छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
पंढरपूर कानपूर नागपूर
आपण एकटे कधी नसतोच.. समोर, आसपास कोणीतरी असतंच. ते जर चुकीचं करायला सांगत असतील तर ते करायचं नाही. समोरचा बोलतो एक आणि कृती दुसरीच करतो हे लक्षात आलं की सावध व्हायचं. एखादे वेळी फसलो तर... दुसऱ्या वेळी विचार करून वागायचं. क्षणभराच्या चुकीने खेळातून बाद झालो. पण व्यवहारात असे वागलो तर फार मोठी किंमत द्यावी लागणार आहे .त्यामुळे कोणाचा आदर्श ठेवायचा...त्या बरोबरच कोणाचे अनुकरण करायचे नाही.... याचे भान ठेवायचे. चौकस राहायचे.
पंढरपूर कानपूर नागपूर. लेखाचं शीर्षक वाचलंत ना? हा एक खेळ आहे असं तुम्हाला सांगितलं तर ....अहो खरंच हा खेळच आहे. सांगते कसा ते. राष्ट्र सेविका समितिच्या शाखेमध्ये त्या दिवशी ताई म्हणाल्या, "आज आपण पंढरपूर कानपूर नागपूर हा वेगळा खेळ खेळु.”
हे काय बरं ? आम्हाला काही कळेच ना... आम्ही प्रथमच अशा खेळाचे नांव ऐकत होतो. असा खेळ असतो ? ताईंनी खुलासा केला. म्हणाल्या, "आहे ना हा खेळ. सांगते कसा खेळायचा ते. पंढरपूर म्हटलं की कमरेवर हात ठेवायचे, कानपूर म्हटलं की कानावर हात आणि नागपूर म्हटलं की हात नाकावर ठेवायचा. मी भराभर म्हणत जाईन त्याप्रमाणे तुम्ही कृती करायची.”
आम्ही म्हटलं, "त्यात काय.. किती सोपा खेळ चला सुरू करू,”
ताई म्हणाल्या, "थांबा ...पण एक करायचं.. मी समोर उभी राहणार. तुम्ही माझ्याकडे बघून कृती करायची.”
आम्हाला कळेना इतकी सोप्पी कृती ताईंनी कशाला दाखवायला हवी? साधे हात तर हलवायचे आहेत... आम्ही खेळायला उभ्या राहीलो. ताईंनी शांत सुरात अजून एक खुलासा केला. म्हणाल्या, "नीट ऐका... मी पंढरपूर म्हटलं की तुम्ही हात कमरेवर ठेवायचे, मी कानावर हात ठेवीन, नागपूर म्हटलं की मी कमरेवर हात ठेवीन... म्हणजे मी काहीही चुकीचं करेन. तुम्ही मात्र योग्य तेच करायचं आहे.”
अरेच्या या खेळाची अशी मेख आहे का? मग सुरू झाली गंमत....
कानपूर म्हणलं की कानावर हात ठेवायला जावं तर समोर ताईंनी कमरेवर हात ठेवलेला... पुढे पंढरपूर म्हटलं तर ताईंनी नाकावर ठेवलेला... आम्हाला सगळं कळत होतं तरी पण आम्ही चुकत होतो....त्यात आसपास बघितलं तर प्रत्येकीची कृती वेगळीच होत होती. सगळा सावळा गोंधळ सुरू झाला.
प्रथम आम्हाला हसू आलं..पण थोडा खेळ झाल्यावर... ही साधी गोष्ट...आपल्या स्वतःच्या बावळटपणामुळे चुकीची करत आहोत... या विचाराने स्वतःचाच राग आला. ईतकं कसं आपल्याला कळत नाही....काही वेळानंतर लक्षात आलं की हा ब्रेन गेम आहे. शरीर, मन आणि मेंदू यांचा समन्वय हवा आहे .मेंदूला कानपूर ऐकलं की कानावर हात ठेवायचे हे कळत होतं...
पण डोळे....समोर ताईंनी नाकावर हात ठेवलेला बघत होते.त्यामुळे कृती करताना शरीर व मन गोंधळात पडत होतं.
त्यात ताईंनी भराभरं करायला सांगितले होते. म्हणजे मेंदूला हेतूपूर्वक विचार करायला वेळच दिला जात नव्हता. त्यामुळे अजून चुकत होतो.
खेळातून बऱ्याच जणी बाद होत गेल्या. साध्या खेळाचे रूपांतर विलक्षण वेगळ्याच अशा वळणावर गेलं...शांतपणे विचार केल्यावर त्यातला अजून अर्थ ध्यानात आला. हे समाजप्रबोधनाचे उत्तम उदाहरण होतं. तुमच्या मनात सत्य काय आहे हे माहीत असेल तर तीच कृती करायची. समोरचा काय सांगतो इकडे जरूर पाहायचं... ऐकायचं ...पण स्वतः कृती मात्र योग्य तीच करायची.
आपण एकटे कधी नसतोच.. समोर, आसपास कोणीतरी असतंच. ते जर चुकीचं करायला सांगत असतील तर ते करायचं नाही. समोरचा बोलतो एक आणि कृती दुसरीच करतो हे लक्षात आलं की सावध व्हायचं. एखादे वेळी फसलो तर... दुसऱ्या वेळी विचार करून वागायचं. क्षणभराच्या चुकीने खेळातून बाद झालो. पण व्यवहारात असे वागलो तर फार मोठी किंमत द्यावी लागणार आहे. त्यामुळे कोणाचा आदर्श ठेवायचा...त्या बरोबरच कोणाचे अनुकरण करायचे नाही.... याचे भान ठेवायचे. चौकस राहायचे. तुम्ही विचार करा.. कदाचित तुम्हाला अजून नवीन अर्थ गवसेल.
ताईंनी गमतीगमतीत एक नवा विचार आमच्या मनात रुजवला. तो धडा घेऊन घरी आलो. आता वागताना ती शिकवण आठवणीत ठेवून वागायचा प्रयत्न करू. याचा उपयोग आपल्या कुटुंबाला होणार आहेच...तसाच समाजालापण होणार आहे.
चला तर..नवं काही शिकूया..शहाणे, सुज्ञ, नागरिक होऊ या. आजच्या स्थितीत त्याची फार गरज आहे. सुजाण नागरिक ही राष्ट्राची मोठी संपत्ती असते. हे लक्षात ठेवू या. वमनान कणखरं बनुया...यासाठी जिथे आपल्याला अशी शिकवण मिळत असेल तिथे जायला मात्र हवे आहे. संगत कोणाची आहे, हेपण महत्त्वाचे असते. - नीता चंद्रकांत कुलकर्णी