स्वस्तिका घोषने पटकाविला विजेतेपद

पनवेल : अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस ५१ व्या चॅम्पियनशिप स्पर्धेत टेबल टेनिसपटू आणि सीकेटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वस्तिका संदीप घोष हिने एकेरी महिला गटात विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे स्वस्तिका हिने ऑलिम्पिक खेळाडू श्रीजा अकुला हिचा पराभव करत दैदिप्यमान कामगिरी केली. या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिका घोष हिचे अभिनंदन केले.

२४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान चंदीगड येथील पंजाब विद्यापीठ जिम्नॅशियम हॉलमध्ये सदर स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये देशभरातील खेळाडुंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत खारघर टेबल टेनिस अकादमी आणि सीकेटी कॉलेज पनवेलची विद्यार्थिनी असलेल्या स्वस्तिका घोषने ‘भारतीय विमानतळ प्राधिकरण'चे प्रतिनिधित्व केले. स्वस्तिका घोष सध्या भारतात महिला गटात १४ व्या तर जागतिक रँकमध्ये १२८ व्या क्रमांकावर आहे. सदर स्पर्धेत तिने ३ पदके जिंकली. महिला एकेरीमध्ये चॅम्पियन आणि महिला दुहेरीमध्ये उपविजेते आणि सांघिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले.  स्वस्तिका घोष हिच्या नेतृत्वाखाली ‘विमानतळ प्राधिकरण टीम'ने चमकदार कामगिरी करत या स्पर्धेत सर्वोच्च १२० गुण मिळवले.  अंतिम फेरीत स्वस्तिकाने भारत रँक एक आणि जागतिक रँक २३ ऑलिंपियन खेळाडू श्रीजा अकुलाला ४-२ सेट स्कोअरने पराभूत केले आणि प्रथम आंतर संस्थात्मक चॅम्पियन बनले.

या विजयाबद्दल बोलताना स्वस्तिकाचे वडील तथा प्रशिक्षक संदीप घोष यांनी सांगितले की, या विजेतेपदामुळे स्वस्तिकाची रँक सुधारण्यास आणि भारतीय संघात पुन्हा निवड होण्यास मदत झाली आहे. २०२१-२२ मध्ये स्वस्तिका भारतात चौथ्या क्रमांकावर होती. तिने वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि वर्ल्डकप साठी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच कॉमनवेल्थ इंडिया संघात पाचव्या क्रमांकाची खेळाडू ठरली आहे. या आंतरसंस्थात्मक टीटी चॅम्पियनशिप बरोबरच स्वस्तिकाने पंचकुला हरियाणा येथे १६ ते २२ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस चॅम्पियनशिप नॉर्थ झोन स्पर्धेत आणखी एक महत्त्वाचे कांस्यपदक जिंकले. त्यामुळे एकूणच स्वस्तिकाने यशाची घौडदौड सुरू ठेवली असून या स्पर्धा तिला आत्मविश्वास देणारे ठरले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एमएमआर क्षेत्रात विकास कामे, स्टोन क्रशर, बेकरी, रेडिमिक्स कारखान्यांवर निर्बंध