छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
चाळीतली मनोहारी दिवाळी
दिवाळी दिवाळी म्हणून जी म्हणतात ती आमच्या या चाळ संस्कृतीत आनंदात आणि उत्साहात साजरी केली जायची. घरात वडील एकटे कमावणारे होते. तरी त्या एकट्या माणसाच्या कमाईत आम्ही दणदणीत दिवाळी साजरी करायचो. त्यावेळी दिवाळीतल्या आनंदाला पारावार नसायचा. आजही आम्ही पोलीस चाळीतील आणि आमच्या माळ्यावरील दिवाळीच्या आठवणीत सहज रममाण होतो. कारण आता आमच्या दिवाळीच्या आनंदाला ती अज्ञानाची आणि निरागसतेची सोनेरी किनार नाहीये. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेण्यासाठी जो बाळबोध मेंदू लागतो तो आता दुनियादारीमुळे बथ्थड झालेला आहे.
माझे वडील पोलीस अंमलदार असल्यामुळे वयाची सुमारे २० वर्षे पोलीस लायनीतच गेली. एकमेकासमोर दोन चाळी. एका मजल्यावर १८ खोल्या म्हणजे जणुकाही एक महाकुटुंबच होय. चाळ संस्कृतीत दिवाळीला फार महत्त्व होते. पंधरा दिवस आधीच दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू व्हायची. प्रत्येक घरात एक दिवस ठरलेला असायचा. सगळ्या गृहिणी त्या दिवशी त्या घरात फराळाच्या मदतीसाठी जायच्या. मग त्यांचं चहापाणी तिथेच असायचं आणि नेमकं त्याचवेळी आम्ही तिथे टपकायचो. संपूर्ण माळ्यावर फराळाचा सुवास दरवळायचा. या दिवाळीच्या दिवसात नळावरची भांडणंही बंद व्हायची तिथे आज कुणाच्या घरी फराळाला जायचं हीच चर्चा असायची. त्यावेळी निसर्गही सुंदर असायचा. गोड गुलाबी थंडी पडायची. आम्हाला दिवाळीची सुट्टी असायची. अख्खा दिवस गच्चीत पतंग उडवायचो. खबर काढून नाश्त्याला योग्य ठिकाणी हजर व्हायचो. किती छान सुगीचे दिवस असायचे ते. आता आम्ही पलॅटमध्ये कोंडलेल्या अवस्थेत राहतो. कोणताही सण असू दे; सर्वांचे दरवाजे बंद म्हणजे बंद. एकाच्या घरात काय चाललंय ते बाजूच्या पलॅटवाल्यांंनाही समजत नाही, इतके आम्ही एकलकोंडे झालो आहोत.
माझ्या शाळकरी वयात आम्ही लॅमिंग्टन रोड म्हणजे सध्याच्या भडकमकर मार्ग पोलीस कॉलनीत राहायचो. एका मजल्यावर अठरा खोल्या आणि सर्वांना एकच सामायिक गॅलरी. सामायिक नळ, सामायिक शौचालये. सर्व खोल्यांचे दरवाजे एकाच दिशेला म्हणजे पश्चिम दिशेला उघडायचे. सकाळी सूर्य उगवायच्या आधीच सगळ्यांचे दरवाजे उघडायचे ते रात्री अकरा बारा वाजताच बंद व्हायचे. स्त्री वर्गापैकी कोणीही कोणाच्याही घरात बिनदिक्कत ये-जा करायचं. एका शेजारच्या घरातील वस्तू, पदार्थ, जिन्नस या घरातून त्या घरात बिनदिक्कत फिरायचे. कसलाही विधिनिषेध किंवा औपचारिकपणा नव्हता. बऱ्यापैकी एकोपा जपून होती सर्व कुटूंबं. म्हणजे कोणाची नळावरची भांडणं व्हायची नाहीत अशातला प्रकार नव्हता, परंतु अशी भांडणं फार दिवस टिकायची नाहीत. आमच्या पोलीस कॉलनीत सर्व सण अगदी धुमधडाक्यात साजरे व्हायचे. दिवाळी म्हणजे तर पर्वणीच. आठ दिवस अक्षरशः चंगळजत्रा असायची.
शाळेची सहामाही परीक्षा संपलेली असायची. आमच्या आईला मोठे ॲल्युमिनियमचे डबे भरुन भरून दिवाळीचे सर्व पदार्थ करायची भारी हौस होती. दिवाळीच्या आठ-दहा दिवस आधीपासूनच आमच्या आईची वेगवेगळी पिठे, मसाले, ड्रायफ्रूट्स, रवा, मैदा, तेल, तूप, डालडा इत्यादी पदार्थ मिळवायची घनघोर लढाई चालू असायची. माझा आपण बारमध्ये मित्र असल्याने या वस्तू सहज मिळायच्या. एक विजय पालवणकर हा मित्र मैद्याच्या मिलवर नेवून दोन किलो मैदा आणि रवा द्यायचा. आईचे बेसन, रवा, मैदा निवडणे चाळणे, अशी काम चालू व्हायची. आमच्या मजल्यावरील इतर घरातून मुली आणि बायका एकत्र येऊन करंज्या लाटायच्या. शंकरपाळ्या कापून त्या भाजून द्यायच्या. बेसनचे, रव्याचे लाडू वळून द्यायच्या. साच्यातून शेव आणि चकल्या काढणे, तेलात भाजणे वगैरे सर्व प्रकार दुपारच्या जेवणानंतर चालू व्हायचे ते अगदी अंधार पडेपर्यंत चालू असायचे. जोर काढून चकल्या, शेव गाळण्याचे काम मला करायला लागायचे. अगदी दिवाळीच्या दिवसापर्यंत प्रत्येकाच्या घरात आलटून-पालटून हाच कार्यक्रम असायचा. सर्वांच्या घरात दणकावून दिवाळीचे पदार्थ बनवले जायचे. या सर्व पदार्थांना पुणे, नाशिक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा वेगवेगळ्या चवी असायच्या. प्रत्येक घरातले पदार्थ चवीला वेगवेगळे लागायचे. कारण सगळे वेगवेगळ्या विभागातले असल्याने प्रत्येक पदार्थावर त्यांच्या विभागाचा आणि चवीचा परिणाम झालेला जाणवायचा.
पुरुष मंडळी घराला आणि एकत्र येऊन गॅलरीतील भिंतीना रंग लावणे यात मशगूल असायचे. ज्येष्ठ व्यक्ती त्यांना मार्गदर्शन करत असत. किंबहुना चुकल्यास ओरडत असत. ते पोलीस असल्याने तरुणांना त्यांचा चांगलाच धाक असे. तरुण मुले काट्या तासत वेगवेगळे कंदील बनवण्यात गर्क असायचे. कुणाचा कंदील वेगळा याची जणुकाही स्पर्धाच लागायची. काय एकेकाची कलाकारी असायची. सुंदर रंगसंगतीचे कागद, विलक्षण नक्षीकाम, एकंदरीत ख-या अर्थाने रंगीबेरंगी दिवाळी असायची. तो रेडीमेडचा जमाना नव्हता. केव्हा केव्हा सगळे मिळून एकाच प्रकारचे आणि एकाच रंगांचे कंदील बनवून लावत. तेव्हा त्या माळ्यावरील रोषणाई अत्यंत नयनमनोहारी दिसायची. संध्याकाळ होताच कंदील, दिवे, आणि रंगीबेरंगी तोरणांनी आमचा माळा प्रकाशने उजळून निघायचा.
तरुण मुले बायका, मुलींना दाराला तोरण लावायला मदत करत असत. सगळ्या कामांना सर्वांचा हातभार लागायचा . तेव्हा सौहार्द आणि एकोपा याची जाणीव व्हायची. मी सर्व खोल्यांच्या मधल्या खांबांवर मुक्तहस्त नक्षी काढून खडूने रंगवीत असे. तसेच मुख्य भिंतीवर मोठा गणपती रंगवीत असे म्हणून माझे सर्वत्र कौतुक करण्यात येई. सर्वांच्या दरवाज्यासमोर उत्कृष्ट रांगोळ्या रेखाटल्या जात असत त्यातही जणुकाही रांगोळीची स्पर्धा लागली आहे असेच वाटायचे. मी काढलेली रांगोळी हे आमच्या माळ्यावरचे आकर्षण असे. कारण मी विषयानुसार रांगोळी काढत असे. एक महिला अप्रतिम टिपक्याची रांगोळी काढत असे तिचे त्यात रंग भरण्याचे काम अत्यंत सफाईदार आणि नेत्रसुखद असायचे .
दिवाळीच्या दरम्यान नवीन कपडे, रांगोळी, उटणे, कारेटी वगैरे घरात यायची आणि मग आतुरता असायची दिवाळीच्या पहिल्या अभ्यंगस्नानाची. दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी सर्वात आधी उठून बिल्डिंगच्या खाली येऊन कोण फटाके लावतो ह्याची चढाओढ असायची. दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी पहाटे तीन-चार वाजताच कोणीतरी रशीबार पेटवायचं. त्यावेळी चौकोनी खोक्यातला कॅप्टन नावाचा मोठा बार मिळायचा आणि हिरव्या सुतळीचा रशीबार मिळायचा. धड्डड्डम्म्म्म्करून मोठा आवाज व्हायचा आणि आमचा माळाच नव्हे; तर आमची पूर्ण चाळ अर्धवट झोपेतून जागी व्हायची. या आवाजाने आमचे शीघ्रकोपी पिताश्री वैतागायचे; पण फार काही बोलायचे नाहीत. या फटाक्यांच्या आवाजाच्या आधीच आमच्या मातोश्री उठलेल्या असायच्या. मग आमची लगबग चालू व्हायची. घाई असायची खाली जाऊन इतर मुलांबरोबर फटाके उडवण्याची. आईने उटणे तयार करून बाथरूम मध्ये ठेवलेलं असायचं. पटापट दात घासायचे आणि बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करायची यासाठी घाई गडबड व्हायची. मोती साबण वगैरे असली काही थेरं त्यावेळी नव्हती. पण आंघोळीसाठी साबणाची नवीन वडी मिळायची. आधी अंगाला साबण लावायचा, मग उटणं लावायचं आणि भसाभसा अंगावर पाणी ओतून घ्यायचो.. की झाली आमची पहिली आंघोळ.
दरवाजाच्या बाहेर उंबऱ्याच्या बाजूला कारेटं चिरडलं आणि बोंब मारली की माझ्या दिवाळीला सुरुवात व्हायची. पुन्हा घरात येऊन फटाके निवडणे, मोठ्या माळा सोडवणं असा प्रकार असायचा. लवंगीची माळही सोडून एक एक लवंगी वेगळी करायचो. ताजमहालची लाल फटाक्यांची माळ सोडवायची आणि एकेक लाल फटाकडी वेगळी करायची. लक्ष्मी बारचं एक पाकीट सोडून पाच लक्ष्मी बार वेगवेगळे करायचे. असेच पाच-दहा चिमणी बार सुट्टे करायचे. मग हे सर्व फटाके, एक माचीस आणि एक-दोन उदबत्या प्लास्टिकच्या पिशवीत भरून बिल्डींग खाली जायचं. गॅलरीतून डोकावून एक-दुसऱ्याला पाहून सर्व मुलं भरभर आपापले फटाके घेऊन बिल्डींग खाली यायचे. मग दीड-दोन तास अखंड फटाक्यांचा कडकडाट चालू राहायचा. मध्येच कोणीतरी कानाचे पडदे हलवणारा रशीबार लावायचा. तोपर्यंत लख्खं उजाडलेलं असायचं. हाताला फटाक्यांच्या पावडरचा चंदेरी मुलामा चढलेला असायचा. मग पुन्हा घरात एंट्री मारायचो. हात पाय धुवायचे आणि फराळ करायला बसायचं. सगळेजण एकत्र बसत आणि एकाच परातीत फराळाचे पदार्थ ठेवले जायचे. त्यावेळी प्रत्येकासाठी वेगळी प्लेट असा प्रकार नव्हता तरी सगळे आनंदाने मिटक्या मारत फराळ करायचे. आठवडाभर दिवाळीच्या पदार्थांचा वास नाकात बसलेला असायचा.त्यामुळे दिवाळीचे पदार्थ खायची इच्छा व्हायची नाही. अगदीच नाइलाज म्हणून दोन-तीन करंज्या किंवा चकल्या कुस्करून चहात बुडवून खायच्या हेच एक आवडीचं खाणं होतं. दिवाळीला मिठाई वगैरे प्रकार त्यावेळी फारसे प्रचलित नव्हते किंवा आम्हाला तेंव्हा कोणी मिठाई देत नव्हतं असं देखील असू शकेल.
सकाळी साधारण नऊ दहा वाजता संपूर्ण माळा लखलखीत सजलेला असायचा. सर्वांच्या दरवाजात मुली आणि बायका रांगोळी घालत असायच्या. लाडू ,करंज्या ,शंकरपाळे ,शेव, चकली ,चिवडा आणि अनारसे इत्यादी पदार्थांनी भरलेली ताटं या घरातून त्या घरात पोचती केली जायची. या देवाण-घेवाणीतच दिवस मावळतीला लागायचा. वेगवेगळे पदार्थ आणि त्यांची चव घराघरात पोहचवायची . बायका एकत्र आल्या की त्या फराळावर चर्चा व्हायच्या. संध्याकाळ होताच गॅलरीमध्ये पुन्हा मुली आणि बायका नव्याने रांगोळी काढायला बसायच्या. विविधरंगी दिव्यांनी आणि कंदिलांंच्या उजेडात आमची गॅलरी आणि संपूर्ण माळा उजळून निघालेला असायचा. अंधार पडल्यानंतर पुन्हा एकदा चाळीखाली आमच्या मुलांत फटाके उडवण्याची स्पर्धा लागायची. किंबहुना पोलिसांनी पकडून आणलेल्या फटाक्यांची आतषबाजी व्हायची. ७ /८ जण एकाच रांगेत अंतरावर उभे राहून आळीपाळीने सुतळी बार लावायचे तेव्हा बंदुकीतून लागोपाठ गोळ्या सोडल्यासारखे वाटायचे. फटाक्यांची कोणतीही कमतरता नव्हती .
अभ्यंगस्नान, पहिली आंघोळ, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, भाऊबीज या सर्व दिवसात दिवसभराचा कमी-अधिक प्रमाणात हाच कार्यक्रम असायचा. आमच्या घरात पाहुण्या-रावळ्यांची अखंड ये-जा असायची. आमच्या संपूर्ण माळ्यावर, कॉलनीत, सर्वच चाळींमध्ये अशीच दणदणीत दिवाळी साजरी व्हायची. प्रत्येकाच्या घरातून दिवाळीचा आनंद आणि उत्साह अगदी ओसंडून वाहत असायचा. दिवाळीचा हा आनंद आठ-दहा दिवस अखंड ज्योतीप्रमाणे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लखलखत असायचा. दिवाळी दिवाळी म्हणून जी म्हणतात ती या आमच्या चाळ संस्कृतीत आनंदात आणि उत्साहात साजरी केली जायची. घरात वडील एकटे कमावणारे होते. तरी त्या एकट्या माणसाच्या कमाईत आम्ही दणदणीत दिवाळी साजरी करायचो. त्यावेळी दिवाळीतल्या आनंदाला पारावार नसायचा. आजही आम्ही पोलीस चाळीतील आणि आमच्या माळ्यावरील दिवाळीच्या आठवणीत सहज रममाण होतो. कारण आता आमच्या दिवाळीच्या आनंदाला ती अज्ञानाची आणि निरागसतेची सोनेरी किनार नाहीये. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेण्यासाठी जो बाळबोध मेंदू लागतो तो आता दुनियादारीमुळे बथ्थड झालेला आहे.
फटाक्यांच्या धुमधडाम आवाजामुळे आता कानाला त्रास होतोय. दिवाळीचे पदार्थ बनविण्यासाठी आता वेळही नाही आणि खाण्याची फारशी इच्छाही नाही. डायबेटीसच्या भीतीने आता मिठाई खाता येत नाही. पूर्वी मी छान रांगोळीने चित्र काढायचो. पाठदुखीमुळे आता जमिनीवर बसून रांगोळी काढणं कठीण झालंय. नवीन कपड्यांचं अप्रूप राहिलं नाहीय. मात्र तरीही मला दिवाळीतील दिव्यांची रोषणाई आणि लखलखाट आवडतो. म्हणून पलॅटमधल्या दारावर दीपमाळ आणि दारापुढे मेणबत्तीचे दिवे लावतोय. दरवाज्यात विकत आणलेला कंदील टांगतोय आणि स्टिकरची रांगोळी चिटकावतोय. शांतपणे बसून राहणं हेच आता दिवाळीतलं काम. डोक्यात वेगवेगळे विचार येत राहतात. मग एकांतात बसल्यावर आठवते ती आणि आम्ही लहानपणी साजरी केलेली चाळीतली दिलखुलास मनोहारी दिवाळी.
- शिवाजी गावडे