छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
वेळेवर मन हलकं केलेलं बरं!
त्या कुटुंबाची यावेळची दिवाळी वेगळीच साजरी झाली. दोन्हीकडून एकमेकांना समजण्याचा, काळजी घेण्याचा प्रयत्न होता. आईने घरी भजन ठेवले. सुनेची ओळख करून दिली. अमेरिकेतुन आणलेले चॉकलेट व केसरची छोटी डबी सर्वांना दिली. आईसाहेबांचा उत्साह तर बघण्यासारखा होता. यावेळेस बाबा व अजयला गप्पा मारताना बघून आईचे डोळे सारखे भरून येत होते. हे आनंदाश्रु ती पदराने पुसत होती. मनोमन देवाचे आभार मानत होती.
काही दिवसांपासून अजय खूप शांत शांत होता. नेहमीप्रमाणे गप्पा नव्हत्या. त्याला शांत बघायची सवयच नाही. अनिताने शेवटी विचारलेच..काय झाले? बरं वाटत नाहीये का? की आॉफिसचे काही टेंशन ?
अजय म्हणाला, तसं काही नाही गं. काल परागला अचानक भारतात जावे लागले. त्याच्या बाबांना बरं नाहिये म्हणून. हे ऐकून मलापण आई बाबांची आठवण येतेय. आता दोघांचे वय झालंय.या तीन वर्षांपासून आपण भारतात जाऊ शकलो नाही. फक्त फोनवर काय तेवढं बोलणं होतं. तेही आईबरोबरच. बाबांबरोबर तर तेवढंही बोलण होत नाही. मला खूप अपराधी असल्यासारखे वाटतंय. बाबांबरोबर मोकळेपणाने कधी बोलल्याचे आठवतच नाही. प्रत्त्येक वेळी असंच होतं. बाबांच्या मनातही बऱ्याच गोष्टी असतील ना.कधी त्यांच्या मनातलं समजायचा प्रयत्नच केला नाही. त्यांच्या आयुष्यातील चढ उतार, प्रश्न, पैशाचे प्रोब्लेम, ऑफिसचे टेंशन, त्यांनापण कधी ‘बरं वाटतं नाहिये' असं झालं असेलच ना. आता नोकरी केल्यानंतर मला कळतंय किती कठीण काम आहे हे . त्यांनी कसे मॅनेज केले असेल ? माझे व ताईचे कॉलेज शिक्षण साधारण एकाच वेळेस झाले. जेमतेम मिडल क्लास परिस्थिती, बाबा एकटेच कमविणारे, घरी आई सर्व छान सांभाळत होती. पण बाबा नेहमी मागेच राहिले. त्यांच्याही काही इच्छा असतीलच ना. अगं! आई नेहमीच महत्वाची ! पण बाबांना का विसरलो मी? आईने नऊ महिने पोटात सांभाळले. घरही छान सांभाळले, बाबांनीपण कष्ट केले. नोकरी केली. पैसे कमविले. स्वतःला मागे ठेवून घराच्या, मुलांच्या आवश्यकता पूर्ण केल्या. मला पंचवीस वर्षे सांभाळले. आपल्या परिस्थितीच्या बाहेर जाऊन अमेरिकेला जायची माझी इच्छा पूर्ण केली.‘बाबा म्हणजे पाठीचा कणा' म्हणून मागे राहून घराला आधार देत होते का? पण मी त्यांना का समजू शकलो नाही? त्यांनी आपल्या किती तरी इच्छा मागे ठेवून आमचं ऐकलं. मागे आपण भारतात गेलो, तेंव्हा मी आपल्या मित्रांना जास्त वेळ दिला. आई बाबांनी काही सूचनापण दिल्या होत्या. आई म्हणाली होती... "अरे, कुलकर्णी काकांना भेटून ये. त्यांना बरं नसतं आता. तुझी आठवण नेहमी काढतात.”
आईला आपल्या घरी भजन करायचे होते. तिला आपल्या सूनेला मैत्रिणींना दाखवायचे होते. आपण शेजारच्या लोकांना भेटावे, असे तिची इच्छा होती. एकदा सर्वांना घरी बोलवायचे ठरविले होते तिने. पण तेही जमले नाहीच. आई बोलूनतरी दाखवते, बाबा मात्र शांत असतात म्हणजे दिसतात. किती छोट्या अपेक्षा होत्या त्यांच्या आपल्याकडून. पण त्याही आपण पूर्ण करत नाही. काहीही विरोध न करता, तक्रार न करता, आपल्या मनाची सहज समजूत घालतात. याउलट आपल्या येण्याची जय्यत तयारी करून ठेवतात.
आता यावेळेस आपण गेलो की पूर्ण वेळ आई बाबांनाच द्यायचा. काही दिवस घरी राहून, तू तुझ्या आई बाबांना भेटायला जा.तेथे रहा. नंतर मी येईनच. त्यांच्या लहानसहान इच्छा पूर्ण करायच्या. त्यांची सर्व कामे मार्गी लावायची. मेडिकल चेक अप, घरातील आवरासावर, ठरवून सगळी कामं करून येऊ. त्यांच्या वयाप्रमाणे, सवयीनुसार घरात काही बदल करुन घेऊ.
यावेळेस अजय अनिता ‘इंडिया व्हिजिट प्लॅन ठरला होता. फक्त घर, आई बाबा, मुख्य म्हणजे यावेळेस तो बाबांना वेळ देणार होता. बाबांचा हात हातात घेऊन त्यांच्याशी गप्पा मारणार होता. मला तुमच्याबद्दल काय वाटतं, तुम्ही आमच्याकरिता जे काही केले, त्याबद्दल तो धन्यवाद म्हणणार होता. त्यांना मिठी मारणार होता. त्यांच्या तब्येतीची चौकशी करणार होता. पेंडिंग कामं पूर्ण करणार होता.
म्हणतात ना, ‘रिश्ते निभाने के लिए बुद्धि नहीं, दिल की शुद्धि होनी चाहिए ।'
येथे आई बाबा दोघेही अजय अनिता येणार म्हणून खूप आनंदात आहेत.
आई बाबांना म्हणाली, यावेळेस आपण आपल्याकडून काही सांगायचे नाही, काही काम सांगायची नाही. याला भेटा, त्यांना फोन करा असं काही म्हणायचे नाही. एकतर मुलांना वेळ कमी असतो. त्यांचे काही कार्यक्रम ठरलेले असतात. खरेदी असते, वैशाली' मधे सर्व मित्र जमतात, धमाल करतात. एकदा का पुन्हा परत अमेरिकेत गेले की त्यांना तरी कुठे वेळ मिळतो? ऑफिसचे काम, घरचे काम सर्व त्यांनाच तर करायचे असते.
आपण सर्व साहित्य घरी आणून ठेवूया. त्यांना जेंव्हा वेळ असेल ते जे म्हणतील तेवढं करायचे. सामान काय, नंतरही वापरता येते. मी त्या वेळेस भजनाला वगैरे काही जाणार नाही. आपण घरातच असायला हवे नाही का? असे आईने ठरवूनच ठेवले.
आई बाबांना म्हणाली...अहो तुम्ही घरी घालायला काही नवीन कपडे घेऊन या. नवीन टॉवेल, टॉयलेट पेपर, बिसलेरी पाण्याच्या बाटल्या अशी आईंने लिस्टच बाबांना दिली. अजय अनिताची खोली स्वच्छ करून ठेवली. एअरपोर्टवर जायला टॅक्सी व नंतरही येथे फिरायला टॅक्सी ड्रायव्हर बरोबर बोलून ठेवले.
आईने मावशींकडून फराळाचे सर्व पदार्थ तयार करून घेतले. दिवाळीची सर्व तयारी हळूहळू सुरू केली.
यावेळेस अजय अनिताला काय द्यायचे? या विचारात आई होतीच..तेंव्हा बाबा म्हणाले, अगं! काही 'Policies' आहेत ते, या महिन्यात मॅच्युअर होतील. तेंव्हा तुला काय द्यायचे असेल ते दे.काही प्रश्न नाही. आईने अगदी दोन पाकिटं तयार करूनच ठेवली.
दोघेही एकमेकांना भेटायची आतुरतेने वाट बघत होते. यावेळेस दोघांचा ‘माइंडसेट' मात्र वेगळाच होता.
यावेळेस दिवाळी वेगळीच साजरी झाली. दोन्हीकडून एकमेकांना समजण्याचा, काळजी घेण्याचा प्रयत्न होता. आईने घरी भजन ठेवले. सुनेची ओळख करून दिली. अमेरिकेतुन आणलेले चॉकलेट व केसरची छोटी डबी सर्वांना दिली. शेजारच्या सर्वांना एकत्र बोलावून अजय अनिताशी ओळख करून दिली. छान पार्टीच केली. अजय अनिता ओळखीच्या काका-काकूंना भेटून आले. आई बाबांना जेथे एकटं जाण जमत नाही, तेथे टॅक्सी ने घेऊन गेले. अजयने आईच्या हातचे सर्व पदार्थ खाल्ले. लहानपणी खाल्लेल्या काही पदार्थांची डिमांड केली. अजयने बाबांसाठी टी शर्टस् आणले. जाताना मला हे सर्व न्यायचे आहे असं म्हणून एक लिस्ट आईच्या हातात दिली.
आईसाहेबांचा उत्साह तर बघण्यासारखा होता. यावेळेस बाबा व अजयला गप्पा मारताना बघून आईचे डोळे सारखे भरून येत होते. हे आनंदाश्रु ती पदराने पुसत होती. मनोमन देवाचे आभार मानत होती.
अजय बाबांना त्यांच्या नोकरीबद्दल, तुम्ही पैशाची गुंतवणूक कसे करत होता? त्यावेळचे आॉफिस कल्चर कसे होते? एकंदरीत बाबांना बोलतं करत होता. त्यांचे मन समजायचा प्रयत्न करत होता. कुठेतरी अजयला समाधान मिळत होतं. बाबापण खूप खुश होते. यावेळेस दिवाळी वेगळीच पार पडली. बाहेरच्या दिव्यांच्या प्रकाशापेक्षा, प्रत्येकाच्या अंतर्मनात जास्त प्रकाश होता. मन उजळून निघाले होते.
लहानपणी रस्ता पार करताना एक नियम शिकवला होता. "थोडं थांबा, डावीकडे बघा मग उजवीकडे बघा, मग पुन्हा डावीकडे बघून रस्ता पार करा.” खरंय, हाच नियम आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर पाळावा, सुसाट धावताना, थोडं थांबावं, काही राहिलं का? द्यायचं, घ्यायचं बोलायचं याचा विचार करावा. वेळेवर मन हलके करून टाकावे. म्हणजे पुढे पश्चात्ताप करायची वेळ येणार नाही.
इतरांच्या आनंदासाठी केलेला प्रयत्न स्वतःचा आनंद द्विगुणित करतो -संध्या बेडेकर