नवी मुंबई पोलिसांचे सायबर सेफ नवी मुंबई ऑफिशयल यु-ट्यूब चॅनल सुरु

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, महिला विषयक गुन्हे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सायबर सेफ नवी मुंबई ऑफिशयल  (Cyber Safe Navi Mumbai Official) असे यु-ट्युब चॅनल सुरु केले आहे. त्यामुळे स्वतःचे अधिकृत यु-ट्युब आणि व्हॉटस्‌ॲप चॅनल सुरु करणारे नवी मुंबई पोलीस महाराष्ट्रामध्ये पहिले ठरले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांचे कौतुक होत आहे.

नवी मुंबई शहरातील वाढते सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, अंमली पदार्थ विरोधी गुन्हे, महिला सुरक्षा संदर्भातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई पोलिसांनी समाज माध्यमांचा आणि डिजीटल माध्यमांचा वापर करुन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी स्वतःचे सायबर सेफ नवी मुंबई ऑफिशयल (Cyber Safe Navi Mumbai Official) यु-ट्युब चॅनल सुरु केले आहे.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या या युट्युब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्यामध्ये सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, अंमली पदार्थ विरोधी गुन्हे, महिला सुरक्षा संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. नवी मुंबई पोलिसांच्या या यु-ट्युब चॅनल मधून विविध गुन्ह्यांना प्रतिबंध कसे करायचे? याबाबतची माहिती प्रसारित केली जाणार आहे. तसेच आठवड्यातील एक दिवस विविध विषयातील तज्ञ व्यक्ती जनतेसोबत थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
या व्यतिरिक्त नवी मुंबई पोलीसांचे अधिकृत व्हॉटस्‌ॲप चॅनल, इन्स्टाग्राम अकाऊंट, फेसबुक पेज आणि एक्स हॅन्डल यापूर्वीच सुरु करण्यात आलेले आहेत. या सर्व चॅनल, अकाऊंटच्या माध्यमातून नागरिकांमध्ये विविध विषयावर जनजागृती केली जात आहे. तसेच नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन क्र. ८८२८-११२-११२ देखील सुरु करण्यात आले आहे. सदर हेल्पलाईन द्वारे नागरिकांना विविध सायबर गुन्ह्यांबाबत माहिती देऊन त्यांना जागरुक केले जात आहे.

नवी मुंबई पोलिसांतर्फे सुरु करण्यात आलेले सर्व चॅनेल्स, अकाऊंट फॉलो करण्याबाबत आणि त्यावरील माहिती शेअर करुन इतर लोकांना देखील जागरुक करुन नवी मुंबई पोलिसांच्या या प्रयत्नांना हातभार लावावा.
-मिलिंद भारंबे, पोलीस आयुवत-नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शालेय विद्यार्थी सुरक्षासंदर्भात ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरण'तर्फे बैठक