नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
नवीन पनवेल, कळंबोली अग्निशमन केंद्र पनवेल महापालिकेला हस्तांतरीत
पनवेल : एमएमआर भागात सगळयात चांगल्या सेवा सुविधा पनवेल महापालिका देते याचा अभिमान आहे. आरेाग्य सेवेबाबतीत सर्वोत्तम सेवा देणारी महापालिका म्हणून पनवेल महापालिकेकडे पाहिले जाते. त्याच पध्दतीने आपली मोठी उद्दिष्ट्ये ठेवून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेची सर्व टिम पनवेलकरांना अपेक्षित असलेले सहकार्य देऊन, आपत्कालीन सेवेसाठी दक्ष राहण्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
नवीन पनवेल अग्निशमन केंद्रा ‘सिडको'कडून पनवेल महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आले आहे. या हस्तांतरण कार्यक्रमाप्रसंगी आमदार ठाकूर बोलत होते. यावेळी आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त कैलास गावडे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक, मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडखे, सहाय्यक आयुक्त स्वरुप खरगे, अग्निशमन अधिकारी हरिदास सुर्यवंशी, उप अग्निशमन केंद्र अधिकारी संदीप पाटील, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तसेच कळंबोली येथील अग्निशमन केंद्र देखील ‘सिडको'कडून पनवेल महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आले.
पनवेल महापालिकेचा जास्तीत जास्त सुविधा देण्यावर भर असून सध्या अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांना महापालिका क्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीनुसार रेस्क्यू ट्रेनिंग दिले जात आहे. याबरोबरच महापालिका कार्यक्षेत्रात अद्ययावत अग्निशमन सेवा-सुविधा देण्याच्या दृष्टीने विविध उपकरणे महापालिका लवकरच खरेदी करणार आहे, असे आयुवत मंगेश चितळे म्हणाले.
या अग्निशमन केंद्रांच्या हस्तांतरणाने महापालिकेकडे हक्काचे पनवेल, कळंबोळी, नवीन पनवेल असे ३ अग्निशमन केंद्र मिळाले आहेत. आता नवीन पनवेल आणि कळंबोली येथील अग्निशमन केंद्रांतील प्रत्येकी २ अग्निशमन वाहनांसमवेत हस्तांतरण करण्यात आले असून, नुकत्याच झालेल्या भरती दरम्यान महापालिका अग्निशमन विभागात ११० अग्निशमन कर्मचाऱ्यांची भरतीही करण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांना महापालिका क्षेत्रातील संभाव्य धोके, नदी, इमारती या सर्वांचा विचार करुन प्रशिक्षण देण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त कैलास गावडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त स्वरुप खारगे यांनी केले. 
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    