रस्ता अपघातास आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांद्वारे जनजागृती; दंडात्मक कारवाई

उरण : उरण वाहतूक शाखा तर्फे रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच वाहन चालकांना रहदारीची शिस्त लावण्याकरिता गेल्या नोव्हेंबर महिन्यात विशेष मोहीम राबवून  मोटर वाहन कायद्याखाली एकूण ३ हजार ३१० वाहन चालकांविरुध्द विविध कलमाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, संबंधित वाहन चालकांना एकूण ३० लाख २६ हजार २५० रुपये एवढ्या रकमेचा दंड आकारण्यात आला आहे. सदर कारवाई अंतर्गत विदाऊट हेल्मेट दुचाकी वाहन चालवणाऱ्या १४७ चालकाविरुध्द तसेच रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी चार चाकी आणि अवजड वाहने उभी  करुन रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या २ हजार ७२७ वाहन चालकाविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत मद्य प्राशन करुन वाहन चालवणाऱ्या एकूण ९ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. उरण वाहतूक शाखा परिसरातील वाहन चालकांनी  महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर वाहने चालवताना स्वतःचे आणि इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मोटर वाहन कायद्याचे पालन करावे, असे आवाहन ‘उरण वाहतूक शाखा'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे  यांनी केले आहे.

दरम्यान, न्हावाशेवा वाहतूक शाखा  द्वारे रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच वाहन चालकांना रहदारीची शिस्त लावण्याकरिता गेल्या नोव्हेंबर महिन्यात विशेष मोहीम आखून मोटर वाहन कायद्याखाली एकूण २ हजार४५० वाहन चालकाविरुद्ध विविध कलमाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, संबंधित वाहन चालकांना एकूण २४ लाख ५० रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे.

सदर कारवाई अंतर्गत विदाऊट हेल्मेट दुचाकी वाहन चालवणाऱ्या ९५०  चालकाविरुध्द तसेच रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी चारचाकी आणि अवजड वाहने पार्क करुन रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या १ हजार २५०  वाहन चालकांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, जेएनपीए  तसेच उलवे परिसरातील वाहन चालकांनी महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर वाहने चालवताना स्वतःचे आणि इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मोटर वाहन कायद्याचे पालन करावे, असे आवाहन न्हावाशेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम. मुजावर यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भिंवडीत आता सीसीटिव्हीद्वारे वाहतूक नियंत्रण