मुदत संपली तरीही दुकानांच्या पाट्या मराठीत नाहीत ; सानपाडा मनसे आक्रमक

अन्यथा खळखट्याक आंदोलन ; मनसेचा इशारा

नवी मुंबई - मुदत संपली तरीही पाट्या ठळक मराठीत नसलेल्या दुकाने व आस्थापना यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. यासंदर्भात मनसेने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवून ठळक मराठीत पाट्या नसलेल्या दुकानांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी शनिवारी केली. यावेळी उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे, शहर सचिव विलास घोणे, शहर सहसचिव दिनेश पाटील, विभाग अध्यक्ष योगेश शेटे, विभाग अध्यक्ष युवराज मनसुख, उपविभाग अध्यक्ष संजय पाटील, शाखा अध्यक्ष संजय कदम, शाखा अध्यक्ष मंगेश संभेराव उपस्थित होते.

सर्व दुकाने आणि आस्थापनांवर मराठी नामफलक लावण्यासाठी मा.सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांची वाढीव मुदत दिली होती. ती शनिवार, दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी संपली. नामफलक मराठीत लिहिण्याचा निर्णय मार्च, २०२२ मध्ये विधिमंडळ अधिवेशनात घेण्यात आला होता. त्याआधी २०१८ च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार असलेल्या दुकानांवर मराठी पाटी बंधनकारक होती. नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यांची संख्या कितीही असली तरी पाटी मराठीतच असणे बंधनकारक आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. तिचा यथोचित सन्मान राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र अद्यापही सानपाडा विभागातील अनेक दुकाने व आस्थापनांनी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नसल्याचे मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

मुंबई महानगरपालिकेने मराठीत नामफलक नसलेल्या दुकानात जेवढे कामगार असतील त्याप्रमाणे प्रतिकामगार दोन हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्याच धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिकेने देखील सानपाडा विभागात नामफलक मराठीत नसलेल्या दुकानात जेवढे कामगार असतील त्याप्रमाणे प्रतिकामगार दोन हजार रुपये दंड आकारण्याची कारवाई करण्याचे आदेश तात्काळ महापालिकेच्या संबंधित विभागाला द्यावेत. जेणेकरून मराठीत नामफलक नसलेल्या दुकानांना चांगलाच चाप बसेल अशी मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्रातून केली. महाराष्ट्रात व्यवसाय करून मराठी भाषेचा दुकाने व आस्थापनांकडून सन्मान राखला जाणार नसेल तर मनसे स्टाईलने 'खळखट्याक आंदोलन' करून मराठीत नामफलक नसलेल्या दुकानदारांना चांगलाच धडा शिकवण्याचा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी महापालिकेला पत्रातून दिला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सारसोळे गावातील मच्छीमार्केट इमारतीचे भूमिपूजन संपन्न