बेलूर येथील देखण्या चेन्नकेशवाचे मंदिर

सुप्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे बेलूर. येथे भगवान चेन्नकेसव यांना समर्पित प्रसिद्ध होयसला मंदिर आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांसाठी नामांकित तीन होयसाळ मंदिरांपैकी हे सर्वोत्कृष्ट आहे. होयसाळ मंदिरे सूक्ष्म आणि गुंतागुंतीच्या कोरीव कामांसाठी आणि धातूसारख्या पॉलिशिंगसह शिल्पांसाठी ओळखली जातात. श्री चेन्नकेसव मंदिर हे आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे.

बेलूर गाव होयसाळ राजांची पहिली राजधानी होती. यागची नदीच्या काठावर वसलेली ही नगरी पूर्वी वेलापूर म्हणूनही ओळखले जायची. त्या वेळच्या राहणीमानाची व सुबत्तेची साक्ष ही देवळे देतात. तेव्हाचे राजे रसिक होते, कलाकारांची कदर करीत होते. मंदिरांमुळे प्रजा उत्सवाच्या निमित्ताने एका ठिकाणी जमत असे. त्यात धर्माबरोबरच सामाजिक एकीकरणाचा हेतूही साध्य होत असे. बेलूरवरही दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक कफूर याने इ. स. १३२६मध्ये हल्ले केले. त्यानंतर विजयनगरचा संस्थापक राजा हरिहरने याचा जीर्णोद्धार केला.

चेन्नकेसव मंदिर होयसाळ स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. १११७ मध्ये तलकड येथे चोलांवर विजय साजरा करण्यासाठी राजा विष्णुवर्धनने हे बांधले होते. मंदिर पूर्ण होण्यासाठी १०३ वर्षे लागली आणि विष्णुवर्धनाचा नातू वीरा बल्लाळ घ्घ् याने हे कार्य पूर्ण केले. तारेच्या आकाराच्या चबुतऱ्यावर उभ्या असलेल्या मंदिराला तीन दरवाजे आहेत. श्री चेन्नकेसवाच्या पत्नी सौम्यनायकी आणि रंगनायकी यांच्यासाठी आणखी दोन तीर्थस्थाने आहेत.

मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला पुष्करणी किंवा पायऱ्या असलेली विहीर आहे. प्रवेशद्वारावरील द्रविड शैलीतील राजा गोपुरम ही नंतर विजयनगरच्या राजांनी जोडलेली आहे. चन्नकेशव (चेन्नाकेशवा, चन्नाकेशव) हे श्री विष्णूला समर्पित असे मंदिर आहे. केशव म्हणजेच विष्णू, चेन्नाकेशवा म्हणजे देखणा केशव. या मंदिराचे बांधकाम नरम सोपस्टोनच्या (क्लोरायटिक स्किस्ट नावाचा मऊ दगड) साह्याने करण्यात आले आहे. हस्तिदंत आणि चंदनाच्या कोरीव कामाच्या हाताळणीची परंपरा या मंदिराच्या शिल्पकलेतून प्रतिबिंबित होते.या मंदिराच्या भिंतींवर पौराणिक पात्रांचे चित्रण करण्यात आले आहे. या मंदिराची रचना इतकी भव्य आहे की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या मंदिराला मान्यता दिली आहे.हे मंदिर स्थापत्य आणि शिल्पकलेच्या दृष्टिकोनातून भारतातील विशेष मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात एकूण ४८मोठे खांब आहेत. ज्यावर विविध प्रकारच्या आकृत्या कोरण्यात आल्या आहेत. जे खूप आश्चर्यकारक आहे. हे मंदिर १७८फूट लांब आणि १५६ फूट रुंद आहे.

मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराला चाळीस खिडक्या आहेत. यापैकी काहींना निव्वळ पडदे आहेत तर काहींना भौमितिक आकार आहेत.त्याच्या तीन प्रवेशद्वारांपैकी पूर्वेकडील प्रवेशद्वार सर्वोत्तम आहे. येथे रामायण आणि महाभारताची अनेक चित्रे काढलेली आहेत.

या  मंदिराची उभारणी करताना मजबुतीसाठी वापरलेले स्थापत्य अभियांत्रिकी तंत्र म्हणजे त्या वेळच्या बांधकाम शैलीचा आदर्श नमुना आहे. घडीव दगडांवर दगड रचून खांब आणि आडव्या तुळया जोडताना इंटरलॉक, तसेच पिन आणि सॉकेट सिस्टीम यांचा सुरेख वापर त्यासाठी करण्यात आला आहे. शिल्प कोरलेल्या भिंती आणि छत असे बेमालूमपणे जोडण्यात आले आहे, की याचे सांधे कसे जोडले आहेत, याचा पत्ताही लागत नाही. त्यामुळे हजार वर्षे झाली तरी ही बांधकामे भक्कमपणे टिकून आहेत.

येथे सुमारे ११८ शिलालेख सापडले असून, काही ताम्रपटही आहेत. या मंदिराचे काम तीन पिढ्यांतील शिल्पकार करत होते असे शिलालेखावरून दिसून येते. त्यावरून त्यातील काही कलाकारांचीही ओळख होते. रुवारीमल्लितम्मा (मल्ल्याण्णा) या शिल्पकाराने सुमारे ४० मूर्तींची निर्मिती केली आहे. दासोजी व त्याचा मुलगा चवण्णा यांचाही यात मोठा सहभाग होता. मदनिकांची शिल्पे करण्याचे श्रेय चवण्णा यांच्याकडे जाते. - सौ.संध्या यादवाडकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पूजा आणि वास्तुशांती...!