श्याम कुलकर्णी : कृतीने जगलेला सर्वोदयी चळवळीतील कार्यकर्ता हरपला

सर्वोदय चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते, आदर्श शिक्षक, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते माणसांवर प्रेम करायचे तसेच प्राणिमात्रांवरदेखील तितकेच प्रेम करणारे आदरणीय श्याम नारायण कुलकर्णी ‘सर' यांचे ऐन दिवाळीत १९ ऑवटोबर २०२५ रोजी हृदयविकाराच्या धववयाने निधन झाले. उरण येथे प्रदीर्घ काळ वास्तव्य केलेल्या श्यामरावांचा जन्म १६ जानेवारी १९३९ साली कर्नाटक येथील चिकोडी मांजरी, येडूळ, कर्नाटक येथे झाला. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले त्यानंतर आईने मुलांचा सांभाळ केला सर आणि त्यांचे तीन भाऊ तसेच दोन बहिणी असे मोठे कुटुंब होते. विनोबाजी भावे यांच्या भूदान चळवळीशी संबंधित असणाऱ्या श्याम कुलकर्णी यांनी समाजवादी विचार, सर्वधर्मसमभाव, प्राणिमैत्री यांचा पुरस्कार केला. जीवनात विविध चटके, फटके, संघर्ष सोसत त्यांनी आपले आयुष्य साधेपणाने व्यतीत केले होते.

अतिशय गरीब परिस्थिती असल्यामुळे सरांनी स्वतःचे शिक्षण स्वतः मिळेल ते काम करून तसेच अनेकांकडे अश्रीत म्हणून राहूनच शिक्षण पूर्ण केले. त्या काळात सर विनोबांच्या कार्याला प्रभावित होऊन विनोबा भावेंच्या भूदान चळवळीमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून आणि उमेदीच्या काळात त्यांनी कामाला सुरुवात केली अतिशय आत्मीयतेने तळमळीने कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून सरांची ओळख निर्माण झाली. भूदान चळवळीचाच एक भाग स्वतः आचार्य विनोबा भावे हे उपोषणाला बसले तेव्हा सरांनी विनोबा भावे यांची मनोभावे सेवा केली; त्यांना विनोबांचे कपडेही धुण्यात आनंद वाटे. त्याचवेळी सरांना सहवास लाभला तो म्हणजे अण्णाभाऊ सहस्त्रबुद्धे यांचा. आण्णाभाऊ सहस्त्रबुद्धे हे समाजवादी पक्षाचे मोठे नेते होते. त्यांनी कुलकर्णी सरांना दिल्ली घेऊन गेले. सरांना दिल्ली येथे काम करण्याची संधी मिळाली.

इंदिरा गांधींनी ज्यावेळी आणीबाणी घोषित केली त्यावेळी विविध ठिकाणी गुप्त सभा होत असत. त्याच काळात कुलकर्णी सर हे उरणमध्ये विनोबा भावे यांच्या मार्गदर्शनाखाली सरोदे वाढीचे व्यवस्थापक म्हणून काम करत होते. त्याच काळात या गुप्त सभा घेण्यासाठी सुब्रमण्य स्वामी, ना ग गोरे, एस एम जोशी हे सरोदेवाडी येथे अनेक कार्यकर्त्यांबरोबर विचारांची देवाणघेवाण करत असत. याची माहिती काही समाजकंटकांनी पोलीस यंत्रणेला दिली. त्यावेळी उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाविस्कर यांनी सरांच्या कार्याची तसेच व्यक्तिमत्त्वाची पूर्णपणे माहिती असल्यामुळे त्यांनी श्याम कुलकर्णी सरांना अटक करण्यास नकार दिला. याच काळात सरांना यांचे सहकार्य मिळाले ते म्हणजे शांतीवन या संस्थेचे व्यवस्थापक गोविंदराव शिंदे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम देशपांडे, रंगा देशपांडे यांचे. मणी भवन, मुंबई येथे एका सभेमध्ये कुलकर्णी सर हे त्या सभेचे अध्यक्ष होते त्यावेळी या सभेला जयप्रकाश नारायण त्यांच्या पत्नी प्रभावती जयप्रकाश नारायण यादेखील उपस्थित होत्या. या कालखंडात सरांची ओळख एन आय हायस्कूलचे मुख्याध्यापक केंद्रे सर यांच्या बरोबर झाली. तेव्हा केंद्रे सर यांनी सरांना समजावले किंबहुना आग्रह केला आणि एन आय हायस्कूलमध्ये नोकरी करण्यास प्रवृत्त केले. सर १९७० साली एन आय हायस्कूलमध्ये रूजू झाले. सरांचं इंग्रजी भाषेवर असलेले प्रभुत्व विचारात घेऊन सरांना इंग्रजी विषयाची जबाबदारी देण्यात आली. सरांनी सत्तावीस वर्षे सर्विस केल्यानंतर १९९६-९७ मध्ये सर सेवानिवृत्त झाले.

कुलकर्णी सर सेवेत असताना सरांनी शिक्षक संघटनेचे नेतृत्व स्विकारले आणि शिक्षकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. नवीमुंबईचा भाग म्हणून नवी मुंबईसह पनवेल क्षेत्राला विशेष महागाई भत्ता म्हणून लागू झाला; परंतू नवी मुंबईचाच भाग असलेल्या उरण मधील सरकारी, निम सरकारी, तसेच अनुदानीत शाळा महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना हा विशेष महागाई भत्ता मिळत नव्हता. त्यावेळी फार मोठे आंदोलन करून, सतत पाठपुरावा करून उरणला हा विशेष महागाई भत्ता सूरु केला. सर जसे शिक्षकांच्या प्रश्नांवर लढत होते तसेच ते सामाजिक प्रश्नांवरदेखील लढत होते. १९८४ चा गौरवशाली आणि शौर्यशाली लढ्यामध्ये देखील सरांनी सहभाग घ्ोतला होता त्यावेळी त्या येरवड्याच्या तुरुंगात १० दिवस कारावास भोगला आहे. सर सक्रिय कार्यकर्ते होते तसेच ते उत्तम वाचक देखील होते त्याचप्रमाणे ते उत्कृष्ट लेखकदेखील होते. सरांनी पत्रकार अण्णा वेदपाठक यांच्याबरोबर पत्रकारिता सुरू केली सर त्या काळात ‘नवशक्ती' सारख्या अग्रगण्य असलेल्या वृत्तपत्रात सर पत्रकार म्हणून लिहू लागले. त्याच काळात 'साधना' या बहुचर्चित अंकात सरांचे विविध विषयावरचे लेख प्रसिद्ध होऊ लागले. वयाच्या ८७ वर्षा पर्यंत सर विविध विषयावरती लिहीत होते. सरांना वाचनाचा व्यासंग फार मोठा होता. सरांना कधीही भेटायला गेल्यानंतर समोर त्यांच्या लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया असे वृत्तपत्र तसेच एक कोरे कागद लावलेला पॅड त्याला लावलेले एक पेन हे दिसले नाही तर नवलच.

सरांचे लग्न झाल्यापासून तब्बल ६० वर्षाचा संसार, सरांची अर्धांगिनी मॅडम, हेमलता श्याम कुलकर्णी यांनी सरांना या संपूर्ण प्रवासात मोलाची साथ दिली. सरांनी कमावलेला एक आणि एक पैसा मॅडमच्या हाती देत आणि मॅडमनीदेखील स्वतःसाठी कधीही एकही पैसा खर्च केलेला नाही किंवा कुठे फिरायला चला म्हणून हट्ट केलेला सर दिवसभरात घडलेली कोणतीही प्रत्येक घटना मॅडमना सांगत असत. सरांचे संपूर्ण जीवन हे सतत संघर्षमय राहिले. गेल्यावर्षी मुलगा आनंद यांचे निधन झाले; सर त्यामुळे पूर्णतः खचले. परंतू सहनशक्ती एवढी अफाट होती त्यांनी चेहऱ्यावर कधीही ते दुःख दाखवून दिले नाही. आताच काही दिवसांपूर्वी एँघ् चा न्यानो ॲप डाऊनलोड करतांना कोणत्यातरी हॅकर्सने त्यांच्या भोळ्या स्वभावाचा गैर फायदा घेऊन पेन्शन खात्यावरील ५० हजार रुपयाची ऑनलाईन चोरी केली. वय वर्षे ८७ ‘एकमेव उत्पन्नाचे साधन पेंशन' त्यामधून झालेली ही फार मोठ्या रकमेची चोरी त्यामुळेदेखील सर मानसिक दृष्ट्या खचले. त्यांना सतत वाटे माझ्यानंतर या माझ्या कुटूंबाचे काय होईल ही चिंता त्यांनी आमच्या बरोबर मन मोकळे करताना सर बोलायचे; पण लगेचच स्वतःच म्हणायचे होईल सर्व ठिक. हा आत्मविश्वास घेऊन ते परिस्थितीवर मात करत आत्मविश्वासाने जगत होते.

           या सर्व परिस्थितीवर खरोखर मात करत सरांनी आपली दिनचर्या अतीशय नित्यनेमाने म्हणजे सकाळी लवकर उठून चालायला जाणे, योगा करणे, सकाळी भेटणाऱ्या प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करणे, रोज वृत्तपत्र वाचणे हे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सुरु ठेवले होते. कोणताही त्रास होत नसताना एकाएकी तीव्र हृदय विकाराचा झटका येतो काय आणि सरांची प्राणज्योत मालवते काय; कोणालाही विश्वास बसणे शक्य नव्हते. कारण सर आजारी पडलेत असे कधी ऐकले नाही.

सरांनी आपण खूप कोणीतरी मोठी व्यक्ती आहोत असा बडेजावपणा केला नाही शेवटपर्यंत खादीचे कपडे अगदी अंतर्वस्त्र देखील खादीचेच वापरत असत. आपल्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी आलेला व्यक्ती कोणत्या जाती-धर्माचा आहे याचा विचार न करता आपल्या कडे असलेले बौद्धिक ज्ञान सढळ हस्ते-निस्वार्थ भावनेने देणे आणि आलेल्या समस्याग्रस्तांची समस्या सोडविण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आधार देत राहिले. असे आपले श्याम कुलकर्णी सर ईहलोकात विलीन झाले. त्यांना भावपूर्ण श्रध्दासुमनांजली.
 -संतोष पवार, उरण 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

जीवन उजळवणारा आकाशकंदील