छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
नातं आणि संवाद...
नाते आणि त्यामधील संवाद हा प्रत्येक पिढीमध्ये होत असतो. नात्यामध्ये संवाद होणे गरजेचे आहे, कारण जेव्हा संवाद होतो तेव्हाच नात्याची वीण घट्ट जोडली जाते. ज्या घरात आजी-आजोबा आपल्या नातवंडांना जी नात्याची शिदोरी देतात, तीच शिदोरी ती नातवंडे पुढे देणार असतात. बोलता येत नसतानादेखील नातवंडे इशाऱ्याने, हातापायांच्या खुणाने आजी-आजोबांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि तो प्रयत्न आजी-आजोबांच्या लक्षात येतो, त्यांना समजतं, आपल्या बाळाला काय सांगायचं आहे आणि त्याच्यातूनच त्यांचा संवाद सुरू होतो.
नातं म्हणजे काय ? तर ज्याच्यामध्ये तंटा नाही असं नातं. मग ते नातं सख्खं, चुलत, सावत्र की मैत्रीचा असो, ते प्रत्येक जण कसं निभावतं यावर सगळं अवलंबून असतं. नात्यांमध्ये असतो तो विश्वास आणि या विश्वासावरच नात्याची इमारत उभी असते. जर त्या इमारतीला जरा जरी अविश्वासाची हवा लागली की ते कोसळते आणि कोसळताना एक मजला न पाडता सगळे मजले खाली कोसळले जातात. त्यासाठी नातं हे घट्ट असावं. मग ते कोणतेही असो, त्याचा पाया हा विश्वासावर असावा, न की अंधविश्वासावर.
नात्यांमधलं सगळ्यात महत्त्वाचं आणि भक्कम नातं ते म्हणजे आई-बाबा. आई-बाबाच कुटुंबाचा भक्कम पाया असल्यामुळे ते जशी नाते घडवतात, शिकवण देतात, तसे पुढची पिढी ती नाते घडवत असतात आणि त्यांचा आदर ठेवत असतात. आई-बाबा आणि मुलाचं नातं खरंच जगावेगळं असतं आणि अजून एक नातं असतं ते म्हणजे नातवंडंं आणि आजी-आजोबा. या नात्याला तर कधीच कोणी तुलना करू शकत नाही, इतकं निस्सिम प्रेम आणि काळजी असते या नात्यात. आजकाल हे नातं आपल्या समाजामध्ये बघायला फार कमी मिळत आहे आणि आजी आजोबा शोधायचे म्हटले तर आपल्याला वृद्धाश्रमाची वाट धरावी लागते. आपण जसजसे उच्चशिक्षित होत आहोत तसतसे प्रत्येक नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे, ते कोणतेही असो, मग आजी आजोबा तर दूरचीच गोष्ट. आपण अंगिकारलेली विभक्त कुटुंब पद्धती हीदेखील यामागच एक कारण आहे.
असो. नाते आणि त्यामधील संवाद हा प्रत्येक पिढीमध्ये होत असतो. नात्यामध्ये संवाद होणे गरजेचे आहे, कारण जेव्हा संवाद होतो तेव्हाच नात्याची वीण घट्ट जोडली जाते. नाते आपल्याला बरेच काही शिकवते, संवाद करायला शिकवते. तसेच वाद करायलादेखील शिकवते; पण त्यातून संवाद हा उत्तम झाला तर आपलं समाजामध्ये वावरणं हे उत्तम होतं. आजकाल कुटुंबांमध्ये संवाद हाच नाहीसा झाला आहे. इथे एकत्र जेवायला वेळ नाही, सोबत चार घास खायला वेळ नाही तर चार शब्द प्रेमाचे कसे बोलणार? बोलले जाते ते फक्त व्यवहाराचे, आर्थिक बाबीचे.
पण इथे एक नातं येतं आजी आणि आजोबांचे. ज्या घरात आजी-आजोबा आपल्या नातवंडांना जी नात्याची शिदोरी देतात, तीच शिदोरी ती नातवंडे पुढे देणार असतात. एका मराठी चित्रपट चित्रपटांमध्ये संवाद आहे की, आजोबा म्हणजे नातवाचा पहिला मित्र आणि नातू म्हणजे आजोबाचा शेवटचा मित्र. विचार केलं तरी यात किती तथ्य आहे जे जाणवते. घरात आजी आजोबा एकमेकांशी असा संवाद साधतात की, आपलं नातू किंवा नात आपल्याला ऐकत आहे, बघत आहे, तर आपल्या संवादातून त्याला फायदाच झाला पाहिजे, आपल्या बोलण्यात गोडवा दिसला पाहिजे, त्याने उत्तम ते घेतलं पाहिजे, त्याच्यावर उत्तम संस्कार झाले पाहिजेत, याची ते सतत काळजी घेत असतात आणि दक्ष असतात. आजी आजोबा बोलताना खूप विचारपूर्वक आपल्या नातवंडांशी बोलतात. त्यांना माहित आहे की, आपल्या मुलाला, सुनेला किंवा मुलगी, जावयाला त्यांच्या मुलाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, ते कामामध्ये व्यस्त असतात, पण ती सर्व कसर भरून काढतात ते आजी-आजोबा.
आजी-आजोबा घरातच आपल्या नातवांशी संवाद साधतात असे नाही, तर प्रत्येक कृतीतून ते संवाद साधत असतात आणि नातवंडेसुद्धा आजी-आजोबांचं अनुकरण करत असतात. अगदी आजी आजोबा सकाळी उठल्यानंतर देवाला हात जोडून नमस्कार केल्यापासून ते नाश्ता-जेवण पर्यंत या सगळ्या गोष्टींचा अनुकरण ही छोटी नातवंडे करत असतात. आजोबा कसे बोलतात, कसे जेवतात, कसे वागतात किंवा आजी कसे काम करते, आजोबांची कशी सेवा करते, आम्हाला कसं खाऊ भरवते, तो खाऊ भरवत असताना आजी आमच्याशी कशा गोष्टी सांगते, हे सगळं लक्ष देऊन नातवंड पाहत असतात आणि ऐकत असतात. बोलता येत नसतानादेखील नातवंडे इशाऱ्याने हातापायांच्या खुणाने आजी-आजोबांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि तो प्रयत्न आजी-आजोबांच्या लक्षात येतो, त्यांना समजतं, आपल्या बाळाला काय सांगायचं आहे आणि त्याच्यातूनच त्यांचा संवाद सुरू होतो.
जेवायला बसले की ‘वदनी कवळ घेता, नाम घेता फुकाचे' हा श्लोक बोलून जेवण सुरू करायचे, असे आजोबा नातवंडांना शिकवतात. अन्नाचे आभार मानायचे असतात हे आजोबा संवादातून, कृतीतून नातवांना सांगतात. तर आजी प्रत्येक घास भरवत असताना देवाचे नामस्मरण करत किंवा ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा' असं करत त्याच्यावर संस्कार करत त्याला भरवत असते आणि तो घास भरवत असताना काऊ आला तर, काऊलापण द्यायचा, म्हणजेच आपण एकटं न जेवता आपल्याला सोबत इतरांना घेऊन देखील जेवायचे, हे आजी तिच्या कृतीतून नातवंडांना सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि नातवंडदेखील तेच शिकतात. म्हणजे किती छान संवाद होत आहे. न सांगता देखील एकमेकांना एकमेकांच्या गोष्टी समजतात. शाळेत सोडताना आजोबा मुलांना सांगत असतात, की, रस्त्याच्या कुठल्या बाजूने चालायचे? डाव्या की उजव्या? आपण कोणत्या बाजूने चालले की, गाड्या कोणत्या बाजूने येणार? मग त्याच्यावर मिश्किलपणे किंवा निरागसपणे नातू प्रश्न विचारतो, की जर मागून गाडी आली तर आपण काय करायचे ? त्याच्यावर आजोबा बोलतात, मागून येणारी गाडी तिला भरपूर रस्ता मोकळा असतो आणि आपण रस्त्याच्या एका बाजूने चालत असतो हा झाला संवाद. भाजी आणायला गेल्यानंतर भाजीवाला आणि आजी-आजोबा यांच्यामध्ये होणारे संवाद, तसेच आजी आजोबा त्यांच्या मित्र-मैत्रिणी सोबत कसे बोलतात, आपल्या आई-बाबांसोबत कसे बोलतात, याकडे या नातवंडांचे लक्ष बारीक असते आणि त्याच पद्धतीने ते बोलत असतात. जर आजी आजोबा एखाद्या व्यक्तीशी रागाने बोलले, तर नातवंड त्या व्यक्तीशी अजिबात बोलत नाहीत, की त्यांच्याकडे बघत नाहीत, कारण त्यांना समजून जाते की हे नक्कीच कोणीतरी अयोग्य किंवा वाईट व्यक्ती आहे. तर हे कसे समजते? तर संवादातून. लहान नातवंड किंवा मोठी झालेली कॉलेजमध्ये जरी जात असतील तरी आजी आजोबांसोबत त्यांचे एक वेगळंच नातं तयार झालेलं असतं. ज्या काही गोष्टी ते आपल्या आई-वडिलांना सांगू शकत नाहीत, त्या गोष्टी छोट्या असो किंवा मोठ्यातल्या मोठ्या असो, ते आपल्या आजी आजोबांना सांगतात. आजी आजोबांना सांगत असताना लहान मुलांचे हावभाव अगदी बघण्यासारखे असतात. माझ्या मित्राने, माझ्या मैत्रिणीने, मला असा बोलला, माझ्याशी अशी बोलली, आम्ही अशी गंमत केली, आम्ही असा खेळ खेळलो, हा जेव्हा सांगत असतात तेव्हा आजी-आजोबा आणि नातवंडे ते पूर्णपणे एक होऊन गेलेले असतात. जसं काही जणू ती गोष्ट आत्ताच घडत आहे त्यांच्यासोबत इतक्या कुतूहलाने आजी-आजोबा ते ऐकत असतात त्यामुळे त्यामध्ये फक्त चर्चा न होता संवाद होत असतो आणि नातवंडांनादेखील आनंद मिळत असतो, की आपलं कोणीतरी ऐकत आहे आणि आपण जे बोलत आहोत ते अगदी बरोबर आहे. संध्याकाळची ‘शुभंकरोती' म्हणत असताना कसे हात जोडायचे, घरातील सर्व माणसांना कसा नमस्कार करायचा, हे देखील आजी-आजोबा आपल्या नातवांना शिकवतात आणि त्यांचे अनुकरण नातवंडे करत असतात. छोट्या छोट्या गोष्टी नातवंडे आजी आजोबांच्या संवादातून शिकत असतात.
नात्यांमध्ये संवाद होणे खूप गरजेचे आहे. जर घरामध्ये आई वडील आणि मुलच असेल तर त्यामध्ये फार कमी संवाद होतो. आणि संवाद होत नसल्यामुळे प्रत्येकाला एकमेकांच्या अडचणी समजत नाही किंबहुना कोणी कोणाला सांगण्याचा प्रयत्न करत नाही आणि तिथे सगळे गणित चुकते. जर एकमेकांशी बोललच नाही, एकमेकांना अडचणी सांगितल्याच नाहीत, तर त्रिकोणी कुटुंब असो किंवा चौकोनी पूर्ण कुटुंब असो त्यामध्ये वाद व्हायला वेळ लागत नाही. वाद नको असेल तर संवाद होणे गरजेचे असते. मग तो संवाद केव्हा होतो, जर घरात आजी-आजोबा असतील तर. अर्थात प्रत्येकाच्या घरात आजी आजोबा आताच्या काळात फार कमी बघायला मिळतात. मग ज्यांच्या घरात मुलांना सांभाळायला आजी-आजोबा नसतात किंवा इतर कोणी मोठी माणसे नसतात, ती मुलं पाळणाघरामध्ये ठेवली जातात. त्या मुलांमध्ये एक वेगळाच न्यूनगंड निर्माण होतो. अर्थात आता पाळणाघरातले सांभाळणारे देखील कसे आहेत, त्यावर सगळं अवलंबून असतं. जर तेथील सांभाळणारे मुलांशी संवाद साधत असतील, त्यांच्याशी प्रेमाने वागत असतील, बोलत असतील, तर ती मुलं नक्कीच संवाद साधतात, नाहीतर एकटी शांत बसून राहतात आई-वडिलांची वाट बघत.
आता इथे दुसरीकडे तरी काय आहे? आई बाबा कामाला गेले, आजी आजोबा जरी घरात असतील, तरी मुलं आई-वडिलांची वाट बघत असतात. पण त्यांना हक्काचे घर असते आणि त्या घरात आजी-आजोबा जर बोलणारे असतील, संवाद साधणारे असतील तर ती मुलं मन मोकळेपणाने जगू शकतात. पण आजी आजोबा जर संवाद साधणारे नसतील, तर त्या मुलांची अवस्था देखील पाळणा घरातल्या मुलांसारखीच होते.
म्हणूनच नातं आणि नात्यांमधील संवाद हा महत्त्वाचा दुवा आहे. संवाद जितका उत्तम उत्तम तितकं नातं घट्ट. त्यासाठी नातं कुठलंही असो... संवाद होणे गरजेचे आहे.
- सौ. निवेदिता सचिन नेवसे