नवी मुंबई पोलीस दलातील चार पोलीस अधिका-यांना राष्ट्रपती पदक जाहिर

नवी मुंबई  : पोलीस दलात उल्लेखनीय आणि गुणवत्तापुर्वक सेवा बजावणा-या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील चार पोलीस अधिका-यांना 2025 च्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाचे सहाय्यक पोलिस आयुक्त धर्मापाल बनसोडे, कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कारभारी कोते व सहाय्यक पोलिस उप निरीक्षक जितेंद्र विठ्ठल म्हात्रे या चार अधिका-यांचा यात समावेश आहे. या चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहिर झाल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.    

पोलीस सेवेत उल्लेखनीय आणि गुणवत्तापुर्वक कामगिरी करणाऱया पोलिसांना केंद्रीय गृह विभागाकडुन प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदकाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील एकुण 43 पोलीस या पदकाचे मानकरी ठरले असून यात अपर पोलिस आयुक्त दीपक साकोरे यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपदी पदक जाहीर झाले आहे. तसेच व सहाय्यक पोलिस आयुक्त धर्मापाल मोहन बनसोडे, पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते तसेच सहाय्यक पोलिस उप निरीक्षक जितेंद्र विठ्ठल म्हात्रे यांना गुणवत्ताापुर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे. या सर्व पोलीस अधिका-यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  
 
दीपक साकोरे (अपर पोलीस आयुक्त-नवी मुंबई)
1996 साली पोलीस उप अधिक्षक (डीवायएसपी) पदावर सेवेत दाखल  झाल्यानंतर दीपक साकोरे यांनी पोलीस उप अधिक्षक म्हणुन यवतमाळ, धुळे, बार्शी, सोलापूर, इंचलकरजी, कोल्हापुर येथे उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनतर त्यांनी ठाणे ग्रामीण येथे अपर पोलीस अधिक्षक ठाणे येथे लाचलुचपत विभागात पोलीस अधिक्षक म्हणुन देखील उत्तमरित्या कामकाज केले आहे. पुणे शहरात पोलीस उप आयुक्त असताना देखील साकोरे यांनी अनेक क्लिष्ट व सायबर गुन्हयांची उकल केली आहे.

साकोरे यांच्या उत्कृष्ठ कामगीरीची दखल घेवून त्यांना पोलीस महासंचालकांकडुन सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या सुरक्षिततेच्या दुष्टीने बंदोबस्ताची यशस्वीरित्या आखणी केली होती. त्यांच्या या कौशल्यपुर्ण कामगीरीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांना सन्मानित केले आहे. नवी मुंबईत कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांनी अनेक सराईत गुन्हेगारांवर मोक्का कायद्यातंर्गत कठोर कारवाई करुन अनेक कुविख्यात गुंडांना पकडण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.  

धर्मापाल मोहन बनसोडे-(सहाय्यक पोलीस आयुक्त-नवी मुंबई)  
कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणासाठी ओळखले जाणारे सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल मोहन बनसोडे 1992 मध्ये महाराष्ट्र पोलिस विभागात पोलिस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. सध्या ते नवी मुंबई पोलीस दलात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणुन कार्यरत आहेत. एसीपी बनसोडे यांनी दोन संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. जागतिक शांततेसाठी त्यांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना उत्कृष्ट प्रशंसा आणि प्रतिष्ठित पदके मिळाली आहेत.

मुंबई बॉम्ब पथकात सेवा बजावत असताना, त्यांनी काही वेळातच टाईम बॉम्ब यशस्वीरित्या निकामी केला होता. त्यामुळे शेकडो लोकांचे मौल्यवान जीव आणि मालमत्ता वाचवली होती. त्यांनी बॉम्ब, स्फोटके ओळखणे आणि प्रति-उपाय याबाबत एक हजारहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील दिले आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या गौरवशाली कारकिर्दीत, त्यांनी अनेक गंभीर गुन्हे शोधून काढले आहेत, तसेच त्यांची उकल केली आहे. मुंबईतील इमिग्रेशनमध्ये काम करत असताना, त्यांनी अनेक बनावट व्हिसा आणि पासपोर्ट देखील शोधून काढले आहेत. त्यांनी शंभर हून अधिक मुलींना वेश्याव्यवसायाच्यातून बाहेर काढले आहे.  

राजेंद्र कारभारी कोते (पोलीस निरीक्षक)  
1995 च्या बॅचचे अधिकारी असलेले राजेंद्र कोते हे सध्या कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणुन कार्यरत आहेत. त्यांची पोलीस दलात 30 वर्षे सेवा पुर्ण झाली असून त्यांना एकूण 211 बक्षीस मिळाली आहेत. तसेच त्यांना डी.जी.पीकडुन सर्वोत्तम सामग्री विकासक पुरस्कार, सर्वोत्तम प्रशिक्षक पुरस्कार, ऍडव्हान्स इपिमेंट असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्याशिवाय त्यांचे डी.जी.पी.कडून विशेष कौतुक करण्यात आले आहे.  

जितेंद्र विठ्ठल म्हात्रे (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक)  
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र म्हात्रे हे 1993 मध्ये रायगड पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून दाखल झाले असून सध्या ते पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सन 2007 पासून ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यरत असून त्यांनी एकूण 32 वर्ष उल्लेखनीय सेवा पूर्ण केली आहे. पोलीस खात्यामध्ये काम करत असताना गुन्हे प्रकटीकरण, गोपनीय कारकून, लेखनिक कारकून म्हणून त्यांनी उत्तमरित्या कामकाज केले आहे. सध्या ते प्रतिबंधक कारवाईचे कामकाज करत आहेत. आतापर्यंत त्यांनी आपल्या सेवेत एकूण 226 बक्षिसे मिळवलेली आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रजासत्ताक दिनी  रा. फ. नाईक विद्यालयात योगासनाचा जागतिक विक्रम