‘माझी वसुंधरा अभियान' कोकणात वेगाने राबवा - विभागीय आयुक्त डॉ. देशमुख

नवी मुंबई : पर्यावरणातील बदल लक्षात घेता माझी वसुंधरा अभियान ५.० कार्यक्रम कोकण विभागात वेगाने राबवावा. प्रत्येक यंत्रणेने या अभियानात सक्रिय व्हावे, असे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

‘माझी वसुंधरा अभियान ५.० 'च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच विभागीयस्तरीय ऑनलाईन दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक झाली. त्यावेळी आयुवत देशमुख बोलत होते. या आढावा बैठकीत संचालक (माझी वसुंधरा अभियान) सुधाकर बोबडे, उपायुक्त (नगरपरिषद प्रशासन) गणेश शेटे, उपायुक्त (विकास) डॉ. प्रदीप घोरपडे, सहायक आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) सागर घोलप, तसेच कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी, ‘जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा सह-आयुक्त (नगपरिषद प्रशासन), ‘नगरपरिषद'चे मुख्याधिकारी, ‘पंचायत समिती'चे गटविकास अधिकारी उपस्थित होते.

माझी वसुंधरा अभियान शासनाचा महत्वपूर्ण कार्यक्रम आहे. वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे आवश्यक आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी ‘माझी वसुंधरा अभियान'मध्ये भूमी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्वावर काम अधिक व्यापक होण्याकरिता मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन कोकण विभागात सदर अभियान यशस्वी करावे, असे आयुक्त डॉ. राजेश देशमुख म्हणाले.

या आढावा बैठकीत ‘माझी वसुंधरा अभियान ५.०'चे भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश तत्वावर आधारित टुलकीटचे सविस्तरपणे प्रेझेंटेशन ‘माझी वसुंधरा अभियान'चे संचालक सुधाकर बोबडे आणि त्यांच्या पथकाने केले.

भूमी घटकामध्ये वृक्ष लागवड, रोपवाटिका निर्मिती, बांबू-खस-शेवगा लागवड, बीज संकलन, घनकचरा व्यवस्थापन, ओला-सुका कचरा प्रक्रिया, सिंगल युज प्लास्टिक बंदी तसेच वायू घटकामध्ये वायू गुणवत्ता परीक्षण, फटक्यावर बंदी, ईलेक्ट्रिकल वाहन धोरण, वातावरण बदल जनजागृती आणि जलघटकामध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प बसविणे, भूजल पुनर्भरण, सांडपाणी प्रक्रिया, पाणथळ जागांचे संवर्धन यांचा समावेश असून अग्नी घटकामध्ये निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जानाबाबत प्रसार-प्रचार, हरित पथदिवे, हरित इमारती, कूला रुफींग तर आकाश घटकामध्ये ई-शपथ, ‘अभियान'मध्ये स्पर्धा आणि जनजागृती, पर्यावरण दूत, तरुणांचा सहभाग, माझी वसुंधरा तत्वे दर्शविणारे प्रचार आणि प्रसिध्दी, बचतगट सहभाग, शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग करुन घेणे या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान, ‘माझी वसुंधरा अभियान ५.०'मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत अधिक प्रभावीपणे कामे करुन राज्यस्तरीय मानांकन प्राप्त करण्यासाठी शहरांच्या मुख्याधिकारी यांनी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. देशमुख यांनी उपस्थितांना दिल्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वस्तिका घोषने पटकाविला विजेतेपद