छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
वाचाल तर वाचाल
वाचनाने वैचारिक प्रगल्भता येते आणि जीवनाला योग्य दिशा प्राप्त होते. वाचन हे केवळ पुस्तकांचे नसून विविध प्रकारचे असते, जसे माणसे, निसर्ग, आपला परिसर, कार्यक्षेत्र आणि जो असे सर्व प्रकारचे वाचन करण्यास शिकतो, तो तर्कशुद्ध पद्धतीने जीवन जगू शकतो. दैनंदिन जीवनात येणाऱ्या छोट्या-छोट्या अडचणी सोडवताना आपल्याला किती विचार करावा लागतो. यासाठीही अभ्यास आणि अनुभव आपल्या गाठीशी असावा लागतो. त्यातूनच योग्य गोष्टींची सांगड घालत आपण अचूक निर्णय घेऊ शकतो. कारण वाचन आणि अभ्यासानेच आपल्यात बुद्धी, विचार आणि निर्णयक्षमता वाढीस लागत असते.
वाचू पुस्तक, वाचू माणसे
वाचू निसर्ग सभोवतालचा
वाचनाने होऊ समृद्ध
आनंद घेऊ जगण्याचा ।।
लहानपणापासूनच आपण शालेय, महाविद्यालयाच्या माध्यमातून पाठ्य-पुस्तकांचे वाचन करत असतो. त्यातून जगाचे दर्शन घडून देश-विदेशातलं राहणीमान, भाषा, वेष, प्रथा, खाद्यपदार्थ, संस्कृती, इतिहास, संशोधन याला आपण सुपरिचित होत असतो. विविध भाषेतील गोष्टीस्वरूप धडे आणि कविता यांतून हळू-हळू वाचनाची गोडी लागून सखोल अध्ययन होते. कथा-कादंबऱ्या, ग्रंथ, नाटकं यांच्या रसग्रहणातून आनंदाची अनुभूती मिळते. मोठ्याने वाचन केल्याने उच्चारांमध्ये सुस्पष्टता येऊन अस्खलितपणा वाढीस लागतो. निरंतर वाचनाने सहजता-स्वाभाविकता वाढते. लिखाणातील भाव हृदयापर्यंत पोहोचून चेहऱ्यावरही उमटतात. आपण स्वतःसाठी मूकपणे केलेल्या वाचनातून आशय चांगला समजतो. वाचनशैली अंगी रुजल्यामुळे माहिती संग्रह वाढतो आणि आपल्यात दूरदृष्टीचा संचार होतो. पुस्तकाच्या रूपाने आपल्याला एक खरा मित्र मिळतो, जो योग्य-अयोग्य गोष्टींची जाणीव करून देतो. माणसाला माणूस बनवतो. वाचन आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला शिकवतं. त्यामुळे जीवनात सुसूत्रता येऊन जीवनाला एक आयाम प्राप्त होतो.
वाणीवर आणि मनावर सुसंस्कार होऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अंतर्बाह्य विकास होतो. सर्जनशीलतेला, कल्पकतेला वाव मिळून उत्तम कलाकृती निर्माण होते. वाचनाने शब्दसंग्रह वाढून भाषा कौशल्य विकसित होतं. बोलण्याची कला अवगत होऊन संवादांची देवाणघेवाण उत्तमरीतीने होते. वाचनामुळे आकलनशक्ती वाढते, लेखनही सुधारते. विविध भाषा तसेच विषय अभ्यासल्याने जागतिक पातळीवर संवाद साधण्यासाठी, काम करण्यासाठी आत्मविश्वास बळावतो. जीवनावश्यक गोष्टींचं ज्ञान प्राप्त झाल्यामुळे अर्थार्जनाचं भय नाहीसं होऊन मानसिक स्वास्थ लाभतं आणि आपण जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो.
खरंच, माणसाला समृद्ध जीवन जगायचे असेल, तर वाचनाला पर्याय नाही. कारण वाचनानेच माणसाच्या ज्ञानात भर पडून जीवन जगणे सुलभ होऊ शकते. तसं तर अशिक्षित-सुशिक्षित आपापल्यापरीने सगळेच जगतात, पण वाचनाने वैचारिक प्रगल्भता येते आणि जीवनाला योग्य दिशा प्राप्त होते. कारण वाचन हे केवळ पुस्तकांचे नसून विविध प्रकारचे असते, जसे- माणसे, निसर्ग, आपला परिसर, कार्यक्षेत्र आणि जो असे सर्व प्रकारचे वाचन करण्यास शिकतो, तो तर्कशुद्ध पद्धतीने जीवन जगू शकतो. अगदी दैनंदिन जीवनात येणाऱ्या छोट्या-छोट्या अडचणी सोडवताना आपल्याला किती विचार करावा लागतो. यासाठीही अभ्यास आणि अनुभव आपल्या गाठीशी असावा लागतो. त्यातूनच योग्य गोष्टींची सांगड घालत आपण अचूक निर्णय घेऊ शकतो. कारण वाचन आणि अभ्यासानेच आपल्यात बुद्धी, विचार आणि निर्णयक्षमता वाढीस लागत असते.
जीवनात घडणाऱ्या घटनाही आपण वाचायला शिकलं पाहिजे. म्हणजे जेव्हा एखादी घटना घडते, तेव्हा ती घडायची होती म्हणून घडली असे न म्हणता ती का घडली? त्याचे परिणाम-दुष्परिणाम यावर सखोल विचार केला पाहिजे. त्यातूनच भल्या-बुऱ्याची जाणीव आपल्याला होत असते. हेच अनुभव पुढे एखाद्या जटिल प्रसंगी आपल्याला उपयोगी पडत असतात. विविध कार्यक्षेत्रे आणि त्यात यशस्वी झालेली कितीतरी माणसे आपल्या आजूबाजूला वावरत असतात. ती का यशस्वी होतात? जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी, बुद्धिमत्ता हे सगळं त्यांच्याकडे असतंच, पण त्याहीपेक्षा वैविध्यपूर्ण वाचन, त्यावर मनन-चिंतन आणि सातत्याने अभ्यास करण्याची त्यांची प्रवृत्ती असते, जी त्यांना यशोशिखरावर नेते. त्याचप्रमाणे माणसे वाचण्याची कलाही त्यांच्यात विकसित झालेली असते. कारण आपल्या आजूबाजूला जशी चांगली माणसं असतात, तशी वाईट माणसंही वावरत असतात. या वाईट माणसांपासून आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवायचे असेल, आपली फसवणूक होऊन द्यायची नसेल तर आपल्याला माणसे वाचायला शिकणेही गरजेचे असते. एखाद्याबद्दल ईर्ष्या-मत्सर असणे, हा मानवी स्वभाव आहे. अशा व्यक्तींना आपली प्रगती खुपत राहते. मग त्या व्यक्ती अनेक प्रकारे आपल्या आयुष्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी त्यांचा कुटील डाव आपल्याला ओळखता आला पाहिजे. तरच प्रसंगावधान राखून आपण त्यावर मात करू शकतो. याला प्रासंगिक वाचन म्हणतात. ही वृत्ती आपल्या ठायी असेल तर आपण सावधपणाने खेळी खेळून आपलं नुकसान टाळू शकतो आणि निश्चितपणे ध्येय गाठू शकतो.
हल्लीच्या काळात तर अपप्रवृत्तींचा सुकाळ माजला आहे. एकीकडे विकसित तंत्रज्ञान तर दुसरीकडे वाढती बेरोजगारी यामुळे चोऱ्या, लबाड्या, फसवणुकीचे प्रकारही खूपच वाढलेले आहेत. समाजात घडणाऱ्या या घटनांचे आपण भान ठेवले नाही, वृत्तपत्र, अंक वाचनातून किंवा इतर प्रसार माध्यमांद्वारे ही माहिती घेतली नाही, आपण सजग राहिले नाही तर आपलीही फसवणूक होऊ शकते. एखाद्याकडे नुसतीच हुशारी आहे. पण वाचन आणि अभ्यासातून आपल्या बुद्धीत भर टाकण्याची प्रवृत्ती नसेल तर तो कालांतराने मागेच पडणार आहे. त्याचे जीवन अधोगतीला लागून संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. काही अपवाद सोडले तर दारिद्य रेषेखालील तसेच खेड्यापाडयातील, शहरातील असंख्य निरक्षर लोकं शिक्षणाअभावी अधोगतीमुळे म्हणा किंवा फसवणुकीमुळे म्हणा, मरेपर्यंत दारिद्रयातच खितपत पडतात. त्यांना प्रगतीच्या संधीच प्राप्त होत नाहीत.
पण निरक्षर असूनसुद्धा काही मात्र आपल्या विचारधनाने, प्रतिभेने, एखाद्या जन्मजात देणगीने, कौशल्याने परिस्थितीवर मात करून पुढे जातात. उदा. बहिणाबाई चौधरी. माणसं, शेती, निसर्ग यांप्रती अपार जिव्हाळा-प्रेमातून त्यांनी शेतकाम, घरकाम करता-करता उत्स्फूर्त काव्यं रचली आणि अजरामर झाल्या. त्या जरी अशिक्षित होत्या; तरी कष्टप्रद जीवन जगता-जगता जीवनाच्या शाळेत अनुभवाने शहाण्या झाल्या आणि त्यांनी डोळसपणे या जगाकडे पाहिले. पुस्तकाविना स्वतःच्या आकलनाने वाचन-चिंतन करून, सूक्ष्म अभ्यास करून दैनंदिन जीवनातलं ज्ञान, जगण्याची कला आत्मसात केली. त्याचप्रमाणे संत कबीरही निरक्षर होते. स्वतःच्या जाती-धर्माला अनभिज्ञ असलेले आणि खऱ्या आई-वडिलांविना वाढलेले कबीर देश भ्रमंतीतून जीवनाचं तत्वज्ञान जाणतात आणि दोहे-अभंगाच्या माध्यमातून तत्कालीन समाजाचे अवगुण परखडपणे मांडतात. भटकंतीतून त्यांनी जे पाहिलं, वाचलं, अनुभवलं, त्यातून त्यांना स्फुरलेले सात्विक विचार त्यांनी उपदेशातून, संदेशातून समाजासमोर ठेवले आणि देश सद््गुणी व्हावा, एकजुटीने वागावा म्हणून आटोकाट प्रयत्न केले. ही दोन उदाहरणे आपल्याला हेच दाखवतात की पुस्तकी वाचन तर हवेच, पण त्यासोबत आपण आजूबाजूचं सर्वच वाचायला शिकलं पाहिजे.
क्षेत्र कोणतंही असो- उद्योग, क्रीडा, कला, वैद्यकीय, तांत्रिक, शिक्षण, प्रत्येकाला त्यात कार्यरत राहण्यासाठी, यश संपादन करण्यासाठी वाचनाची आवश्यकता तर असतेच. त्याशिवाय ती व्यक्ती त्या-त्या क्षेत्राला, त्यांच्या कामाला योग्य न्याय देऊच शकत नाही. कारण वाचनानेच विचार प्रक्रिया वाढत असते आणि त्यातूनच संशोधन वृत्ती जागृत होऊन सखोल ज्ञान घेण्याकडे आपला कल वाढतो. त्यातूनच आपण कौशल्य प्राप्त करतो. जेव्हा ही प्रक्रिया निरंतर सुरू राहते, तेव्हा शास्त्रज्ञ निर्माण होतात आणि जेव्हा काही काळानंतर तुम्ही ही विचार प्रक्रिया थांबवता किंवा काही कारणाने ती थांबते, तिथे आपली बुद्धी खुंटीत होते आणि प्रगतीच्या वाटेत अडथळे निर्माण होतात. म्हणूनच व्यक्ती सामान्य असो, सर्वसाधारण असो की बुद्धिमान असो, प्रत्येकाला जीवनाची वाटचाल प्रगतीपथावर ठेवण्यासाठी वाचनाला पर्याय नाही.
पूर्वी पुस्तकं मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे ग्रंथालय होतं. तिथे जाऊन पुस्तकं आणून वाचून परत करावी लागत होती. पण मनोरंजनाची साधने कमी असल्याने वाचन संस्कृतीला महत्त्व प्राप्त झाले होते. बौद्धिक विकासासाठी लोकांचा पुस्तकं वाचनावर अधिक भर असे. तसेच कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या परिपक्व होण्यासाठी वाचनच उपयुक्त आहे, यावर लोकांचा ठाम विश्वास होता. पण आता डिजिटलायझेशनमुळे कोणतंही पुस्तक ऑनलाईन साईटवर सहज उपलब्ध असतं. इंटरनेटमुळे संपूर्ण जगाची माहिती एका क्लिकवर आपल्याला उपलब्ध होते. पण मनोरंजनाची साधने वाढल्यामुळे वाचनासाठी वेळच कमी पडतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं आहे की वाचाल तर वाचाल! कारण वाचनाच्या माध्यमातूनच मानवाचे जीवन घडू शकते. म्हणूनच वाचन संस्कृतीला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येण्यासाठी तिची जीवापाड जपणूक करणे आणि त्याचबरोबर शाळा-कॉलेज, संस्था, सरकारतर्फे विविध उपक्रमांद्वारे आबालवृद्धांमध्ये रुजवणे, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. तरच या देशाचे भविष्य उज्ज्वल राहील.
अध्ययनं ज्ञानस्य मूलम् विद्या सर्वस्य भूषणम! - सौ. नंदा कोकाटे, ठाणे