छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
ज्येष्ठ शिक्षकाचा अनोखा सन्मान
आपल्या देशात असलेल्या सुमारे ३०० सार्वजनिक उद्योगांपैकी काही ठिकाणी होतकरु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरविले जाते. शिक्षण - प्रशिक्षण - नोकरी अशी योजना सतत २२ वर्ष यशस्वीरित्या सांभाळणारी राष्ट्रीय केमिकल्स एण्ड फर्टिलायझर्स लि. ही देशातील एकमेव केंद्रीय सार्वजनिक खत उद्योग कंपनी आहे. तिचे मुंबई (चेंबूर) व रायगड जिल्ह्यातील थळ येथे असे दोन कारखाने आहेत. श्री.बलबीर अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर आणि थळ येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कंपनीच्या प्रांगणात १९७८ साली सुरू झालेले हे वसतीगृह सुमारे वीस-बावीस वर्षे अविरत सुरू राहिले.
राष्ट्रीय केमिकल्स एण्ड फर्टिलायझर्स लि. कंपनीच्या थळ कारखान्याचे किहिम येथील स्वागत गेस्ट हाऊस ! दिवस गुरुपौर्णिमा! खरं तर गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. अर्थातच हा दिनांक १० जुलै २०२५ दिवस, एका अभूतपूर्व अशा चांगल्या घटनेचा साक्षीदार ठरला. ८६ वर्षांचे आदरणीय बलबीर अधिकारी यांनी एकेकाळी सेवेत असतानाच युवा कार्याबरोबरच कंपनीच्या माध्यमातून गरजू, अनाथ, मागासवर्गीय मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले. त्यांना घडवले. त्या माजी विद्यार्थ्यांनीच आपल्या गुरूंचा आपले कुटुंबीय, आई-वडील यांच्या उपस्थितीत हृदयस्पर्शी सन्मान केला. योगायोग असा की गुरुपौर्णिमा हा श्री. अधिकारी सरांचा जन्मदिवसही. सहाजिकच या सोहळ्यास अभिष्टचिंतनाचेही स्वरुप प्राप्त झाले.
आपल्या देशात असलेल्या सुमारे ३०० सार्वजनिक उद्योगांपैकी काही ठिकाणी होतकरु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरविले जाते. काही ठिकाणी प्रशिक्षण देऊन मुलाखतीद्वारे नोकरीत सामावले जाते. परंतु शिक्षण - प्रशिक्षण - नोकरी अशी योजना सतत २२ वर्ष यशस्वीरित्या सांभाळणारी राष्ट्रीय केमिकल्स एण्ड फर्टिलायझर्स लि. ही देशातील एकमेव केंद्रीय सार्वजनिक खत उद्योग कंपनी आहे. तिचे मुंबई (चेंबूर) व रायगड जिल्ह्यातील थळ येथे असे दोन कारखाने आहेत. सतत नफा होत असल्याने कंपनीला सरकारतर्फे नवरत्न सन्मान प्राप्त झाला आहे. चेंबूर, थळ कारखान्यांचा पाया मजबूत करण्याचे श्रेय कंपनीचे पहिले अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप सिंह यांच्याकडे जाते. आरसीएफ विद्यार्थी वसतिगृह, हरित चेंबूर प्रकल्प व दत्तक ग्राम योजना ह्या योजनांमुळे समाजाच्या उन्नतीतही भर पडली हे सर्वमान्य सत्य आहे. आणि या योजनांचे मुख्य समन्वयक म्हणून समर्पित अशा निस्वार्थी भावनेने, कंपनीतील आपल्या कामातील प्रामाणिकपणा आणि शिस्तबद्ध अशा स्वच्छ प्रतिमेने या उपक्रमांचे उत्तमरीत्या काम पाहून श्री. बलवीर अधिकारी यांनी त्यास मूर्तरूप प्राप्त करून दिले. आरसीएफ व्यवस्थापनाने हे मागासवर्गीय मुलांसाठींचे वसतीगृह कंपनीतील जनसंपर्क खात्याच्या स्वाधीन केले. श्री. बलवीर अधिकारी त्याच खात्यात काम करत असल्यामुळे आणि त्यांच्या कामातील सचोटीमुळे ही जबाबदारी त्यांच्याकडे आपोआप चालत आली.
श्री.बलबीर अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर आणि थळ येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कंपनीच्या प्रांगणात १९७८ साली सुरू झालेले हे वसतीगृह सुमारे वीस-बावीस वर्षे अविरत सुरू राहिले. दरवर्षी ३० मुले ही संख्या राखण्यासाठी नवीन मुले येत राहिली. एकूण संख्या ५०० च्या वर राहिली. यापैकी बहुतेकांची मुले उच्चशिक्षित झाली. या योजनेअंतर्गत अनेक दत्तक विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करुन त्यांना प्रशिक्षण देत आपल्याच कंपनीत पूर्ण वेळ सामाऊन घेणे हा कंपनीचा मूळ उद्देश बहुतांशी सफल झाला. मध्ये बराच काळ निघून गेला तथापि बाहेर पडलेले विद्यार्थी व आरसीएफचा जनसंपर्क विभाग यात प्रामुख्याने बलबीर अधिकारी यांचा संपर्क कायम राहिला. याचे मुख्य कारण वसतीगृहात मिळालेले श्री. अधिकारी सरांचे संस्कारक्षम मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना लाभलेल्या सोयी व घरासारखे वातावरण, आपुलकी व प्रेम तसेच १९७८ ते २००१ या कार्यकालात पदवीधारक, एनसीटीव्हीटी उत्तीर्ण, एम. ए., इंजिनियर्स, डॉक्टर, एल. एल. एम., कंपनीत मोठ्या पदावर अधिकारी पदावर हे युवक नोकरी करु लागले. यामुळे अनेक कुटुंबे सक्षमपणे उभी राहिली. म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आरसीएफ माजी विद्यार्थी वसतीगृह संघटनेचे माजी विद्यार्थी यांनी गुरुवर्य श्री बलबीर अधिकारी यांचा सन्मान समारोह आणि अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करुन तो यशस्वी केला.
सदर सोहळ्याप्रसंगी कंपनीच्या कार्यपालक संचालक आणि महाव्यवस्थापक व निवृत्त उपजिल्हा अधिकारी विजय सोनार मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक पालक आवर्जून उपस्थित होते. ८६ वर्षे वयाच्या, आपल्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणाऱ्या व्यक्तीला पाहण्यासाठी उत्सुक होते. सजल नेत्रांनी ते गुरूंकडे बघत होते. म्हणूनच अगदी भावपूर्ण झालेल्या या सोहळ्याप्रसंगी एक माजी विद्यार्थी मनोगतात म्हणाला की आम्ही आदिवासी, मागास वर्गातील आहोत पण शाळा- कॉलेजात जाऊ इच्छिणारे होतो. अधिकारी सरांनी आम्हाला आपलं केलं. आज आम्ही जे काही आहोत ते त्यांच्या सेवाभावी निर्णयामुळे. यातच सर्व काही आलं. - सुभाष हांडे देशमुख