नवी मुंबईत मल्लखांब स्पर्धा सीबीडी-बेलापूर येथे मल्लखांब स्पर्धा मोठ्या उत्साहात पार
नवी मुंबईत पहिल्यांदाच मल्लखांब स्पर्धा संपन्न
नवी मुंबई ः नवी मुंबईत मल्लखांब स्पर्धेला पहिल्यांदाच सुरुवात झाली असून १५ जानेवारी रोजी सीबीडी-बेलापूर येथे मल्लखांब स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. श्री अम्बिका योग कुटीर आणि नवी मुंबई मल्लखांब असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सदर मल्लखांब स्पर्धेत नवी मुंबईतील चार संस्थांमधील ६५ खेळाडुंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन दादोजी कोंडदेव पुरस्काराचे मानकरी तथा विश्व मल्लखांब संघटनेचे सचिव उदय देशपांडे यांनी केले. याप्रसंगी ‘नवी मुंबई प्रेस क्लब'चे अध्यक्ष मनोज जालनावाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
मल्लखांब स्पर्धा विविध वयोगटामध्ये पार पडल्या. या स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला यांचे एकूण सहा-सहा वयोगट होते. आंतरराष्ट्रीय पंच डॉ. रवी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या सदर स्पर्धेत ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक तथा संशोधक महेश अटाळे यांनी तांत्रिक जबाबदारी स्वीकारुन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
नवी मुंबईत अशा प्रकारे मल्लखांब स्पर्धा पहिल्यांदाच घेण्यात आल्या. तसेच येणाऱ्या काळात या स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणात होतील, अशी अपेक्षा नवी मुंबई मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष विलास चव्हाण आणि कार्यवाह तथा प्रशिक्षक संजय रायचुरकर यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सर्व खेळाडूंना प्रोत्साहन प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांना मल्लखांबाची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली.