खारघर मध्ये महापालिका तर्फे ‘ट्राफिक पार्क' उभारणी
खारघर : शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना वाहतुकीची माहिती व्हावी, सिग्नल यंत्रणा समजावी आदींसह वाहतुकीचे नियम विद्यार्थी-विद्यार्थिनींना बालपणापासून अंगवळणी पडावेत या उद्देशाने पनवेल महापालिका तर्फे खारघर सेक्टर-३५ मध्ये ‘ट्रॅफिक पार्क' उभारण्यात येणार असून, येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या ‘ट्राफिक पार्क'चे भूमिपूजन होणार आहे. पनवेल आणि नवी मुंबई परिसरात प्रथमच ‘ट्राफिक पार्क' उभारण्यात येणार असल्यामुळे या ‘ट्राफिक पार्क' मध्ये शालेय विद्यार्थ्यांची रेलचेल असणार आहे. पनवेल महापालिका हद्दीत प्रथमच आणि सर्वात मोठे उद्यान असलेले ‘ट्राफिक पार्क' उभे राहणार असल्यामुळे खारघर मधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
‘सिडको'ने खारघर वसाहत निर्माण करताना सेक्टर-२, सेक्टर-२१ परिसरात सेक्टर निहाय उद्यान आणि खेळाचे मैदान विकसीत केले आहे. मात्र, उंच इमारतीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर सेक्टर-३० ते सेक्टर-३६ परिसरात उद्यान आणि खेळाचे मैदान विकसित करण्याकडे ‘सिडको'ने दुर्लक्ष केले. पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यावर खारघर सेक्टर-३५एफ, प्लॉट नंबर-९ ए मधील ९ हजार चौरस मीटर जागेत १५ कोटी ८१ लाख २५ हजार रुपये खर्च करुन महापालिका तर्फे ‘ट्राफिक पार्क' उभारले जाणार आहे. या ‘ट्राफिक पार्क' मध्ये लहान मुले-मुलींसाठी वाहतुकीचे नियम, वाहतूक व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी एक क्लासरुमही सुरु केली आहे. वाहन कसे चालवावे याची माहिती देखील दिली जाणार आहे. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी ड्रायव्हींग टॅ्रक,वाहतुकीच्या नियमाचे धडे देणारे खेळाचे मैदान, रोड क्रॉसिंग, रेल्वे, रेल्वे स्थानक, क्लॉक टॉवर, व्यासपिठ, पिण्याचे पाणी, बस थांबा, स्थिर रेल्वे ट्रॅक, पेट्रोल पंप, रुग्णालय,पोलीस ठाणे, तिकीट घर, सुरक्षा कॅबिन, शाळा, पदपथ, उद्यानात बसण्यासाठी सोय, इलेक्ट्रिक मोटार बाईक आणि कारसह सायकल ट्रॅक, ॲम्पिथिएटर, पादचारी पूल, बफर झोन, पोलिसांचे शिल्प, शिल्प कलेतील पुरुष, पाम ट्री अव्हेन्यू, गुरांचे शिल्प अभिमुखता केंद्र, आर्कषक गेट, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान, सायकल ट्रॅक, बच्चे कंपनीसाठी आकर्षक खेळणी, संध्याकाळी जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारण्यासाठी गेल्यानंतर खाण्याचा मोह झाल्यास फूड कोर्ट, आकर्षक उद्यान, रंगीबिरंगी फुलांची नजरेच्या टप्प्यात सामावणारी उद्यान अत्याधुनिक स्वरुपाची महिला आणि पुरुषांसाठी शौचालय आदी सुविधा ‘ट्राफिक पार्क' मध्ये असणार आहेत. सेंट्रल पार्क नंतर पनवेल आणि नवी मुंबईतील पहिले ट्राफिक पार्क असल्यामुळे या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची रेलचेल असणार आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी संख्या असणाऱ्या खारघर मध्ये पनवेल महापालिका तर्फे वाहतूक नियमनाविषयी बालकांना साक्षर करणारे पहिले वाहतूक नियमनांचे (ट्रॅफीक) उद्यान खारघर वसाहतीमध्ये उभारले जाणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने याबाबत ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाहतुकीचे नियमन लहानग्यांना समजण्यासाठी या उद्यानाची मागणी केली होती. त्यानंतर पनवेल महापालिका प्रशासनाने ‘ट्राफिक पार्क' बांधण्याचा निर्णय घेतला आहे, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
पनवेल महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार खारघर मध्ये उभारल्या जाणाऱ्या ‘ट्राफिक पार्क'चे भूमिपूजन येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. दोन वर्षात उद्यानाचे काम पूर्ण केले जाणार आहे. पनवेल आणि नवी मुंबई महापालिका हद्दीतील सदर पहिले ‘ट्राफिक पार्क' असणार आहे. लहान मुले-मुली आणि पालकांसाठी आकर्षक असे ‘ट्राफिक पार्क' असणार आहे. - राजेश कर्डीले, उप अभियंता - पनवेल महापालिका.