मनातली भुतं

ज्यामुळे मन उदास होते, मानसिकता अशावेळी ढासळते आणि नको ते विचार मनाला अस्वस्थ करु पाहतात... ही अवस्था म्हणजेच मनातलं दडलेले भूत होय. काही लोक स्वकर्तृत्वापेक्षां इतरांची प्रगती पाहुन अस्वस्थ होतात. कुणाचा उत्कर्ष पाहवत नसावा त्यांना.

आज अमेरिकेचा जगभर दबदबा पूर्वी होता त्याहीपेक्षा ज्यास्त आहे. त्यांच्याकडे अशिक्षित कुणीही नसावे. तरीही ‘मनाचे खेळ' त्यांच्याकडील लोकांतसुद्धा आहेत, हे आश्चर्य आहे! एकूण लोकसंख्येच्या १८ टक्के जनतेला असे वाटते की भूत-पिशाच्च जगात आहेत. जर आंग्ल प्रवृत्ती यांस मान्यता देत असेल तर मग आशियाई लोकांनी तसे का मान्य करु नये? गुगलवरील नोंद असे सांगते की जगातील सर्वांत जास्त शिक्षित समाज आहे त्यांना भूत हा प्रकार जगात नाही असे नाही वाटत...मग आपण भारतीय उपखंडातल्या लोकांना त्यांत का तसे वाटू नये? हा अनुत्तरित प्रश्न आहे.

विज्ञानाचे एक मत असे आहे की भूत अस्तित्वात असल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यांचे अस्तित्व खोटे ठरवणे अशक्य आहे आणि भूत शिकार करणे हे छद्म विज्ञान म्हणून वर्गीकृत केले गेले आहे. अशी विकिपीडियाची नोंद आहे. मनातलं भूत याचा थेट अर्थ असा होतो की मनातली भीती, चिंता, किंवा नकारात्मक विचार असा होतो. ज्यामुळे मन उदास होते, मानसिकता अशावेळी ढासळते, आणि नको ते विचार मनाला अस्वस्थ करु पाहतात. ही अवस्था म्हणजेच मनातलं दडलेले भूत होय. काही लोक स्वकर्तृत्वापेक्षां इतरांची प्रगती पाहुन अस्वस्थ होतात. कुणाचा उत्कर्ष पाहवत नसावा त्यांना. जळू प्रवृत्ती एखाद्या व्यक्तीला खूप त्रासदायक ठरते व अशी माणसे नकळत भूत या मानसिकतेकडे वळत असावीत. आतल्या आत नको त्या घटनांची भीती वाटू लागत असावी. अपप्रचार, चुगलखोर लोकं इतरांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असावेत. नकळत एखादी दबक्या स्वभावाची व्यक्ती अशा विकृत लोकांच्या हातची बाहुली होऊन जाते. असे केवळ मनातील भीतीपोटी होत असावे. दुसरं काय?

माझ्या बालपणापासून  "भूत आहे, ते केव्हाही येईल...” अशी भीती आई-आजी कायम सांगत असायची. गावातील कौलारु घराच्या आड्याच्या फटीतून एक सूर्याकिरण थेट आत यायची, ते चित्र दिसताच तो भुताचा डोळा आहे, असे सांगण्यात यायचे. भीतीमुळे पोटात जागा नसली तरीही घास घश्याखाली न्यावा लागत असे. त्यापुढे ग्रामोफ़ोनवर मुद्दामच आवारा सिनेमामधील गाणं प्ले केले जायचे..."हय्या हो हय्या रे हय्या”  हे गाणं ऐकताच मी घाबरुन पटापटा अन्न ग्रहण करायचो! घराच्या छतातील एका छेदातून थेट घरांत प्रवेश करणारी ती सूर्याकिरण म्हणजेच तो भुताचा डोळा तर नसावा? अशा शंकाकुशंका पूर्वी गावांत बोलल्या जायच्या. लहानपणापासून भूत असल्याची भीती दाखवली जायची. प्रत्यक्षांत आजपर्यंत भूत कुणी दाखवलंच नाही. पुढे शाळा, कॉलेजातून शिक्षण घेतांना भूत हा प्रकार पार विसरुन गेलो, ही वस्तुस्थिती आहे. तरीही काही कुरुप चेहऱ्याचे ढोंगी बाबा-बुवा समाजातील विकृतीकरणास जास्त हवा देऊन स्वतःचा खिसा सुजवतात. ज्यामुळे समाज दुर्बल होतो. आजी सांगायची दुपारच्या वेळी खाजणालगत असलेल्या भल्यामोठ्या वडाच्या झाडाखाली उभं राहू नये. जेथे-जेथे वडाचे झाड असेल त्यावर जखिंण निवास करते! पुढे खाजणातील मोकळ्या जागी जी पाण्याची डबकी असतात (कोकणात त्यांस ‘पल' असे म्हणतात) त्यातील पाणी भर दुपारी चक्क रंग बदलते, याचा अर्थ त्या डबक्यात बसून जखिंण आंघोळ करुन गेली, असे बोलले जायचे. पुढे मी शहरांतील कॉलेजमध्ये शिक्षण घेऊ लागलो. नुकतीच महामंडळाकडून रातराणी सुरु झाली होती. अनेकदा त्यांतून प्रवास केला. वाटेत अनेक वडाची झाडे ऐसपैस वखुरलेली असायची, आजही आहेतच. मात्र एकदाही त्यांतून भूत किंवा जखिंण नजरेस नाही पडली. खाजणातील डबक्यात खेकडे, भांबुर्डे, टाणटूणे असे पाण्यातील मत्स्य जीवाणू खोलात जाऊन दडतात. कारण अतिउन्हामुळे डबक्यातील जलस्तर तापलेला असतो. त्यांच्या हालचालीमुळे पाणी गढूळ होते, आपण मात्र भीतिपोटी त्या ठिकाणी जखणीने आंघोळ केली असावी असा कयास करतो. ज्यात तथ्य नाही. मानवात जे नाही त्याची भरपाई म्हणून त्याला कल्पनाशक्ती मिळालीय नि जे आहे ते सुसह्य व्हावे म्हणून त्यांस विनोदबुद्धी मिळालीय...

कायम कुणाचा उत्कर्ष पाहू न शकणाऱ्या समाजातील मानसिक रोगी,  उपदव्यापी माणसाला मृत्यूदूत जगातून नेण्यासाठी म्हणून त्याच्यासमोर येऊन पोहोचला.

"मृत्यूनंतर मला स्वर्ग मिळेल का नरक?”

"मृत्यूनंतर तुला भूत म्हणुनच इथे रहावे लागेल. तेही तुझ्या घरासमोर असलेल्या वडावर किमान वर्षभर तरी उलटे लटकुन रहावे लागेल.”

"अन त्यानंतर”?

"काहीं नाही...त्यानंतर त्याची तुला सवय होऊन जाईल.”

इथे वाचनात आलेला एक किस्सा आठवतो...एका धनिकाच्या नातवास आजोबांनी नवी कोरी मर्सिडीज ग़िपट केली. गाडीच्या चाव्या हाती देत आजोबांनी शॉर्ट ड्रायव्हला जाण्याची इछा व्यक्त केली. नातू हर्षोउल्हासात आजोबास गाडीत बसवून ड्राईव्ह करु लागला. चुकून एक सायकल स्वार मागून आला अन डॅश झाला. किंचित अशी रेग उमटली नव्या कोऱ्या गाडीवर! नातवाचा इगो दुखावला. गाडीबाहेर येऊन त्याने त्या सायकल स्वाराच्या कानशिलात हाणली. माणूस त्याच्या पाया पडू लागला. क्षमा मागितली. चुकून झल्याचे म्हणाला. आजोबांनी मध्यस्थी करुन नातवास पुन्हा गाडीत आणून बसवले.

"हा जो आतां तुझा अवतार पाहिला तो एकप्रकारे तुझा अहंकार होता. राग हा सैतानाचे दुसरे रूप होय. प्रत्येकाच्या मनी क्रोध नामक सैतान दडलेले असते. त्यावर अंकुश आवश्यक आहे. फार जुनी गोष्ट आहे...माझ्या आजीला एकदां मी विचारले की, काय गं आजी प्रत्येक वेळी तू सर्वांना बी-पॉझिटिव्ह असे सांगत असतेस, मग मला सांग प्रत्यक्ष सैतानाविषयी तू काय सांगशील? त्यावर पाण्याचा घोट पिऊन जे तिने सांगितले.. ज्यामुळे मी अवाक झलो. आज्जी म्हणाली...सैतान आपलं काम जन्मल्यापासून आजमितीला तेच करतोय. दुसऱ्याच वाईट कसे करायचे. त्यांत कधी बदल आलाय?”

ते ऐकून नातू अवाक झाला. गरीब सायकल स्वारास मारण्याचा पश्चात्ताप झाला. क्रोध, अहंकार, हे सारे सैतानी मार्ग, त्यावर केव्हांच जाऊ नये. असे आजोबा म्हणाले. मनातली भुतं ही अशीही असू शकतात.

मनाचे खेळ...म्हणजेच चिंता, भीती, घाबरट स्वभाव, दुसऱ्याचे वाईट कसं होईल यातच ज्याचे आयुष्य गेले असेल अशांना भूत या शब्दांत गुंतून रहावे लागते. अजून वेळ गेली नाही. स्वकर्तुत्वाने जे जगतात त्यांना भूतबाधा कधीच होत नाही. मनातली भुतं दूर करायची असतील तर एक मंत्र आहे जगण्याचा..."जगा अन जगू द्या!” धन्यवाद.
-इक्बाल शर्फ मुकादम 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

काकडा ८ मनापासून केलेली मनधरणी उपयोगी ठरतेच