प्रेरणादायक व्यक्तिमत्व : नारायण सुर्वे   (जन्म शताब्दी वर्षारंभ - १५ ऑक्टोबर २०२५ ते १५ ऑक्टोबर २०२६)

१५ ऑक्टोबर २०२५ ते १५ ऑक्टोबर २०२६ हे वर्ष कविवर्य नारायण सुर्वे यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे. या निमित्त शासनाने वर्षभर विविध उपक्रम राबवावेत.महाराष्ट्रातील विविध साहित्यिक संस्था, वाचनालय, ज्येष्ठ नागरिक संस्था प्रत्येक महाविद्यालयातील मराठी विभाग, विद्यापीठानी याबाबतीत उपक्रम राबवावेत. सुर्वे यांच्या आयुष्याची शेवटची  काही वर्ष नेरळ येथे वास्तव्य होते. यासाठी शासनाने तसेच साहित्यिक संस्थांनी नेरळ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करावे ही अपेक्षा.

१५ ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती डॉ .ए .पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस,  वाचन प्रेरणादिन म्हणून साजरा केला जातो १५ ऑक्टोबर १९३१ रोजी कलाम यांचा जन्म झाला व २७ जुलै २०१५ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. १५ ऑक्टोबर १९२६ रोजी कविवर्य नारायण सुर्वे यांचा जन्म झाला व १६ ऑगस्ट २०१० रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. दोघांचा जन्म दिवस १५ ऑक्टोबर, दोघांचे आयुष्य ८४ वर्ष. दोघांनीही वाचनामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास केला. सुर्वे यांच्या तुलनेत कलाम यांचे खुप शिक्षण झाले. तसेच ते राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. नारायण सुर्वे मँट्रिक झाले व शाळा मास्तर झाले असले तरी वाचन व लेखन यांच्यामुळे ते काव्य क्षेत्रात सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले. आपण त्यांच्या खडतर आयुष्याबद्दल माहिती करून घेऊ म्हणजे त्यांची महती समजेल.

 १५ ऑक्टोबर १९२६ रोजी एक गिरणी कामगार रात्रपाळी करून घरी निघाला होता. गिरणीच्या बाहेर कचराकुंडीजवळ खुप गर्दी झाली होती. एका लहान बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. गंगाराम सुर्वे गर्दीतून वाट काढत बाळापर्यंत पोहोचले.पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले बाळ नुकतेच जन्मलेले होते. त्याची नाळ सुध्दा कापलेली नव्हती. त्यांनी बाळाला उचलले व घरी आणले. त्यांना पाच वर्षाची मुलगी होती. झोपडीत आल्यावर त्यांनी बाळाला बायकोच्या ताब्यात दिले. मुलगा आहे म्हणून त्याचे नांव नारायण ठेवले. तेच बाळ पुढे ”नारायण गंगाराम सुर्वे” म्हणून जगप्रसिद्ध झाले.

 गंगाराम सुर्वे यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यांनी नारायण दहा वर्षाचा असताना त्याला सोडून बायको आणि मुलगी यांना घेऊन गांवी कोकणात कायमचे राहण्यास गेले. अवघ्या दहा वर्षाचा नारायण पुन्हा अनाथ झाला. परंतु तो खंबीर होता तो डगमगला नाही. त्याने हॉटेलात भांडी घासली गिरणीत हमाली केली. अतोनात कष्ट केले; परंतु वाममार्ग पत्करला नाही.त्याला रहायला झोपडीसुध्दा नव्हती. रात्री बंद दुकानाच्या फळीवर अथवा फुटपाथवर झोपायचा. जे मिळेल ते काम करत तो उदरनिर्वाह करत होता. सुदैवाने त्याला शाळेत शिपायाची नोकरी मिळाली. तो  दिवसा नोकरी करायचा  व रात्री शाळेत जायचा असे करून तो मँट्रिक झाला.

 १९४८ साली नारायणाचे लग्न झाले. दोन मुली व दोन मुलगे झाले. त्याने एका झोपडीत संसार थाटला. नारायणाचे वाचन चौफेर आणि चौकस होते. त्यांनी मराठी,  हिंदी, उर्दू भाषेवर प्रभुत्व मिळवले. अखंड वाचनामुळे त्यांना लेखन करावेसे वाटू लागले.त्यांनी सुरुवातीला कविता करण्यास सुरुवात केली. १९६२ साली त्यांचा  ‘ऐसा गा मी ब्रम्ह' हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर माझे विद्यापीठ, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. त्यानंतर ‘सनद' व  ‘निवडक नारायण सुर्वे' हे कवितासंग्रह संपादित झाले. उर्दू साहित्यिक कृष्णचंदर यांच्या उर्दू कथांचा सुर्वे यांनी केलेला अनुवाद १९६६ साली ‘तीन गुंड आणी सात कथा ' या नावाने प्रसिध्द झाला. ‘दादर पुलाकडील मुले ' ही त्यांची अनुवादित कादंबरी १९७५ साली प्रकाशित झाली. सुर्वे यांच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद ‘ऑन द पेव्हमेंटस ऑफ लाईफ' ह्या नावाने १९७३ साली प्रकाशित झाला.

  नारायण सुर्वे यांना वाडःमय क्षेत्रातले अनेक मानाचे पुरस्कार लाभले. १९७५ साली परभणी येथे झालेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'चे ते अध्यक्ष होते . १९९८ साली त्यांना ‘पद्मश्री' पुरस्कार प्राप्त झाला. नारायण सुर्वे यांना जो मानसन्मान मिळाला त्याचे श्रेय कोणाला द्याल? असे त्यांना विचारले असता ते म्हणायचे त्याचे सर्व श्रेय मी वाचलेल्या पुस्तकांना आहे. आपल्या सोबत पुस्तकं असली की वाचनामुळे झोपडीतही समाधानाचा सुगंध दरवळतो असे ते म्हणत. नारायण सुर्वे यांचे यश बघून मला एक चारोळी सुचली.

  लिहिणाऱ्याने लिहीत जावे
वाचणाऱ्यांनी वाचत जावे
  वाचता वाचता एक दिवस
    लिहिणाऱ्याचे हात घ्यावे

        नारायण सुर्वे यांच्यासारख्या साहित्य क्षेत्रांत नावाजलेल्या अनेक साहित्यिकांनी फक्त करमणुकीसाठी वाचन केले नाही. तर त्यापासून प्रेरणा घेऊन साहित्य निर्मिती केली. नारायण सुर्वे यांच्या जीवनावर आधारीत "नारायण गंगाराम सुर्वे” या नावाने एक लघुपट प्रकाशित झाला असून तो पाहिल्यानंतर सुर्वे यांच्याबद्दलची माहिती होते व त्यांच्या कार्याची "महती”समजते. हा माहितीपट जास्तीत जास्त विद्यार्थ्यानां दाखवला तर त्यांच्यापासून अनेक जण प्रेरणा घेतील.

     "वाचन प्रेरणा दिन”  साजरा करत असतांना डॉ.अब्दुल कलाम यांच्याबरोबर कविवर्य नारायण सुर्वे यांचीही दखल घ्यावा. त्यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त उपक्रम राबवावे
- दिलीप प्रभाकर गडकरी 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

काकडा ३ वेगे निंबलोण करा!