छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
दिवाळीतला किल्ला
तो नुसता किल्ला नव्हता. त्यातून मुलं खूप काही शिकत होती. नियोजन, एकता, आपापसातली मैत्री, प्रेरणा, काही वेळेस माघार घेणं, श्रमाची, कष्टाची जाणीव आणि अजून खूप काही ...यातुनच त्यांना आयुष्यभर उपयोगी पडणारे शिक्षण त्यांना मिळत असते. मुलांना मातीत चिखलात खेळू दे शिवरायांकडून थोडी स्फूर्ती घेऊ दे आवडीचा किल्ला बनवू दे.
झाली एकदाची सहामाहीची परीक्षा... अभ्यासातून पोरं मुक्त झाली .आता दिवाळीची सुट्टी सुरू.. पण पोरांना खरे वेध लागले होते ते किल्ला बनवण्याचे...तशी त्यांची चर्चा आधीच सुरू झाली होती. शेवटचा पेपर झाला की संध्याकाळी सोसायटीतल्या पोरांची सगळी गँग खाली जमली. चवथी.. पाचवीतल्या छोट्या मावळ्यांबरोबर नववीतले दोन सेनापती.... दादा होते.
दगड, विटा,माती कुठून कशी कोणी आणायची याची खलबतं सुरू झाली. मुख्य लागणार होत्या विटा..मागच्या गल्लीत एका इमारतीचे काम सुरू होते. मग त्यातल्या त्यात साध्याभोळ्या दिसणाऱ्या आणि गोड बोलणाऱ्या दोन पोरांना या कामगिरीवर पाठवण्यात आले. ते दोघे अदबीने जाऊन तिथल्या सुपरवायझरच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले, "काका एक रिक्वेस्ट होती. आम्हाला दिवाळीतल्या किल्ल्यासाठी विटा हव्या आहेत. मिळतील का? दिवाळीनंतर आम्ही परत करतो.”
काकांना हसू आले. ते गावाकडून आलेले होते.. म्हणाले,
"देतो की.. पण अरे आता मातीच्या विटा नाहीत.. या सिमेंटच्या जड आहेत. त्या तुम्ही कशा नेणार ?”
"काका ते आम्ही बघतो.”
"तुम्हाला जमतय का न्यायला ....मग घ्या या दहा-बारा विटा.”
कामगिरी फत्ते...
मुलं खुश. सायकली आणल्या.. कॅरिअरवर दोन दोन विटा घेऊन आले. आसपास मिळतील तिथून दगड... किल्ल्याच्या बांधकामासाठी येत होते. छोट्या मावळ्यांना माती आणायला पाठवले जात होते. कोणी घरातून पोती आणली होती. तोपर्यंत अंधार पडायला लागला.
आयांच्या हाका सुरू झाल्या..
मातीने बरबटलेले शर्ट पॅन्ट ...
पोरं घरी गेली.
दुसरे दिवशी सकाळीच गँग परत खाली हजर. दोन्ही दादांनी पन्हाळा किल्ल्याचा अभ्यास केला होता. यावेळेस तोच करायचा ठरला.
दादांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम सुरू झाले.
महाराजांचे सिंहासन तयार झाले. गडावर विहीर करणं अवघड व्हायला लागल्यावर पायथ्यालाच विहीर केली गेली. मध्येच दोन चार जणांची भांडण सुरू झाली. त्यांच्यात समझौता केला गेला.
"खरं तर लाल मातीच्या चार विटा हव्या होत्या असं दादा म्हणाला.”
मग दोघांनी..न विचारता शेजारच्या बागेतून विटा चोरून आणल्या.
"चोरी करणं पाप आहे. महाराजांना असे वागणे कधी आवडले नसते.” असं सांगून दादानी चोरून आणलेल्या विटा परत करायला लावल्या.. त्या दोन मुलांना रडूच आले....
पायऱ्या करताना अडचणी येत होत्या. तहानभूक विसरून पोरं कामं करत होती.
बऱ्याच विचारांनंतर तोफेची जागा ठरली. दोन वाघ होते त्यांच्यासाठी गुहा करण्यात आली.
किल्ला लवकर झाला तर अळीव पेरता येतील म्हणजे नॅचरल लुक येईल म्हणून दोन दिवस पोरं सतत कामं करत होती. दोन पोरींना किल्ल्याच्या डेकोरेशनची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी हिरव्या कागदाची छान झाडं तयार केली. मोठी कमान किल्ल्याच्या दरवाजापाशी लावली. गवळणी विहिरीजवळ ठेवल्या.
पोरींनी ”पन्हाळगड” असं कार्डबोर्डवर सुरेख अक्षरात लिहून आणले.
किल्ल्याच्या नावाची पाटी तयार होती... पण हा पन्हाळा वाटतोय की नाही हे कळत नव्हतं. दादाला आयडिया सुचली तो म्हणाला..
"किल्ला अंडर कन्स्ट्रक्शन आहे असं आपण सांगूयात.” मग तसंच सांगायचं ठरलं ..
खाली गाव घरं, रस्ता, झाडं.. झुडपं भराभर तयार झाली. खरंतर मारुतीचं देऊळ करायचं होतं.. पण मारुती कोणाकडेच नव्हता. एक जण शंकराची छोटी मूर्ती घेऊन आला. ती मूर्ती डोंगरावर ठेवण्यात आली.
तटबंदी घालून झाली. पोरं आपणच केलेल्या किल्ल्याकडे कौतुकाने बघत होती. घराघरातून मातीची खेळणी आणली गेली. किल्ला सजवला गेला. डोळ्यात तेल घालून पहारा देणारे मावळे दोघांनी आणले होते.
"तुझ्यापेक्षा माझेच मावळे जास्ती शक्तिमान आहेत” असा थोडा वाद त्यांच्यात निर्माण झाला. पण गडाच्या संरक्षणासाठी चारही मावळे ठेवावे असा निर्णय देण्यात आला.
"आपला किल्ला फार भारी झालेला आहे. डोळ्यात तेल घालून त्याचे रक्षण करा.” दादांनी बजावले. किल्ल्याचे राखण करण्यासाठी दोन दोन तासांच्या बॅच ठरवण्यात आल्या. आता किल्ला फायनली पूर्ण झाला होता. दादांनी शिवाजी महाराजांना त्यांच्या सिंहासनावर बसवले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. इतिहासातही असेच घडले असेल.... शिवाजी महाराजांचे प्रेम... तसेच त्यांची शिकवण मुलांच्या मनात जागृत करणारा हा दिवाळीतला किल्ला बनवायला मुलांना प्रोत्साहन द्या.
कारण तो नुसता किल्ला नव्हता. त्यातून मुलं खूप काही शिकत होती. नियोजन, एकता, आपापसातली मैत्री, प्रेरणा, काही वेळेस माघार घेणं, श्रमाची, कष्टाची जाणीव आणि अजून खूप काही ....यातुनच त्यांना आयुष्यभर उपयोगी पडणारे शिक्षण त्यांना मिळत असते.
मुलांना मातीत चिखलात खेळू दे
शिवरायांकडून थोडी स्फूर्ती घेऊ दे
आवडीचा किल्ला बनवू दे
महाराजांचा जयजयकार करू दे..
तुम्हीही म्हणा...
"छत्रपती शिवाजी महाराज की जय”
-नीता चंद्रकांत कुलकर्णी