोकण विभागातील समाज माध्यमांशी संबंधित काम पाहणारे कर्मचारी-अधिकारी तसेच कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय कोकणभवन नवी मुंबई या कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

बँकिंग सायबर सिक्युरिटी तज्ञ विकास पाटील आणि प्रशांत पाटील यांनी स्मार्ट फोन वापरताना काळजी कशी घ्यावी, पासवर्ड बद्दल सुरक्षितता कशी बाळगावी. तसेच इंटरनेट माध्यमांतून होणारी फसवणूक, सोशल मिडीयावरील खोटी प्रलोभने आणि खोटी आमिषे कशी ओळखावी याबद्दल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण करत तपशीलवार माहिती दिली. संगणक आणि मोबाईलचा उपयोग करताना सुरक्षितता असणे कसे आवश्यक आहे, याबाबतही माहिती त्यांनी दिली.

कार्यशाळाच्या प्रारंभी कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी प्रास्ताविक भाषणात कार्यशाळाचे महत्व सांगितले. आज सर्व वयोगटातून दैनंदिन जीवनात समाज माध्यमांचा सऱ्हास वापर होतो आहे. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. परंतु, या स्मार्ट फोन मधील बरेचशे तंत्रज्ञान आपल्याला माहिती नसते. मोबाईल बँकींगचा वापर वाढला आहे. युपीआय, जी-पे, पेटीएम, फोन-पे सारख्या आर्थिक व्यवहाराच्या ॲपचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. या सर्व गोंष्टीची माहिती समजून घेण्यासाठी सदर कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले असून, या प्रशिक्षणाचा दैनंदिन जीवनात उपयोग होईल, असा विश्वास डॉ. मुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

सदर कार्यशाळाचे सूत्रसंचालन कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहाय्यक संचालक संजीवनी जाधव-पाटील यांनी केले. ऑनलाईन प्रशिक्षण सत्रासाठी विभागात समन्वयाचे काम उपसंपादक प्रविण डोंगरदिवे यांनी पाहिले. यावेळी कार्यशाळा मध्ये उपस्थितांनी त्यांना प्रत्यक्ष कामात येणाऱ्या अडचणीबाबत प्रश्नोत्तरे केली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोरडा दिवस पाळू, डेंग्यू आजार टाळू