चिरनेर गावातील मातीच्या भांड्यांना वाढती मागणी

उरण : सध्या मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न पदार्थ खाण्याकडे नागरिकांनी आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे माती पासून बनवलेल्या भांड्याना मागणी वाढली आहे. याचा फायदा उठवत चिरनेर गावातील कुंभार समाजाच्या बांधवांनी मातीची भांडी बनविण्याकडे आपला मोर्चा वळविल्याचे चित्र सर्रास पहावयास मिळत आहे.

चिरनेर या इतिहास प्रसिध्द गावात कुंभार समाजाची ३२ कुटुंब पिढ्यान्‌पिढ्या वास्तव्यास आहेत. या समाजाचे उध्दरनिर्वाच मुख्य साधन म्हणजे शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविणे आणि नागरिकांना संसारासाठी आवश्यक असणारी शेत जमिनीच्या माती पासून भांडी बनविणे आहे. परंतु, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हळूहळू मातीच्या भांड्यांची मागणी कमी कमी होत गेल्याने कुंभार समाजावर त्याचा परिणाम झाला आहे. तरीही कुंभार समाजाच्या बांधवांनी आपला पिढ्यान्‌पिढ्याचा व्यवसाय आजही सुरु ठेवला आहे.

आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात गॅसवर तसेच स्टीलच्या भांड्यात शिजवलेल्या अन्न पदार्थाला चविष्ट नसल्याने आणि शिजवलेले अन्न शरीराला ऊर्जा देणारे नसल्याने नागरिकांनी चुलीवर, मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नपदार्थाला जास्त पसंती दर्शविली आहे. तसेच वाढत्या उष्णतेत घागर (मडका) मधील पाणी पिण्याकडे जास्त भर दिला आहे.

एकंदरीत मातीच्या भांड्यांना मागणी वाढली असल्याने चिरनेर गावातील कुंभार बांधवांनी भाकरी साठी आवश्यक असणारी खापरी, मटन किंवा मासळी बनवायला तवी, जोगळ्या, भिन, पाण्यासाठी घागर (मडका) यासह विविध प्रकारची मातीची भांडी बनवून ती विक्री साठी ठेवली आहेत.

चिरनेर गांव श्री महागणपती देवस्थानामुळे आणि १९३० सालचा जंगल सत्याग्रह यामुळे प्रसिध्द असल्याने मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पनवेल, पेण, उरण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या ऐतिहासिक प्रसिध्द गावाला भेट देतात. तसेच कुंभार बांधवांनी बनविलेली भांडी खरेदी करण्यासाठीही काही जण पसंती देेत आहेत.

कुंभार समाजाला शेत जमीन नाही. त्यामुळे संसाराचा गाडा शाडुच्या मूर्ती बरोबर माती पासून बनवलेल्या भांड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून चालवावा लागतो. त्यामुळे शासनाने आर्थिक पाठबळ दिले तर कुंभार समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. -विष्णू चौलकर, रहिवासी, चिरनेर.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई शहर स्थितीचा, पावसाळापूर्व कामांचा महापालिका आयुवतांकडून आढावा