हा सुहास्यवदन ‘वरदहस्त' आहे म्हणून!

धडधाकट माणसाला..त्यातही सैनिकाला  माणसाला हा किती मोठा धक्का असेल, याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. पाकिस्तानने सीमेपलीकडून डागलेल्या क्षेपणास्त्रांपैकी एक उधमपूर या फर्स्ट एड सेंटरवर आदळले. तेथे आधीपासून दाखल असलेल्या काही सैनिकांवर उपचार सुरु होते. शत्रूच्या त्या मा-यात वरूण कुमार  सापडले. त्यांचा उजवा हात जायबंदी झाला. उजव्या हाताने काम करण्याची सवय असताना आता तोच हात नसताना जीवन सुरळीतपणे सुरू ठेवणे किती कठीण असेल? पण सैनिकी मनोबल असलेले वरुण कुमार यांनी अगदी थोड्याच कालावधीत डाव्या हाताला कामाची सवय लावली. नुकत्याच झालेल्या हवाई दल स्थापना दिनाच्या विशेष कार्यक्रमात वरुण कुमार यांना ‘वायुसेना मेडल' ने सन्मानित केले गेले.

प्रत्येक सैन्यकथा ही रोमांचक असेलच असे नाही...युद्ध केवळ हाती शस्त्रे धारण केलेले सैनिकच लढत असतात असेही नाही. या सैनिकांच्या मागे एक अखंड अशी साहाय्यक फळी कार्यरत असते...आणि त्यांचाही त्याग मोठा असतो...फक्त तो दृष्टीस पडत नाही! आपले कथानायक केवळ ३२ वर्षे वयाचे वायूसैनिक आहेत. छायाचित्रात दिसणारे त्यांच्या चेह-यावरचे सुहास्य पाहून त्यांनी काही गमावले आहे, असे मुळीच वाटत नाही. त्यांच्या प्रमुखांनी त्यांच्या डाव्या हाताला कौतुकाने स्पर्श केलेला दिसतो आहे...या छायाचित्रात त्यांचा उजवा हात दिसून येत नाही...पण उजव्या बाजूच्या छायाचित्रात त्यांचा उजवा हात दिसतो आहे...पण हा हात कृत्रिम आहे... केवळ महिनाभरापूर्वीच मिळाला आहे. त्यांच्या मूळच्या हाताने मर्दुमकी गाजवली आहे...आणि त्यातच तो हात शरीराला सोडून गेलेला आहे!

भारताने पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर' हाती घेत हवाई हल्ला चढवला त्याला पाकिस्तानने प्रत्युत्तर देणे अपेक्षित असेच होते. कॉर्पोरल वरुण कुमार शशीधर ठेकेपुरप्पल याकाळात भारत-पाक सीमेवरील उधमपूर हवाई तळावर कर्तव्यावर होते. वरुण २०१३ मध्ये भारतीय हवाई दलात एअरमन म्हणून रुजू झाले. स्टेशन मेडीकेअर सेंटरमध्ये ते मेडिकल असिस्टंट या नात्याने सैनिकांची सेवा करीत होते.

१० मे २०२५. पहाटेची वेळ होती....युद्धात जखमी होणा-या सैनिकांना तिथल्या तिथे वैद्यकीय साहाय्य मिळू शकावे म्हणून प्रत्यक्ष सीमेवरच  वैद्यकीय प्राथमिक उपचार केंद्र स्थापन केले जाते. पाकिस्तानने सीमेपलीकडून डागलेल्या काही क्षेपणास्त्रांपैकी एक उधमपूर या फर्स्ट एड सेंटरवर आदळले. राजस्थानचे सार्जंट सुरेंद्रकुमार मोग हे सुद्धा यावेळी मेडिकल सेंटरमध्ये कर्तव्यावर सज्ज होते...तेथे आधीपासून दाखल असलेल्या काही सैनिकांवर उपचार सुरु होते. शत्रूच्या त्या  मा-यात सुरेंद्रकुमार गंभीर जखमी झाले...आणि वीरगती प्राप्त करते झाले. वरूण हेसुद्धा या मा-यात सापडले. त्यांचा उजवा हात जायबंदी झाला...शरीरात छरे घुसले! अशाही स्थितीत वरुण डगमगले नाहीत. त्यांनी आपले काम थांबवले नाही. त्यांना स्वतःला वैद्यकीय साहाय्य मिळेपर्यंत त्यांनी आपली जागा सोडली नाही. रक्तस्त्राव होत असतानाही त्यांनी इतरांना मदत करण्याचा प्रयत्न केला. कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले गेल्यानंतर सुमारे महिनाभर त्यांनी उपचार घेतले...परंतु त्यांचा उजवा हात वाचू शकला नाही. कोणाही धडधाकट माणसाला, आणि त्यातून सैनिक असलेल्या माणसाला हा किती मोठा धक्का असेल, याची सामान्य माणसे कल्पनाही करू शकणार नाहीत. उजवा हात गमावला गेल्यानंतर वरुण यांना पुण्याच्या कृत्रिम अवयव केंद्रात दाखल करण्यात आले. युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्याबरोबर त्यांनी त्यांच्या पत्नीला, अंजू यांना आणि लहानग्या मुलाला, विहानला केरळमधील त्यांच्या गावी पाठवून दिले होते.

वरुण यांच्यावर गुदरलेल्या प्रसंगाने अंजूसुद्धा हादरून गेल्या होत्या. पण सारे बळ एकवटून त्या युद्धस्थिती असूनही उधमपूरमध्ये परतल्या आणि पतीची सेवा करू लागल्या...उधमपूर भारत-पाक सीमेवर आहे!

पुण्यात आल्यावर वरुण यांना विशेष वैद्यकीय उपचार आणि पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी करून घेतले गेले. या केंद्रात देशभरातून जखमी झालेले, अवयव गमावलेले सैनिक दाखल होत असतात. उजव्या हाताने काम करण्याची सवय असताना आता तोच हात नसताना जीवन सुरळीतपणे सुरू ठेवणे किती कठीण असेल? पण सैनिकी मनोबल असलेले वरुण कुमार यांनी अगदी थोड्याच कालावधीत डाव्या हाताला कामाची सवय लावली. वरुण यांच्या शरीरात घुसलेले छरे वैद्यकीय कारणांमुळे अजूनही बाहेर काढले गेलेले नाहीत. पण यामुळे वरुण यांच्या चेह-यावरचे हास्य मावळले नाही.

पुण्यात कृत्रिम अवयव केंद्राला हवाईदल प्रमुखांनी, एअर चीफ मार्शल ए.पी. अर्थात अमर प्रीत सिंग साहेबांनी भेट दिली होती. या भेटीत सिंग साहेबांनी सर्व सैनिकांची आस्थेने चौकशी केली. वरुण यांनी डाव्या हाताने अनेक कामे करून दाखवत हवाई दल प्रमुखांना प्रभावित केले....आपल्याला लवकरच कर्तव्यावर,”ड्युटी” वर परतायचे आहे...असे त्यांना दाखवून द्यायचे होते...लोक एका पायावर तयार असतात...हे बहाद्दर एका हातावर तयार आहेत! त्यांची ही इच्छाही लवकरच पूर्ण होईल, असे दिसते. नुकत्याच झालेल्या हवाई दल स्थापना दिनाच्या विशेष कार्यक्रमात वरुण कुमार यांना ‘वायुसेना मेडल' ने सन्मानित केले गेले. या सन्मानाची घोषणा भारतीय सेनेच्या तिन्ही दलांच्या सर्वोच्च प्रमुख अर्थात सुप्रीम कमांडर महामहीम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केली होती.

‘देश' म्हणजे विशिष्ट दिशेला स्थित असलेला आणि सीमांनी वेष्टित असा भूभाग..ज्यात समुद्राचाही समावेश असतो. आणि ‘राष्ट्र' म्हणजे स्वतःच्या तेजाने चमकणारा..स्वतःच्या स्वतंत्र अस्मितेने, अभिमानाने श्वास घेत असलेला भूभाग. आपण भारतीय या मातीला माता, आई, जननी असं संबोधतो. राष्ट्र हे केवळ भौगोलिक अस्तित्व नसते. राष्ट्राला स्वतःची अशी अस्मिता असते आणि एक विशिष्ट मानसिकता असते. आपली माती म्हणून त्या देशाचे सैनिक तिचे प्राणपणाने रक्षण करतात..प्रसंगी प्राणार्पण करतात...प्रसंगी प्राण घेतातही. असे सैनिक लाभलेला भारत देश याबाबत खूप नशीबवान म्हणायला पाहिजे.

स्वातंत्र्यप्राप्तीच्या वर्षापासून भारताला दोन मोठे शत्रू लाभले..पाकिस्तान हा यातलाच. सियाचीनमध्ये चोवीस तास खडा पहारा ठेवल्यानेच पाकिस्तानवर लक्ष ठेवता येते. मात्र त्यासाठी किंमत मात्र जबर मोजावी लागते. दरवर्षी सुमारे दोनशे सैनिक या सीमांवर, देशात इतरत्र प्रशिक्षण सुरु असताना, विविध शोधकार्ये, मदतकार्ये इत्यादीमध्ये जखमी होत असतात. यांतील ब-याच सैनिकांना हात, पाय, डोळे गमवावे लागतात. चीनसोबत गेल्या कित्येक वर्षांत सशस्त्र संघर्ष झालेला नसला तरी त्या सीमेवर आपले सैनिक सज्ज ठेवावेच लागतात...पण या सीमेवर सर्वांत मोठा शत्रू आहे तो म्हणजे तेथील अतिशीत हवामान. हिमदंशामुळे हातांची, पायांची बोटे गळून जातात किंवा ती कापून काढावी लागतात....राजस सुकुमार, धडधाकट सैनिक हे....जणू मानवी देहाची सुंदर, रेखीव रुपेच जणू....पण या मूर्ती अशा भग्न पावतात...मात्र त्यांच्या चेह-यावरचे हास्य कधीही मावळत नाही.....आपल्या देशभरात आक्रमकांनी फोडलेल्या मूर्तीसुद्धा अशाच आशीर्वाद देत उभ्या असतात!

वरूण कुमार यांच्यावर यशस्वी उपचार करणा-या कृत्रिम अवयव केंद्राची कामगिरी अतिशय दैेदीप्यमान आहे. इंग्रज सरकारच्या आमदनीत १९४४ मध्ये स्थापन झालेल्या या केंद्राने आजवर हजारो सैनिकांवर उपचार केले आहेत. सामान्य नागरिक रूग्णांनाही या सेवेचा लाभ दिला जात आहे. २००३ पर्यंतची आकडेवारी असं सांगते की, सुमारे दहा हजार रुग्णांचा एक किंवा दोन्ही पाय कापावे लागले आणि सुमारे बाराशे रुग्णांचा एक किंवा दोन्ही हात आणि पाय कापून टाकावे लागलेल्या रुग्णांची संख्या शंभरच्या वर होती. या रुग्णांत काही सर्वसामान्य नागरिक रुग्णांचा समावेश असला तरी सव्रााधिक रुग्ण हे सैनिक असतात...हे खरे! देशसेवेसाठी आपले तरुण सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय केवढा मोठा त्याग करीत असतात, हेच या आकड्यांमधून दिसते..आणि हे आकडे बावीस वर्षांपूर्वीचे आहेत! या उपचार केंद्रावर या सैनिकांसाठी विशिष्ट रचना असलेला जलतरण तलाव, चाकांच्या खुर्चीवर बसून खेळता येतील अशा खेळांच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हे सैनिक सहभागी होऊन देशाला पदके मिळवून देत असतात Queen Mary’s Technical Institute (खडकी,पुणे)  ही अशीच एक मोठी संस्था आहे...जिथे सैनिकांना व्यवसाय प्रशिक्षण, क्रीडा प्रशिक्षण दिले जाते.

कारगिल युद्धात शौर्य गाजवलेले व पुढे लगेचच झालेल्या ऑपरेशन पराक्रममध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये आपले दोन्ही पाय आणि उजवा हात गमावलेले, महावीर चक्र आणि वीर चक्र प्राप्त नाईक दीपचंद साहेब यांच्याकडे पाहून भारतीय सैनिकांमधली लढाऊ वृत्ती, त्याग, समर्पण हे गुण  दिसून येतात. जोवर या शूर वीरांचा वरदहस्त आपल्यावर आहे..तोवर भारत अजिंक्य राहील!

प्रत्येक सैन्यकथा ही प्रत्यक्ष युद्धाची, हौतात्म्याची असेलच असे नाही...युद्ध विविध स्तरांवर लढले जाते...आणि यातील प्रत्येक सहभागी सैनिक हा वंदनीयच असतो. या लेखाच्या निमित्ताने हे सर्व सैनिक, त्यांचे कुटुंबीय यांना नमस्कार..जयहिंद!
-संभाजी बबन गायके 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

भारतातील शिल्पधन