नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
‘तळोजा एमआयडीसी'तील विषारी वायू प्रदुषणाने नागरिक त्रस्त
नवीन पनवेल : तळोजा एमआयडीसी येथील विविध कारखान्यांमधून सोडण्यात येणाऱ्या विषारी वायुच्या विसर्गामुळे तळोजा फेज-१, फेज-२ आणि परिसतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक श्वास आणि इतर रोगांना बळी पडत आहेत. तळोजा औद्योगिक क्षेत्रातील विषारी वायू प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलन उभे करावे लागेल, असा इशारा ‘तळोजा फेडरेशन'चे अध्यक्ष प्रसाद ढगेपाटील यांनी ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'ला निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच तळोजा फेज-२ येथे प्रदुषण पातळी दर्शविणारा कायमस्वरुपी इंडेक्स मॉनिटर बसवण्यात यावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्या रात्रीच्या वेळी विषारी वायू सोडत असल्याने परिसरातील नागरिकांचा जीव गुदमरत आहे. पहाटेच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या घातक प्रदुषणाने नागरिकांना कैद्यासारखे कोंडून घ्यावे लागत आहे. सकाळी दरवाजे उघडताना नागरिकांना सावधानता बाळगावी लागत आहे. उग्र वासाने काहींना उलट्या होत आहेत. तर विषारी वायुने काहींना दमा आणि फुफुसाचे आजार झाले आहेत. विषारी वायू प्रदुषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरु आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या तोंडरे, पडघे, पेंधर, घोटगाव, देवीचापाडा, खेरणे, ढोंगऱ्याचा पाडा, नावडे, रोडपाली, खिडुकपाडा या गावांबरोबर पनवेल महापालिका क्षेत्रातील तळोजा फेज-१, २, खारघर, कळंबोली, खांदा कॉलनी, नवीन पनवेल आणि कामोठे मधील वायू प्रदुषणाची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. औद्योगिक क्षेत्रातून रात्रीच्या वेळी सोडल्या जाणाऱ्या हानिकारक वायुमुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतो. तर ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना, गर्भवतींना दम लागण्याचे प्रकार वाढले आहेत. तक्रार करुनही कंपन्यांकडून होणाऱ्या घातक वायू प्रदुषणाकडे ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'कडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
या विरोधात लढा देण्यासाठी नागरिक एकवटले असून ‘तळोजा फेडरेशन'चे अध्यक्ष प्रसाद ढगेपाटील यांनी ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या अधिकाऱ्यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेवून तळोजा क्षेत्रातील कंपन्यांतून सोडण्यात येणाऱ्या विषारी प्रदुषणाबाबत चर्चा केली. तसेच प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर ताबडतोब कारवाई करण्याचीही मागणी केली. तळोजा फेज-२ येथे कायमस्वरुपी इंडेक्स मॉनिटर बसवावा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    