भाडे नाकारणाऱ्या ४२५ रिक्षा चालकांवर कारवाई      

नवी मुंबई : प्रवाशांना भाडे नाकारुन बेशिस्तपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात नवी मुंबई वाहतूक विभागाने विशेष मोहीम सुरु केली आहे. या विशेष मोहिमेंतर्गत वाहतूक पोलिसांनी मागील ३ दिवसामध्ये प्रवाशांना भाडे नाकारणाऱ्या ४२५ रिक्षा चालकांविरोधात कारवाई केली आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांनी साध्या वेशामध्ये प्रवासी बनून रिक्षा चालकांची तपासणी करुन सदर कारवाई केली. या कारवाईमुळे भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत.      

नवी मुंबई क्षेत्रात असलेले काही रिक्षा चालक वाहतुकीचे नियम न पाळता बेजबाबदारपणे रिक्षा चालवत असल्याचे वाहतूक विभागाच्या निदर्शनास आले होते. तसेच रिक्षा चालक भाडे नाकारत असल्याच्या अनेक तक्रारी प्रवाशांनी वाहतूक पोलिसांकडे केल्या होत्या. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत कार्यरत असलेल्या १६ वाहतूक शाखेच्या वतीने रिक्षा युनियन, रिक्षा चालक-मालक यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते.  

मात्र, त्यानंतर देखील काही रिक्षा चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन बेशिस्तपणे रिक्षा चालवत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक विभागाने प्रवाशांना भाडे नाकारणाऱ्या बेशिस्त रिक्षा चालकांविरुध्द २७ ते २९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत विशेष मोहीम राबवली होती. या विशेष मोहिमेदरम्यान नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या १६ शाखेतील अंमलदारांनी साध्या वेशामध्ये प्रवासी बनून रिक्षा चालकांची तपासणी केली. या तपासणीत ४२५ रिक्षा चालकांनी भाडे नाकारल्याचे आढळून आले. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या रिक्षा चालकांवर कारवाई केली.  

यापुढील काळात देखील रिक्षा चालकांविरोधातील कारवाई सुरुच रहाणार आहे. रिक्षा चालक-मालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन वाहतूक सुरळीत ठेवण्यास नवी मुंबई वाहतूक विभागास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.  
-तिरुपती काकडे, पोलीस उपायुवत-नवी मुंबई वाहतूक विभाग. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रा.फ.नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली एड्‌सविरोधी जागृती