छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
छत्रपती शिवाजी महाराज : आत्मनिर्भरतेच्या वाटेवरील प्रेरणास्त्रोत
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य वाढविताना किंवा स्वराज्यावर आलेल्या संकटांचा सामना करताना दोन सारख्या योजना कधीही राबविल्या नाहीत. प्रत्येक योजना वेगळी व तिचे नियोजन स्वतंत्र असे त्यामुळे महाराज आता काय करतील याबद्दल शत्रूला कधीच अंदाज बांधता येत नव्हता. कितीही संकटे आली, प्रचंड प्रतिकूल परिस्थिती असली, तरी मोठी स्वप्ने पाहता येतात व ती सत्यात उतरवता येतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
बोथट पुतळे पथापथावर
ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा,
वांझ गोडवे गाऊ नका
कुसुमाग्रजांनी जनतेला दिलेला हा फटका आपल्याला खूप काही सांगून जातो. जगातील सर्वच विकसित देशांमध्ये इतिहासाच्या अभ्यासाला फार महत्त्वाचे स्थान आहे. तो त्यांच्या आत्मनिर्भरतेसाठी पाया ठरतो. प्रेरणास्त्रोतही ठरतो. राष्ट्राचा एक शिल्पकार म्हणून भारताच्या उज्ज्वल भविष्याला आकार देणाऱ्या माझ्यासारख्या शिक्षकांस, उद्याच्या भावी पिढीसमोर हा ज्वलंत इतिहास मांडावासा वाटतो. शिक्षकाची अस्वस्थता या लेखातून व्यक्त करावीशी वाटते. आपली अनेक दशकांपासून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू आहे पण त्यात म्हणावे तसे आपल्याला यश नाही मिळाले. आपण आपल्या राष्ट्रपुरुषांची स्मारके उभारतो; पण त्यांचे आदर्श कृतीत आणत नाहीत. आपल्या आजच्या वर्तमानातील हीच अस्वस्थता या लेखाच्या निर्मितीमागे असून सर्वच क्षेत्रात चपळ, कणखर नेतृत्व निर्माण व्हावे हीच अपेक्षा या लेखाच्या माध्यमातून व्यक्त करतो.
भारत ही तपस्वींची भूमी मानली जाते. अशा या भूमीतील इतिहासाचा अभ्यास करतांना अनेक महान विभूतींचा उल्लेख होतो. या सर्वच विभूतींमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वार्थाने आदर्श, कारण ज्या प्रकारची चिकित्सक दृष्टी महाराजांकडे होती ती त्या पूर्वीच्या आणि त्यांच्या नंतरच्या सत्ताधाऱ्यांकडे दिसून येत नाही. संकटप्रसंगी नेमके काय करावे याबद्दल महाराजांनी जे तंत्र वापरले ते आपल्यासाठी आजही मार्गदर्शक आहे. मग त्यांनी केलेला जावळीच्या मोऱ्यांंवरील हल्ला, अफजलखान स्वारीच्या प्रसंगात त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणण्यासाठी पंत गोपीनाथ बोकील यांच्या माध्यमातून केलेला पत्रव्यवहार, सिद्धी जोहरच्या पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी आखलेली रणनीती, शाहिस्तेखानाची खोड मोडताना वापरलेली युक्ती, मिर्झाराजे जयसिंगाशी केलेल्या पुरंदरच्या तहामागील दूरदृष्टी, किंवा आर्ग्याहुन अशक्य असलेली सुटका या त्यांच्या जीवनातील तुम्हां आम्हां सर्वांनाच माहीत असलेल्या प्रसंगात महाराजांनी शत्रू पक्षाशी केलेला व्यवहार, संवाद व संघर्ष हा आपल्याला निश्चितच विचार करायला लावणारा आहे. केंव्हा माघार घ्यावी आणि केंव्हा आक्रमण करायचं हे जे गणित महाराजांना उमजल ते अनेक भारतीय राजांना नाही जमल. त्यांच्या पत्रव्यवहारातील भाषाचातुर्य ही सुद्धा एक दैवी देणगी असल्यासारखी वाटते. त्यांनी आखलेल्या प्रत्येक मोहिमा या किती अभ्यासपूर्ण होत्या यांचा जेव्हा आपण सखोल चिकित्सात्मक अभ्यास करतो तेव्हाच कळतात.
महाराजांनी स्वराज्य निर्मिती सोबतच राज्यव्यवहार कोश निर्माण केला या राज्यव्यवहार कोशाची संकल्पना महाराजांनी विजयनगरच्या साम्राज्याकडून घेतली होती व विजयनगरच्या राजांनी ती वेद उपनिषदांमधून घेतल्याचे पुरावे जागतिक दर्जाचे इतिहासकार त्रंबक शंकर शेजवलकर यांनी दाखवून दिले आहे. महाराजांनी भाषा शुद्धीकरणाच्या चळवळीचे बहुमोल कार्य केले. कारण त्यावेळी राजभाषेमध्ये मराठीपेक्षा फारसी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर होता.
ज्या अमावस्येला आपण कोणतेही शुभ कार्य करायचे टाळतो, महाराजांनी त्याच अमावस्येच्या रात्रीच्या गडद अंधाराचा उपयोग आपल्या मोहिमा पूर्णत्वास नेण्यासाठी केला. माणसे जोडताना त्यांनी राबवलेलं धोरण हे निश्चितच आपण अभ्यासायला हवे. त्यांनी त्यावेळच्या समाजातील अठरापगड जाती जमातीतील बांधवांना स्वराज्याची हाक दिली. गुलामगिरीच्या शृंखला तोडण्याचे आवाहन केले. शिवरायांच्या आवाहनाने मावळखोऱ्यात एक नवे चैतन्य निर्माण झाले. असे जीवाला जीव देणारी माणसं मिळवणे ही काही साधी गोष्ट नाहीं आणि अशा माणसांची संख्या आपण मोजू शकत नाही इतकी मोठी. यामुळेच हिंदवी स्वराज्य' ही संकल्पना किती व्यापक आहे हे लक्षात येण्यास निश्चितच मदत होते. अशा या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक सुखदुःखात महाराजांचा सक्रिय सहभाग असे. खऱ्या अर्थाने रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य महाराजांनी हाती घेतले. स्वराज्यात भेदभाव नव्हता, न्यायाचे राज्य होते, सर्वांना न्याय त्वरित मिळे. महाराजांनी स्वराज्याची प्रशासकीय व्यवस्था चोख लावली होती. महाराजांच्या सैन्यात व व्यवस्थापनात समाजातील सर्व घटकातील लोकांचा सहभाग होता. सर्व जनतेला हिंदवी स्वराज्याबद्दल आत्मिक प्रेम व विश्वास होता. म्हणूनच स्वराज्यासाठी सर्व काही त्याग करण्याची जनतेची भावना आपल्याला प्रकर्षाने जाणवते. महाराजांची त्यांच्या सैन्याला व प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही सक्त ताकीद असे. महिलांशी सन्मानाने वागावे, शेतीची नासधुस करू नये, यात कसूर करणाऱ्यांना महाराज कडक शिक्षा करत. महाराजांचा संघर्ष हा जनतेशी अमानुषपणे वर्तन करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होता. मग तेथे आप्त-स्वकीय, सुलतान, मुगल बादशाह, पोर्तुगीज, सिद्धी किंवा इंग्रज महाराजांनी सर्वांवरच जरब बसवली होती.
म्हणूनच महाराजांच्या राजमुद्रेत ‘मुद्रा भद्राय राजते' चा उल्लेख सापडतो. त्याचा अर्थ ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे जगातील पहिले लोक कल्याणकारी राज्य'असा होतो. ते खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य होते. भारतीय इतिहासातील आपण पराभूत झालेल्या अनेक लढायांचा अभ्यास करतांना असेही लक्षात येते की या युद्धांमध्ये राजा किंवा सेनापती धारातीर्थी पडला तर त्याच्या नेतृत्वाखालील सैन्य रणांगणातून सैरावैरा पळू लागे, परिणामी आपण अनेक जिंकत असलेली युद्धेही गमावली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र यासंदर्भात आपल्या सैन्याला जी एक प्रेरणा दिली त्यामुळे पुरंदर किल्ल्यावरील दिलेरखानाच्या हल्ल्यात मुरारबाजी पडल्यानंतरही मराठे लढत होते.
कोंढाण्यावर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतरही मराठे लढले आणि जिंकले. छत्रपती संभाजी महाराजांना फंद-फितुरीमुळे झालेल्या अटकेनंतर अत्यंत क्रूरपणे मारण्यात आले. त्यानंतर महाराणी येसूबाई व युवराज शाहू यांना मुघलांनी अटक केल्यानंतरही मराठे संघर्ष करतच राहिले. छत्रपती राजाराम महाराजांच्या अकाली निधनानंतर वारस नसतांनाही मराठे अखंडपणे औरंगजेबाशी लढत होते. त्यामुळेच हे स्वराज्य माझे आहे, ते वाढवले पाहिजे, टिकवले पाहिजे, ही भावना वाढीस लागली. आदेशाची वाट न पाहता मावळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः निर्णय घेत. म्हणूनच महाराजांच्या निर्वाणानंतर स्वराज्य गिळंकृत करण्याच्या इराद्याने आपल्या लाखो सैन्यानीशी स्वराज्यावर चालून आलेल्या स्वतः औरंगजेबाचाही मृत्यू याच भूमीत झाला पण त्याला मराठ्यांचे राज्य जिंकता आले नाही. या भारतीय भूमीवर गेल्या हजार पंधराशे वर्षांपासून सतत परकीयांनी आक्रमणे केली आणि भारतीय राजे सतत या आक्रमकांच्या भक्षस्थानी पडताना दिसत होते. आपण मात्र कधीही परकीय देशांवर आक्रमणे केल्याचे दिसत नाही. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण अनेक युद्धांमध्ये फंद-फितुरीमुळे, आपापसातील मतभेदांमुळे, वैयक्तिक अतिरेकी हेवेदाव्यामुळे पराभूत होत होतो. बऱ्याच वेळेला आपण पारंपारिक शस्त्रांनी लढत असताना आक्रमणकारी मात्र आपल्यापेक्षा प्रगत शस्त्रे वापरत असल्याचे दिसून येते. या सततच्या पराभवामुळे निर्माण झालेल्या पराभूत मनोवृत्तीतून भारतीयांना बाहेर काढणारे पहिले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
आपण बऱ्याच वेळा ऐकले आहे की अनेक भारतीय राजे युद्धात जिंकायचे पण तहात हरायचे किंवा युद्धात पराभव दिसत असल्यास यशस्वी माघार कशी घ्यावी याची कोणतीही योजना त्यांनी आखल्याचे दिसत नाही. पण ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत हे कधीच घडले नाही. त्यांनी आखलेल्या प्रत्येक योजनेत जर आपला पराभव झाला किंवा काही दगा-फटका झालाच तर पुढे काय करायचे याचा विचार व तशा सूचना त्यांनी आपल्या सर्वच महत्त्वाच्या सहकाऱ्यांना दिलेल्या असे. अफजलखानाचा वध व आर्ग्याहून सुटका यासारख्या अनेक प्रसंगांमध्ये याबद्दलचे स्पष्ट पुरावे मिळतात. बादशाहकडून आपल्याला अटक होईलच हे आधी माहीत नसतानाही अटक झालीच तर बाहेर कसं पडायचं आणि कशाप्रकारे महाराष्ट्रात परत यायचं याबद्दलचं आधीच नियोजन केलेलं असल्याचं आपल्याला अनेक ऐतिहासिक दस्तऐवजांवरून दिसून येतं. अफजलखानाच्या भेटीस जातांनासुद्धा काही विपरीत घडले तर पुढे काय करावे याबद्दलच्या सर्व सूचना त्यांनी आपल्या सर्वच महत्त्वाच्या सहकाऱ्यांना दिलेल्या असे. अफजलखानाचा वध व आर्ग्याहून सुटका यासारख्या अनेक प्रसंगांमध्ये याबद्दलचे स्पष्ट पुरावे मिळतात. बादशाहकडून आपल्याला अटक होईलच हे आधी माहीत नसतानाही अटक झालीच तर बाहेर कसं पडायचं आणि कशाप्रकारे महाराष्ट्रात परत यायचं याबद्दलचं आधीच नियोजन केलेलं असल्याचं आपल्याला अनेक ऐतिहासिक दस्तऐवजांवरून दिसून येतं. अफजलखानाच्या भेटीस जातांनासुद्धा काही विपरीत घडले तर पुढे काय करावे याबद्दलच्या सर्व सूचना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिलेल्या होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशाहच्या काळकोठडीतून स्वतःची सुटका कशी करून घेतली, हा एक खूप कठीण प्रसंग होता. याबद्दल आज उपलब्ध माहितीनुसार ही एक घटना महाराजांच्या कार्य कौशल्याची, दृष्टिकोनाची, योग्य निर्णय क्षमतेची, माणसं जोडण्याच्या प्रक्रियेची, आपल्या सभोवताली असणाऱ्या माणसांमध्ये आपल्याबद्दल विश्वास निर्माण करण्याची, त्यांना आपलंसं करण्याची, अगदी यातून दिल्लीचा बादशाह औरंगजेब हासुद्धा सुटला नाही याची आपल्याला सतत जाणीव होत राहते, पहारेकरी वर्ग, त्याचे प्रमुख, बादशाहच्या दरबारातील दरबारी मंडळी व स्वतः बादशाह या सर्वांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किंवा अनावधानाने मिळालेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले असेल आणि असे हे सहकार्य मिळवण्यात आपल्या बुद्धीचातुर्याने यशस्वी झालेले छत्रपती शिवाजी महाराज हे एक विलक्षण उदाहरण असल्याचं आपल्या सहज लक्षात येतं. बादशाहने महाराजांना जेव्हा काळ कोठडीत बंद केले आणि त्यानंतर छत्रपतींनी जो विचार केला, तो ज्या पद्धतीने केला बालपणी आपल्या आईकडून ऐकलेल्या रामायण- महाभारतातील गोष्टींचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला येऊ शकेल. महाभारतातील एका प्रसंगात अशाच प्रकारे लाक्षागृहामध्ये पांडवांना मारण्याचा जो एक अघोरी डाव रचला होता. त्यातून पांडव कसे बाहेर पडले याची काहीशी आठवण महाराजांच्या या आग्रा सुटकेतून दिसून येते. वर्तमानातील समस्यांचा सामना करताना भूतकालीन घटनांचा कसा उपयोग करायचा असतो, इतिहासातून नेमके काय आणि कसे शिकावे ही जी नवी दृष्टी आपल्याला महाराजांनी शिकवली, त्याचा खऱ्या अर्थाने आज आपण स्वीकार करण्याची गरज आहे. इतिहासाचा अभ्यास करताना आपण आपली दृष्टी कशी ठेवली पाहिजे याचं हे एक मूर्तीमंत उदाहरण आहे.
पण आम्हीं इतिहासापासून काहीच शिकत नाही, उलट तो सतत आपण विसरताना दिसतो किंवा तो जाणून घेण्याची किंवा समजून घेण्याची आपली मानसिकता नसते. त्यामुळेच इतिहासात घडलेल्या चुका पुन्हा-पुन्हा होताना दिसतात. याची अनेक उदाहरणे इतिहासात मिळतात. तशीच ती वर्तमानतही दिसतात. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुहम्मद घोरिला युद्धात अनेक वेळा पराभूत केले होते. प्रत्येक वेळी त्याला शरण आला किंवा दयेची याचना केली म्हणून सोडून दिले किंवा त्याला पळून जाऊ दिले. आपण परकीय अक्रमकांवर पराभूत केल्यावर अन्याय, अत्याचारही नाही केला. तोच मुहम्मद घोरी जेंव्हा पृथ्वीराज चव्हाणांना पराभूत करतो व पकडतो तेव्हा तो त्यांना सोडत नाही. त्यानंतर दक्षिण भारतातील समृद्ध अशा विजयनगरच्या साम्राज्यानेही बहामणी राजांना अनेक वेळा पराभूत केले होते. पण जेव्हा १५६५ च्या तालिकोटच्या युद्धात बहामनींचा विजय होतो तेव्हा ते पुढील सहा महिने विजयनगरची भयंकर लूट करतात ती इतकी असते की पुढे त्या प्रदेशाचे जंगलात रूपांतर होते. अगदी अलीकडच्या कालखंडात म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जगात अनेक युद्धे झालीत. त्या युद्धांचा जरी आपण अभ्यास केला तर तिथे ज्या प्रकारे युद्धानंतर करार करण्यात आले त्या करारांचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. उदा. अमेरिका-इराक युद्ध, शीतयुद्ध. कारण गेल्या सात दशकांमध्ये आपण पाकिस्तानला अनेक वेळा पराभूत केले व करार करून युद्ध थांबवले. पकडलेले सैनिकही सोडून दिले. पण कल्पना करा की जेव्हा आपल्या दुर्दैवाने एखाद्या युद्धात पाकिस्तानचा विजय झाला तर तो आपल्याशी याच प्रकारे वर्तन करेल याची खात्री देता येईल का?
आपली इतिहास न अभ्यासण्याची व इतिहासाच्या अभ्यासातून योग्य बोध न घेण्याची दृष्टी दिसते. छत्रपतींचा इतिहास हा समग्र भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे, हेच ‘भारतीय असंतोषाचे जनक' लोकमान्य टिळकांनीपण ओळखले होते म्हणूनच त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा मिळावी व समाजात एकता वाढीस लागावी म्हणून शिवजयंती उत्सव सुरू केला.
महाराज स्वराज्याच्या सीमांबद्दल एकदा आपल्या सहकार्याला सांगतात ‘सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. फारसी भाषेतही स्वराज्याच्या सीमांबद्दल महाराजांनी केलेला उल्लेख सापडतो त्यात ते म्हणतात ‘अहत पेशावर तहत तंजावर'.
महाराजांची जीवन दृष्टी ही इतकी व्यापक होती की ती अखंडपणे मानवजातीच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल. ज्ञानाच्या सर्वच क्षेत्रात या दृष्टीचा उपयोग होईल. पण त्यासाठी आपण महाराजांचे कार्यकर्तृत्व शालेय व विद्यापीठीय शिक्षणातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे. देशातील सर्वच विद्यापीठांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व हा केवळ इतिहास या विषयासाठी न ठेवता सर्वच विभागातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश करणे ही आज काळाची गरज आहे.
आज तुम्हाआम्हा सर्वांनी आपण निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करणे हाच एक शिवरायांचा मावळा म्हणून त्यांना केलेला मुजरा असेल त्या माध्यमातून देशाचेही भविष्य उज्ज्वल करण्यासाठीच्या महासागररुपी कार्यात आपल्यामुळे एका थेंबाची निश्चितच भर पडेल. अशा असंख्य थेंबानी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळेच हा भारत देश उद्या आत्मनिर्भर होऊन जगात महासत्ता होईल यात शंकाच नाही. एक शिक्षक म्हणून मी माझ्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही व्यक्तिरेखा अक्षरांकित केली. ही व्यक्तिरेखा पुढील अनेक पिढ्यांना अशीच संघर्षरत राहून जीवन जगण्याची प्रेरणा देत राहील. - प्रा.प्रशांत शिरुडे, के.रा.कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली