तेरी मिट्टी में मिल जावां!

१७ जुलै १९४३ रोजी त्यांचा जन्म झाला....दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२३ मध्ये त्यांच्या एक हजार पौर्णिमा पाहून झाल्या असत्या..सहस्रचंद्र दर्शन घडले असते! पण आता तर ते शौर्याच्या आभाळातला एक अत्यंत तेजस्वी तारा झालेले आहेत...सूर्य आणि चंद्र असेतो त्यांची कीर्ती राहील! ते लढाऊ वैमानिक म्हणून भारतीय हवाई दलात COMMISSIONED होण्यापूर्वी म्हणजे ४ जून, १९६७ पूर्वी भारत-पाक, भारत-चीन यांच्या दरम्यान मिळून तीन युद्धे होऊन गेली होती.

लहानपणापासूनच त्यांना लढाऊ विमानांचा गगनभेदी आवाज ऐकण्याची आणि ती विमाने प्रचंड वेगाने आकाशात झेपावताना पाहण्याची सवय झाली होती...आणि आपणही एके दिवशी अशाच विमानांतून आभाळात भरारी मारण्याचे त्यांचे स्वप्न होते! वडील भारतीय वायुदलात सेवेत असल्याने, विमानतळाजवळच त्यांचे घर होते...आणि मनात विमानांनी घर केले होते!

१७ जुलै १९४३ रोजी त्यांचा जन्म झाला....दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२३ मध्ये त्यांच्या एक हजार पौर्णिमा पाहून झाल्या असत्या..सहस्रचंद्र दर्शन घडले असते! पण आता तर ते शौर्याच्या आभाळातला एक अत्यंत तेजस्वी तारा झालेले आहेत...सूर्य आणि चंद्र असेतो त्यांची कीर्ती राहील! ते लढाऊ वैमानिक म्हणून भारतीय हवाई दलात COMMISSIONED  होण्यापूर्वी म्हणजे ४ जून, १९६७ पूर्वी भारत-पाक, भारत-चीन यांच्या दरम्यान मिळून तीन युद्धे होऊन गेली होती.

  इंग्रजांनी एका स्वातंत्र्याचे दोन तुकडे अर्थात पाकिस्तान आणि भारत करून दिल्यानंतर काहीच महिन्यांत म्हणजे केवळ दोन महिने आणि सात दिवसांत १९४७ मध्ये पाकिस्तानने भारतात सैन्य घुसवले....पाकिस्तानने ऑगस्ट १९४७ मध्येच ‘ऑपरेशन गुलमर्ग प्लान' नावाने शिजवलेल्या कटाचा हा पुढचा अंक होता! यामुळेच हिंदुस्थानाला २७ ऑक्टोबर, १९४७ रोजी काश्मीरमध्ये श्रीनगर हवाई तळावर लढाऊ विमाने उतरवावी लागली होती. पुढे झालेल्या आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप आणि त्यात झालेल्या समझोत्यामध्ये श्रीनगरमध्ये शांतता काळात Air Defence Air Craft लढाऊ विमाने ठेवू नयेत असे ठरले होते. पण पुढे पाकिस्तानशी १९७१मध्ये युद्धाची स्थिती उत्पन्न झाली आणि भारतीय हवाई दलाची cn 18 जातीच्या लढाऊ विमानांची एक तुकडी (१८ Squadran Detachment) श्रीनगरमध्ये तैनात करण्यात आली! या तुकडीतील वैमानिकांना काश्मीरमधील पहाडी हवाई क्षेत्र, तिथले प्रचंड थंड हवामान यांचा सराव व्हायला वेळ लागणार होता. पण जातीचे सैनिक..त्या हवामानाला पुरून उरले. पण श्रीनगर हवाई तळाच्या आणि एकूणच त्या परिसराच्या संरक्षण सिद्धतेत एक कमतरता होती. Operational  Radar System उपलब्ध नव्हते. पाकिस्तानी हवाई दलाने काही आगळीक केलीच तर त्याची आगाऊ खबर मिळावी म्हणून पीर पंजाल येथील पर्वतांवर आपली निरीक्षण पथके तैनात मात्र होती. पण डिसेंबर १९७१ मध्ये त्या भागात प्रचंड धुके होते. शिवाय लढाऊ विमाने कमी उंचीवरून उडत आली तर ती लवकर दृष्टीस पडणे अवघड. त्यात पाकिस्तान हवाई दलाकडे असलेली F-86 Sabre जातीची अमेरिकन विमाने आपल्याकडील Knat च्या तुलनेत अधिक ताकदवान होती...आणि अशी १२.७ एम.एम मशीनगन आणि बॉम्ब,रॉकेटसने मारा करू शकणारी अशी १३९ विमाने तयार होती. पण आपली ब्रिटीश Knat विमाने वजनाने हलकी, कमी उंचीवरच्या Dog Fight  (लढाऊ विमानांची एकमेकांशी हवेत समोरासमोर लढत) मध्ये सरस होती....त्यांना Flying Bullets ही उपाधी प्राप्त होती...पण त्याही जास्त सामर्थ्यशाली होते ते भारतीय वायूवीर...यंत्रांपेक्षा ती यंत्रे चालवणारी हृदये जास्त मजबूत असावी लागतात...आणि अशी असंख्य हृदये भारतीय हवाईदलात धडधडत होती...पाकच्या लढाऊ विमानांच्या डरकाळ्या या आवाजापुढे कमीच पडतील!

१४ डिसेंबर १९७१ची सकाळ...धुक्याचे साम्राज्य आणि जीवघेणी थंडी. श्रीनगर हवाई तळावर Readiness Duty अर्थात काही विपरीत झालेच तर त्वरीत प्रत्युत्तर देण्याच्या कामावर दोन Knat विमाने आणि दोन लढाऊ वैमानिक, २८ वर्षांचे तरुण पलाइंग ऑफिसर निर्मलजित सिंग सेखां आणि अनुभवी लढाऊ वैमानिक पलाईट लेपटनंट बी.एस.बलधीर सिंग घुम्मान तैनात होते. घुम्मान साहेब पुढे  Air Commodore या पदापर्यंत पोहोचले! ३ डिसेंबरला सुरु झालेल्या युद्धात भारताची सर्वच आघाड्यांवर सरशी होत होती...त्यात भारतीय हवाई दलाचा वाटा अत्यंत मोठा होता. त्यामुळे कातावलेल्या पाकिस्तानला काहीतरी करून दाखवायची खुमखुमी आली..आणि त्यांची तब्बल सहा सेबर विमाने श्रीनगर हवाई तळ उध्वस्त करण्याच्या कामगिरीवर निघाली आणि काहीच वेळात हवाई तळाच्या आभाळात अवतरली सुद्धा...पीर पंजाल येथील निरीक्षण चौक्यांनी तसा रेडीओ संदेश धाडलाही होता...पण हा हल्ला इतका वेगवान होता की आपले दोन्ही वैमानिक Knat  पर्यंत पोहोचून हवाई उड्डाण पट्टीवरून वेग घेण्याच्या प्रयत्नात असतानाच पाकिस्तानी सेबर्स त्यांच्या जवळजवळ डोक्यावर आलेली होती आणि त्यांनी हवाईपट्टीवर बॉम्ब फेक सुरूही केली होती. त्यामुळे धावपट्टीवर मोठा धूर झाला होता...तरीही घुम्मान साहेबांनी त्यांचे विमान धावापट्टीवर दामटले! पण Air Traffic Control बरोबर झालेल्या संदेशवहनामध्ये अचानक काही समस्या आली...आणि घुम्मान साहेबांना त्या धावपट्टीवरून उड्डाण करता आले नाही...धुके,धूर होताच...घुम्मान साहेब दुस-या धावपट्टीकडे गेले! त्यांच्या उजवीकडून Wingman म्हणून आपले कथानायक पलाइंग ऑफिसर निर्मलजित सिंग सेखां उड्डाण करण्याच्या तयारीत होते. अशा परिस्थितीत अजिबात विचलीत न होता सेखां साहेबांनी त्यांचे विमान त्या धावपट्टीवरून पुढे नेले...त्यांच्या अगदी समोरून काही फुटांवरून पाकिस्तानी विमान खाली सूर मारत येत होते..बॉम्ब टाकण्यासाठी! सेखां साहेबांच्या अगदी काहीशे यार्डावर त्या विमानाने बॉम्ब टाकला....त्या धुरातून सेखां साहेबांनी आपले Knat अचूक उडवले...दुसरा बॉम्ब त्यांच्या मागेच काही यार्डावर पडला!

आता हवेत एक भारतीय आणि सहा पाकिस्तानी विमाने असा सामना सुरु झाला! हल्ला करणा-या लांडग्यांवर सिंह त्वेषाने पाठलाग करीत धावून जावा, तशी स्थिती होती. सेखांसाहेब त्या सहाही विमानांच्या मागे लागले...सेखांसाहेबांनी प्रशिक्षण काळात आत्मसात केलेले सारे कौशल्य त्या एकाच लढ्यात अगदी पणाला लावले....शत्रूच्या त्या बलाढ्य विमानांना जबर हुलकावण्या दिल्या...रानडुकरे जेंव्हा धावून येतात तेंव्हा त्यांना अगदी जवळ येऊ देऊन ऐनवेळी बाजूला सरायचे असते...ती पुढे निघून जातात आणि त्यांना वळून यायला आणि एकूणच काय झाले ते समजायला उशीर लागतो...तशातली ही गोष्ट! आपण आकाशात एकटेच आहोत...असा सेखां साहेबांनी विचार नाही केला...”सवा लाख से एक लड़ाऊं, चिडिय़न ते मैं बाज तुड़ाऊं, तबै गुरु गोबिंद सिंह नाम कहाउं!” परम गुरु गोविंद सिंह साहेबांचे वचन पुन्हा एकदा प्रत्यक्षात उतरत होते.
सेखां साहेबांनी एका सेबरवर तुफान गोळीबार करून ते जमिनीच्या भेटीला पाठवले...आणि काही क्षणांत दुस-याही सेबरची खबर घेतली...तेही विमान आगीने वेढले गेले आणि दूर भरकटत गेले! आणि बाकी पाकी विमानांनाही सेखां-फायरचा प्रसाद मिळाला होताच. Knat विमानांना Sabre Slayer म्हणजे सेबर विमानांचे मारेकरी,कसाई का म्हणतात हे १९६५ नंतर पुन्हा एकदा सिद्ध झाले होते....पण या कत्तलीत विमानांपेक्षा वैमानिक अधिक धारदार होते, हे लक्षात घेतले पाहिजे!  तोवर घुम्मान साहेबांनीही दुस-या धावपट्टीवरून उड्डाण घेत या संघर्षात उडी घेतली होती. पाकिस्तानी विमानांची पळता आभाळ थोडे अशी गत झाली...पण त्यातील एका विमानाने सेखां साहेबांच्या विमानावर अगदी समोरून भयावह हल्ला केला...तोपर्यंत सेखां साहेबांच्या विमानाने कित्येक गोळ्या पचवल्या होत्या...पण पाकी विमानांचा आताचा हल्ला मात्र निकराचा होता...सेखां साहेबांचे ते छोटेसे विमान खूपच नुकसानग्रस्त झाले होते...तरीही ते उडत होते...इकडे घुम्मान साहेबांनी सुद्धा पाकी विमानांना अचूक लक्ष्य करायला आरंभ केल्याने उरलेली चार सेबर्स पळून निघून गेली...पराजित होऊन..पाकिस्तानचे आणखी एक मिशन नाकाम ठरले होते!

Air Traffic Control मधून Squadran  Leader वीरेंद्र सिंघ पठानिया साहेबांनी सेखां साहेबांना विमानतळावर परत आणावे, असा संदेश दिलाही होता... आटोकाट प्रयत्न केला...पण शेवटी ते यंत्र...त्याची क्षमता संपुष्टात आली होती...आणि सेखांसाहेबांचे या पृथ्वीवरचे श्वाससुद्धा बहुदा! प्रचंड वेगाने त्यांचे विमान एका अत्यंत खोल दरीच्या दिशेने निघाले...आणि त्या खोल पाताळात दिसेनासे झाले...केवळ धुराचा एक मोठा लोट मात्र दरी चढून वर आला! पाकिस्तानी हल्ला परतवून लावण्यात केवळ संख्येने दोनच असलेल्या आपल्या विमानांनी यश मिळवले होते...पण त्यातील एक वैमानिक पलाइंग ऑफिसर निर्मलजित सिंग सेखां काश्मीरच्या मातीत कायमचे मिसळून गेले! खूप प्रयत्न करूनही या परमवीराचे पार्थिव मिळून आले नाही...ते आजतागायत!  मातृभूमीच्या, मातीच्या सेवेते त्याच मातीत समाधी घेण्याचे भाग्य लाभले निर्मलजीत यांना...त्यांचे आयुष्य ‘निर्मल' झाले!

देशाने या पराक्रमाची दखल घेतलीच; पण नव्या वायूसैनिकांसाठी सेखां साहेब एक आख्यायिका बनून राहिलेले आहेत! निर्मलजित १९७० मध्ये म्हणजे लढाईच्या एकच वर्ष आधी विवाहबद्ध झाले होते! त्यांच्या विवाहाच्या दिवशीच त्यांच्या बंधूंचे, सुखमिंदर सिंग यांचे दुर्दैवी निधन झाले होते, हाही दैवदुर्विलास!

एकदा त्यांच्या चुलतभावासोबत जावा मोटार सायकलवर रपेट मारताना निर्मलजित त्यांना म्हणाले होते..."लढाई झालीच ना..तर मी एक मेडल तर नक्कीच पटकवणार!” तसेच झाले...निर्मलजित सिंग साहेबांना भारताचे सर्वोच्च सैन्य पदक..परमवीर मिळाले...पण ते मरणोत्तर! भारतीय हवाई दलातले असा सन्मान प्राप्त झालेले निर्मलजीत सिंग सेखां हे आजवरचे एकमेव वायूवीर आहेत! निर्मलजित यांचे पिताश्री सेवानिवृत्त वायुसेना अधिकारी श्री. तीरलोचन सिंग यांनी २६ जानेवारी, १९७२ रोजी तत्कालीन राष्ट्रपती महोदय श्री. व्ही.व्ही.गिरी यांच्या हस्ते मोठ्या अभिमानाने त्यांच्या लेकाच्या, हुतात्मा निर्मलसिंग सेखां यांच्या वतीने परमवीर चक्र स्वीकारले!

निर्मलजित सिंग मनानेसुद्धा नावासारखेच निर्मल...प्रत्येकाला प्राजी अर्थात बंधू संबोधत असत...त्यावरून त्यांना त्यांचे सहकारी G Man म्हणत असत!  

२०२३ मध्ये अंदमान निकोबार मधील एका बेटाला सेखां साहेबांचे नाव दिले गेले आहे! पालममध्ये त्यांच्या नावाचे एक संग्रहालय, जम्मूमध्ये एक बलिदान-स्तंभ, लुधियाना न्यायालयाच्या आवारात पूर्णाकृती पुतळा, शाळेला नाव,विशेष टपाल तिकीट इत्यादी अनेक मार्गांनी या परमवीर वायूयोद्ध्याच्या स्मृती जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे! नव्या पिढीला आणि विशेषतः आपल्यासारख्या Civillians  लोकांना अशा वीरांची माहिती असायलाच पाहिजे!

तेरी मिट्टी में मिल जावां म्हणत मृत्यूला सामोरे गेलेले निर्मलजित सिंग सेखांसाहेब गुल बन के खिल जावां म्हणत नव्या शूर वीरांच्या रुपात पुन्हा उगवलेही असतील...किंबहुना त्यांच्या बलिदानातून स्फूर्ती घेऊन आजही आपले वायूसैनिक आपल्या नभाचे संरक्षण करीत आहेत...."नभः स्पृशं दीप्तम म्हणत आहेत...” आम्ही नभाला मोठ्या अभिमानाने स्पर्श करतो! जय हिंद! -संभाजी बबन गायके 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

शिव्याशाप देणारा नव्हे, तर आशीर्वाद देणारा व्यवसाय करा!