‘एनएमएमटी' बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत देण्याची मागणी

‘काँग्रेस'चे रविंद्र सावंत यांचे महापालिका आयुवतांना निवेदन

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेस मधून (एनएमएमएटी) प्रवास करणाऱ्या नव मंबई महापालिका हद्दीतील ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १३ नोव्हेंबर पासून मोफत बस प्रवासाचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबईकर महिलांना देखील ‘एनएमएमटी'च्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची मागणी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'चे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांच्याकडे केली आहे.
शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस (एसटी) मधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटामध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर ‘एनएमएमटी'ने देखील महिलांच्या सन्मानार्थ प्रवासी सेवेत ५० टक्के सवलतीच्या दरात तिकिट आकारणी करणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासन नवी मुंबईतील महिलांसाठी विविध जनकल्याणकारी योजना राबवित आहे. त्यामुळे सदरचा महिला हिताय निर्णय महापालिकाने लवकरात लवकर घेणे आवश्यक असल्याचे रविंद्र सावंत यांनी आयुवत राजेश नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नवी मुंबई महापालिकेने १३ नोव्हेंबर पासूनच नवी मुंबईकर ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी बसेस मध्ये मोफत प्रवासाची सुविधा सुर केली आहे. नवी मुंबईकर महिलांना प्रवासी सुविधा देण्यासोबत ‘एनएमएमटी'ने बसेसमधून प्रवास करताना त्यांना ५० टक्के सवलत देणे आवश्यक आहे. नोकरदार महिलांसोबत घरगुती महिलांना या निर्णयाने दिलासा मिळेल. घरगुती महिलांना या निर्णयामुळे कमी खर्चात प्रवास करणे शक्य होईल. एसटी महामंडळाने महिलांना यापूर्वीच महिलांना प्रवासामध्ये ५० टक्के सवलत दिलेली आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासात महिला प्रवाशांची संख्या वाढीस लागली आहे. परिणामी, एसटीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.

त्यामुळे महापालिका प्रशासनाने देखील लवकरात लवकर ‘एनएमएमटी'च्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घ्यावा. त्याअनुषंगाने संबंधितांना निर्देश देण्याची मागणी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'चे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांच्याकडे केली आहे. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘भाजपा'ची विचारसरणीच मी नव्हे; तर आम्ही -लोकनेते रामशेठ ठाकूर