प्रजासत्ताक दिनी  रा. फ. नाईक विद्यालयात योगासनाचा जागतिक विक्रम 

नवी मुंबई : कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात आज प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये  योगासनाचा जागतिक विक्रम करण्यात आला. माजी आमदार तथा श्रमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संदीप नाईक यांच्या  हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये

अष्टांग इन्स्टिट्यूट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथीचे  सौ. अनुजा अय्यंगार  आणि डॉ. संदीप डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वीरभद्रासन या आसन प्रकारात १६०१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले.

या योग सत्रामध्ये योगमुद्रा, परिवृत्त परिधासन, ताडासन यांसारख्या विविध योग प्रकारांचेही सादरीकरण करण्यात आले. वर्ल्ड रेकॉर्डची घोषणा भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमुख श्री. संजय नार्वेकर यांनी केली. त्यांच्या घोषणेनंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून आनंद व्यक्त केला.

वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र   संस्थेचे अध्यक्ष श्री. संदीप नाईक यांना प्रदान करण्यात आले. या ऐतिहासिक विक्रमासाठी संदीप नाईक यांनी  अष्टांग योग, रा.फ. नाईक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आणि संस्थेचे  अभिनंदन करून सर्वांसाठी हे यश  प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन केले.  

त्यांनी आपल्या भाषणातून देशाच्या प्रगतीचा आलेख उभा करताना कोरोना महामारीनंतर उभ्या राहणाऱ्या भारताचे चित्र रेखाटले.  देशातील आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर भाष्य करताना शांतता आणि सहिष्णुतेचे महत्त्व अधोरेखित केले. विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयाने देश गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "राष्ट्र प्रथम" ही संकल्पना प्रत्येकाने मनात बिंबवावी, असे त्यांनी सांगितले.

श्रमिक मंडळाचे सदस्य सदानंद म्हात्रे, समाजसेवक श्रमिक शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी नरेंद्र म्हात्रे, मुख्याध्यापक श्री. रवींद्र पाटील, एफ. जी. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक, समन्वयक डॉ. दत्तात्रय घोडके, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ सीमा म्हात्रे, सौ गौरी पवार, सौ सुमती सुप, सौ. राजश्री यादव, क्रीडा शिक्षक मयूर पालांडे, रवींद्र पष्टे, संदीप शिकारे, शुभम दळवी, श्री. दिलीप गोंधळी आदी मान्यवर प्रजासत्ताक दिन सोहळ्यात उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन'चे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण