घोडबंदर येथील बोरिवडे मैदान गिळंकृत

ठाणे : ठाणे शहरातील घोडबंदर परिसरात बोरिवडे मैदान ठेकेदाराने गिळंकृत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार सदर मैदानाचे आरक्षण असून देखील, महापालिका अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे ते डंपिंग ग्राऊंड बनले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. दरम्यान, महापालिकेने सदरचे अतिक्रमण त्वरित हटवावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ‘मनसे जनहित-विधी विभाग'चे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी दिला आहे.

ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात विविध जागांच्या आरक्षणाचा उल्लेख असून, काही ठिकाणी विकासकांकडून टीडीआर मार्फत विकास कामे केली जातात. घोडबंदर क्षेत्र जलद गतीने विकसित होत असून, येथे हावरे, रौनक, भूमी सारखे मोठे विकासक काम करीत आहेत. मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढल्याने ठाणे महापालिकेने बोरिवडे येथे खेळाचे मैदान आरक्षित ठेवले आहे. पण, या परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक मुलांना खेळण्यासाठी हक्काचे मैदान उपलब्ध नाही. ठेकेदाराने मैदानाच्या बहुतेक जागांवर कब्जा केले असून, तिथे शेड उभारली आहे आणि पाईपची साठवणूक केली आहे. ठेकेदार सदर पाईप त्याच्या वैयक्तिक कामासाठी वापरत असल्याने स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठाणे शहरात अनेक मैदाने आहेत. मात्र, या मैदानावर अतिक्रमण केल्यामुळे मुलांना हक्कचे खेळण्यासाठी मैदान मिळत नसल्याची परिस्थिती आहे. अनेक शाळांना मैदान नसल्यामुळे रहिवाशी परिसरातीलही मैदाने विकासकांकडून गिळकृंत केली जात असल्याने मुले मैदानापासून वंचित राहत आहेत. महापालिकेच्याच आरक्षित जागेवर विकासक अतिक्रमण करत असताना प्रशासन त्यांना आदण देत आहे. स्थानिक नागरिकांना त्यांच्या हक्काचे खेळाचे मैदान मिळावे, यासाठी अखेर आंदोलनाची भूमिका घेतली असल्याचे महिंद्रकर यांनी सांगितले.

घोडबंदर येथील बोरिवडे मैदान येथील अतिक्रमण महापालिकेने लवकरात लवकर हटवले नाही तर ‘मनसे'च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यास सर्वस्व जबाबदार ठाणे महापालिकेचे अधिकारी असतील.
-स्वप्नील महिंद्रकर, शहर अध्यक्ष-मनसे जनहित व विधी विभाग. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई पोलिसांचे सायबर सेफ नवी मुंबई ऑफिशयल यु-ट्यूब चॅनल सुरु