मैदानावर खिलाडूवृत्ती, सांघिक भावना वाढीस लागते -आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर

नगररचना व मूल्य निर्धारण विभागाच्या कोकण विभागीय क्रीडा स्पर्धा जल्लोषात संपन्न

 नवी मुंबई :  खेळाडू म्हणून आपण जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा खिलाडूवृत्ती, सांघिक भावना वाढीस लागते व आपल्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतो असा स्वानुभाव कथन करीत ‘माणदेशी एक्सप्रेस’ म्हणून नावाजल्या जाणा-या आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर यांनी समर्पित भावनेने झोकून देऊन खेळताना आपल्याला दुखापत होऊन आपली क्रीडा कारकीर्द वाया जाणार नाही याचीही प्रत्येकाने काळजी घ्यावी असे सांगितले.

      नगररचना व मूल्य निर्धारण विभागाच्या वतीने राजीव गांधी क्रीडांगणात आयोजित करण्यात आलेल्या कोकण विभागीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ जागतिक पातळीवर देशाचे नाव गाजविणा-या धावपटू ललिता बाबर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी कोकण विभागीय नगररचना विभागाचे सहसंचालक जितेंद्र भोपळे, एमएमआरडीएच्या उपसंचालक ज्योती कवाडे, नमुंमपा घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, कोकण विभागाचे नगररचनाकार राजेंद्रसिंग चव्हाण तसेच नवी मुंबई महापालिकेचे नगररचनाकार तथा क्रीडा स्पर्धा समन्वयक सोमनाथ केकाण व इतर मान्यवर उपस्थित होते.

      कोकण विभाग नगररचना सहसंचालक जितेंद्र भोपळे यांनी शुभारंभप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अधिकारी, कर्मचारी यांच्या दृष्टीने या स्पर्धांचे महत्व विषद करीत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कोकण विभागातील कोकण भवनसह रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, सिंधूदुर्ग, पालघर तसेच यजमान नवी मुंबई महापालिका अशा 8 संघांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. क्रिकेट, व्हॉलीबॉल, धावणे, बुध्दीबळ, बॅडमिंटन, कॅरम, बास्केटबॉल, टेबल टेनीस अशा 8 क्रीडा प्रकारांमध्ये नगररचना विभागातील 260 हून अधिक अधिकारी, कर्मचारी खेळाडूंनी या सर्व स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे गोट्या, विटीदांडू, भोवरा अशा पारंपारिक खेळांचीही सुविधा याठिकाणी उपलब्ध असल्याने अनेकांनी शाळेचे दिवस आठवल्याचे सांगितले. 

 नगररचाना अधिकारी, कर्मचा-यांच्या अंगभूत क्रीडागुणांना उत्तेजन देणारा उत्तम उपक्रम – सुमा शिरूर
 विविध क्रीडाप्रकारांतील पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या नेमबाजी क्रीडा प्रकारात ऑलंपिकसह आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचाविणा-या रायफल शुटींगपटू सुमा शिरूर यांनी नगररचना विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या अंगभूत क्रीडा गुणांना उत्तेजन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध खेळांच्या स्पर्धांबद्दल नगररचना व मूल्य निर्धारण विभागाचे कौतुक केले.

   नगररचना संचालनालय पुणे संचालक अविनाश पाटील यांनी या स्पर्धांमुळे अधिकारी, कर्मचारी यांना स्वत:च्या क्षमता सिध्द करण्याची चांगली संधी उपलब्ध होत असल्याचे कथन करीत या माध्यमातून परस्परांमध्ये साघिक भावना निर्माण होत असल्याचे सांगितले व मोठ्या संख्येने सहभागाबद्दल अभिनंदन केले.  नगररचना विभागाच्या संचालक तथा नगरविकास विभागाच्या सहसचिव प्रतिभा भदाणे यांनी कोकण विभागाने ज्या दिमाखदार पध्दतीने आयोजन केले त्याची प्रशंसा करीत एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित आहोत अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी नगरविकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी, नगररचना उपसंचालक कर्वे व ज्योती कवाडे, कोकण विभागीय सहसंचालक जितेंद्र भोपळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या मान्यवरांच्या शुभहस्ते विविध क्रीडा स्पर्धांमधील विजेत्यांना चषक, पदके आणि रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली.

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

'खारघर मॅरेथॉन २०२३' च्या अनुषंगाने  मॅरेथॉन प्री इव्हेंट सायकलिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद