सारसोळे गावातील मच्छीमार्केट इमारतीचे भूमिपूजन संपन्न

सारसोळे गाव मधील १५० मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई

नवी मुंबई : आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या स्थानिक विकास निधीमधून सारसोळे ग्रामस्थांकरिता उभारण्यात येणाऱ्या ‘मच्छीमार्केट' इमारतीचे भूमिपूजन ‘नवी मुंबई'चे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.

याप्रसंगी आ. सौ. मंदाताई म्हात्रे, माजी नवी मुंबई जिल्हा भाजपाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी नगरसेवक सुरज पाटील, माजी नगरसेविका शशिकला पाटील, शुभांगी पाटील, माजी परिवहन समिती सदस्य काशिनाथ पाटील, राजेश रॉय, जयश्री चित्रे, सुहासिनी नायडू, जयेश थोरवे, मनोज मेहेर, संदीप मेहेर, जयेश मेहेर, परशुराम मेहेर, सुर्यकांत तांडेल यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सारसोळे गावातील मच्छीमार्केट पूर्ण मोडकळीस अवस्थेत असून, कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून सारसोळे येथील स्थानिक ग्रामस्थांनी आपणाकडे जसे दिवाळे गावात मच्छिमार्केट उभारले आहे तसे साररसोळे गावात मच्छीमार्केट आपल्या आमदार निधीमधून बांधून देण्यात यावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार स्थानिक विकास निधीमधून ७७ लाख रुपये निधी मंजूर करुन या निधीमधून सर्व सुविधायुक्त एक मजली मच्छीमार्केटची वास्तू सारसोळे मध्ये उभारण्यात येणार आहे. सदर मार्केटमध्ये जास्तीत जास्त गाळे कसे बनतील यावर जास्त भर देऊन ७७ लाख रुपयांपेक्षा जास्तीचा निधी वापरुन मार्केटची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच सारसोळे गावात पाण्याचे जलकुंभ, बहुद्देशीय इमारत, तरुणांनाकरिता व्यायाम शाळा, सोलर हायमास्ट आणि इतर स्थापत्य कामाकरिता स्थानिक आमदार निधी उपलब्ध करुन देणार आहे. तसेच सारसोळे गावालागत एखादी मोठी जागा उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी मच्छिमार बांधवांकरिता मासळी ठेवण्याकरिता कोल्डस्टोरेज उपलब्ध करून त्यांना दिलासा दिला जाणार आहे. येत्या काही काळातच मच्छिमार्केटची वास्तू उभी राहणार असून, ती सारसोळे ग्रामस्थांच्या पदरात पडणार आहे, असे यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

या कार्यक्रमात सारसोळे ग्रामस्थ मंडळ यांच्या तर्फे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा ‘जाहीर सत्कार' करण्यात आला. तसेच सारसोळे मच्छिमार्केट करिता ७७ लाख रुपये निधी मंजूर करुन मच्छिमार्केटचे भूमिपूजन केल्याबद्दल आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांचा सारसोळे ग्रामस्थांकडून तसेच सारसोळे प्रभागामधील शिवसैनिकांनी विशेष सत्कार केला.
‘एमएमआरडीए' तर्फे उभारण्यात येत असलेल्या बहुचर्चित न्हावाशेवा- शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नवी मुंबईतील सारसोळे गाव येथील १५० मच्छीमार बांधवांना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एक रकमी नुकसान भरपाई ३ लाख ३७ हजार रुपये बँक खात्यात जमा झाली आहे. उर्वरित मच्छीमार बांधवांची कागदपत्रांच्या अभावी नुकसान भरपाईची प्रक्रिया अपूर्ण आहे. नुकसान भरपाई न मिळालेल्या मच्छीमार बांधवांच्या कागदपत्रांची पडताळणी लवकरात लवकर करुन त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांचा पाठपुरावा सुरु आहे. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबई भाजपातर्फे  संविधानदिन साजरा;  स्वच्छता मोहिमेचे आयोजन