दिवाळे बेटावर प्रथमच फडकणार राष्ट्रध्वज

नवी मुंबई : आज २६ जानेवारी रोजी बेलापूर येथील दिवाळे बेटावर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ७८ वर्षांनी देशाचा तिरंगा झेंडा प्रथमच फडकणार आहे. देशातील निर्मनुष्य बेटांवर भारताचा राष्ट्रध्वज फडकावण्याबाबत केंद्र सरकारने सर्व राज्यातील शासकीय यंत्रणांना निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बेलापूर येथील दिवाळे बेटावर नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून तिरंगा झेंडा फडकावण्यात येणार आहे. २६ जानेवारी रोजी नेव्ही, कोस्टगार्ड, वन विभाग, सिडको या शासकीय विभागाचे अधिकारी नवी मुंबई पोलिसांसह या ध्वजारोहणास आवर्जुन उपस्थित राहणार आहेत.

दिवाळे बेटावर ध्वजारोहण करता यावे म्हणून गेल्या १५-२० दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सर्वप्रथम या निर्जन बेटाची ३-४ वेळेस पाहणी करण्यात आली. तेव्हा त्या ठिकाणी एक सिग्नल बोर्ड आणि वॉच टॉवर उभारलेला नजरेस पडला. या बेटाच्या चारही बाजुला खाडी असल्याने बोटींना सिग्नल देण्यासाठी या टॉवरची उभारणी काही वर्षांपूर्वी एका खाजगी कंपनीद्वारे करण्यात आली होती. मात्र, सद्यस्थीत सदर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे पोलिसांना आढळून आले.

विशेष म्हणजे या बेटाच्या आजुबाजुला असलेल्या दलदलीमुळे दिवाळे बेटावर उतरणे पोलिसांसाठी आव्हानात्मक बाब होती. भरती-ओहोटीच्या वेळा पाहून या बेटावर उतरण्याचा सुरुवातीस ३-४ वेळा प्रयत्न केला गेला. अखेर या बेटावर उतरण्यासाठी पोलिसांनी पाण्यातूनचा (बार्ज) वापर करण्याचे ठरविले. या बेटाच्या एका भागाच्या किनारी भरतीच्या वेळेस पोलिसांनी पाणतून नेऊन तिथेच बांधून उभा केला आहे. या पाणतून वरुन एक रॅम्प बेटाच्या जमिनीवर उतरवण्यात आला आहे. त्यामुळे ओहोटीच्या वेळेस देखील या बेटावर जाणे आता पोलिसांना शक्य होणार आहे.

२ वर्षांनंतर दिवाळे बेटावर तिरंगा झेंडा फडकावण्यात पोलिसांना यश... 

मागील दोन वर्षांपासून दिवाळे बेटावर तिरंगा झेंडा फडकावण्याचा प्रयत्न नवी मुंबई पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, या बेटाजवळ असलेली दलदल, जाण्या-येण्यास रस्ता नसल्याने आणि भरती-ओहोटीच्या वेळा जुळून येत नसल्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. मात्र, आता २६ जानेवारी रोजी दिवाळे बेटावर झेंडा फडकावण्याचा निश्चय नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केला आहे. त्यामुळे विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त इंद्रजित कार्ले यांच्या नेतृत्वाखाली दिवाळे बेटावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. 

बेलापूर येथील ध्रुवतारा जेट्टीवरुन नवी मुंबई पोलीस या सर्व निमंत्रित अतिथींसोबत बोटीतून दिवाळे बेटावर सकाळी ७ च्या सुमारास निघणार आहेत. त्यानंतर दिवाळे बेटावर प्रथमच ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

पलॅग पोस्टची उभारणी...
दिवाळे बेटावर ध्वजारोहणासाठी नवी मुंबई पोलिसांनी नव्याने पलॅग पोस्ट उभारला आहे. २६ जानेवारी रोजी ध्वजारोहणानंतर त्या दिवसापुरते या ठिकाणी २ पोलीस कर्मचारी दिवसभर तैनात करण्यात येणार आहेत. या ध्वजारोहणाचे ड्रोनद्वारे देखील चित्रीकरण केले जाणार असल्याचे इंद्रजित कार्ले यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई पोलीस दलातील चार पोलीस अधिका-यांना राष्ट्रपती पदक जाहिर