नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
भिंवडीत आता सीसीटिव्हीद्वारे वाहतूक नियंत्रण
भिवंडी : गेल्या काही वर्षांपासून भिवंडी शहरांतर्गत सरकारी आणि महापालिकेची परिवहन प्रवासी सेवा नसल्याने शहरात मोठ्या संख्येने दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून अनेकवेळा वाहन चालकांना आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यावर अंकुश आणण्यासाठी आता ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत भिवंडी शहरात वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतुकीच्या मुख्य मार्गावर व्हिडीओ कॅमेरे लावणार आहेत.
सीसीटिव्ही बाबतच्या माहितीनंतर शहरातील बेशिस्त वाहन चालकांमध्ये खळबळ माजली आहे. शहरातील मुख्य रहदारीच्या मार्गावर नेहमी रिक्षा रेंगाळत असल्याने त्यांच्या समुहाने ठिकठिकाणी रस्ता अडविलेला दिसून येतो. तर अनेकदा रिक्षा चालक आणि दुचाकी चालक वाहतुकीचे नियम तोडून वाहने हाकताना दिसतात. त्यामुळे अनेकदा ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते. तर बऱ्याचदा चोरीची दुचाकी आणि तीन चाकी वाहने रस्त्यावर फिरत असतात. या वाहनांची तपासणी होत नसल्याने रिक्षा राजरोसपणे व्यवसाय करतात. तर चोरीच्या दुचाकी पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून जलदगतीने पळविल्या जातात.
त्याचप्रमाणे शहरातील अनेक चारचाकी वाहनांनी अवैधरित्या काळ्याकुट्ट काचा लावल्या आहेत. तर काहींनी अशा काचा लावून पुढे पदाधिकारी असल्याच्या पाट्या लावल्याने पोलीस त्यांच्यावर कारवाई करीत नाही. अशी वाहने आता सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद होणार आहेत. अनधिकृत पार्किंग आणि नो-एन्ट्री मध्ये घुसणारे वाहन चालक देखील कॅमेऱ्यामध्ये दिसणार आहेत. तसेच शहराबाहेरुन येणाऱ्या जड-अवजड वाहनांवर देखील या माध्यमातून कारवाई होणार आहे. अशा सर्व कारवाई मुळे शहरातील आणि शहराबाहेरील वाहन चालकांना शिस्त लागणार असून वाहतूक पोलिसांवरील ताण कमी होणार आहे. तसेच मुख्य रहदारीच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी पासून वाहन चालकांची आणि नागरिकांची सुटका होणार आहे.
भिवंडीत होणारी वाहतूक कोंडी आणि अनेक वाहन चालकांमध्ये असलेला वाहतूक शिस्तीचा अभाव, त्याचप्रमाणे वाहतूक पोलिसांची कमतरता यामुळे ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी भिवंडी विभागात सीसीटिव्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यात अशा प्रकारे विविध शहरात सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. भिवंडीत सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यासाठी शहरातील विविध मार्गांचे आणि चौकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. काही महत्वाच्या ठिकाणी महापालिकेची परवानगी देखील घेण्यात येणार आहे.
-शरद ओहोळ, सहाय्यक पोलीस आयुवत-भिवंडी वाहतूक विभाग.
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    