नवी मुंबई मेट्रो प्रमाणे दिघा गांव रेल्वे स्थानक सुरु करा

दिघा गांव रेल्वे स्थानक तयार होवून ते प्रवाशांच्या प्रतिक्षेत 

नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने खासदार राजन विचारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देवून त्यांचे आभार मानले आहेत. तसेच ऐरोली-कळवा एलिव्हेटेड या महत्वाकांक्षी प्रकल्पातील गेल्या ७ महिन्यांपासून तयार असलेले दिघा गांव रेल्वे स्थानकाचे देखील नवी मुंबई मेट्रोच्या धर्तीवर लोकार्पण करावे, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

वास्तविक पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ मिळत नसल्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून लोकार्पणाच्या प्रतिक्षेत असलेल्या बेलापूर ते पेंधर अशा मेट्रो मार्गाचे अखेर १७ नोव्हेंबर रोजी औपचारिकरित्या लोकार्पण सोहळा न करता उद्‌घाटन करण्यात आले. नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण होत नसल्यामुळे या मार्गावर असलेल्या ११ स्थानकातील नागरिकांना वेठीस धरले होते. या मार्गावर दिवसाला ३ ते ५ वेळा मेट्रो प्रवाशांशिवाय चालवली जात होती. यासंदर्भात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामार्फत नवी मुंबईत सह्यांची मोहिम सीबीडी स्थानकात राबविल्यानंतर सामान्य प्रवाशांकडून पंतप्रधान आणि सिडको महामंडळाच्या कारभाराविषयी तिखट प्रतिक्रिया उमटविण्यात आल्या. दिवाळी नंतर का होईना पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना मेट्रो मार्ग औपचारिक उद्‌घाटनाची वाट न बघता तातडीने सुरु करण्याचे निर्देश दिल्याने नवी मुंबईकरांना १२ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर न्याय मिळाला आहे.

दिघा गांव रेल्वे स्थानक तयार होवून ते प्रवाशांच्या प्रतिक्षेत आहे. या संदर्भात रेल्वेमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री यांना ४ ते ५ वेळा स्मरणपत्र देवून सुध्दा दिघा गांव रेल्वे स्थानक सुरु करण्यात आलेले नाही. दिघा परिसरात नव्याने सुरु होणाऱ्या आयटी कंपन्या आणि त्यामध्ये बाहेरुन येणारा नोकरदार वर्ग यांना ऐरोली रेल्वे स्थानकाचा किंवा ठाणे रेल्वे स्थानकाचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये प्रवाशांचा वाया जाणारा वेळ आणि पैशाची बचत टाळण्यासाठी दिघा गांव रेल्वे सुरु होणे अत्यंत गरजेचे आहे. जनतेच्या पैशातून कोट्यावधी रुपये खर्च करुन दिघा गांव रेल्वे स्थानक तयार झाले आहे. झालेल्या खर्चाचा आर्थिक भार भरुन निघणे महत्वाचे आहे. पण, दिघा गांव रेल्वे स्थानकाचे उद्‌घाटन रखडल्यामुळे रेल्वेचे उत्पन्नही घटले आहे, असे खा. राजन विचारे यांनी पंतप्रधान मोदी यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘माथाडी युनियन'तर्फे चंद्रकांत पाटील यांचा सत्कार