डॉ. आंबेडकर स्मारकस्थळी अभिवादनासाठी नागरिकांचा ओघ

नवी मुंबई : ‘ज्ञान हीच शक्ती' या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रणालीवर आधारित नवी मुंबई महापालिकेने ऐरोली येथे उभारलेले भव्यतम स्मारक ‘ज्ञानस्मारक' म्हणून नावाजले जात आहे. बाबासाहेबांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून नागरिकांनी याठिकाणी ज्ञानसूर्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ज्ञानस्मारकाला भेट देत बाबासाहेबांना अभिवादन केले. तसेच जयंतीनिमित्त स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांची पाहणी केली.

 २०२१ मध्ये ५ डिसेंबर रोजी स्मारकातील सुविधा लोकार्पण झाल्यानंतर या स्मारकाकडे नागरिकांचा सातत्याने ओढा राहिला असून मागील सव्वा दोन वर्षात २.५७ लाख इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांनी या ठिकाणी भेट देत आगळे-वेगळे स्मारक म्हणून या स्मारकाची प्रशंसा केली आहे. आजही बाबासाहेबांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून जवळपास १५ हजारहून अधिक नागरिकांनी स्मारकाला भेट देत बाबासाहेबांच्या ज्ञानस्मृतींना अभिवादन केले आहे.

स्मारकातील समृध्द ग्रंथालयात ५२८२ इतक्या मोठ्या संख्येने बाबासाहेबांनी लिहिलेले आणि बाबासाहेबांसह इतर महनीय पुरुषांच्या चरित्रावर आधारित मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध असून ऑडिओ व्हिज्युअल ई-लायब्ररी सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रंथालय म्हणजे सर्वसामान्य वाचकांप्रमाणेच अभ्यासकांसाठीही ज्ञानसमृध्द असा ठेवा आहे. या ठिकाणचा ‘विशेष संविधान कक्ष' संविधानाची महती मनामनात रुजवण्यासाठी उपयोगी आहे. या ठिकाणी होणाऱ्या ‘विचारवेध' आणि ‘जागर' या व्याख्यानशृंखला वाचन संस्कृतीचा व्यापक प्रसार करतात.

बाबासाहेबांचे जीवनचरित्र दुर्मीळ छायाचित्रांतून मांडणारे विशेष छायाचित्र दालन स्मारकाचे खास आकर्षण असून त्यामधून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. आभासी चलचित्र प्रणालीद्वारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची संधी देणारा अत्याधुनिक होलोग्रफिक प्रेझेंटेशन शो भारावून टाकतो. याशिवाय एकाच वेळी २०० व्यक्ती ध्यान करु शकतील, असे भव्य ध्यान केंद्र वेगळी अनुभूती देते. अशा विविध वैशिष्ट्यांमुळे ज्ञानस्मारक सर्वांचेच आकर्षण केंद्र झाले असून या माध्यमातून बाबासाहेबांचे शिक्षण आणि ज्ञानातून प्रगतीचे विचार जनमानसात प्रसारित होत आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त या स्मारकाला लक्षवेधक विद्युत रोषणाई करण्यात आली, ते देखील जयंती दिनाचे एक वेगळ्या स्वरुपाचे आकर्षण ठरले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डॉ.आंबेडकर जयंतीदिनी शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन व मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके