राज्यस्तरीय ११व्या ‘अटल करंडक' एकांकिका स्पर्धाचे आयोजन

पनवेल : दरवर्षी प्रमाणे यंदाही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त), पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘अटल करंडक' एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, यंदा या स्पर्धेचे ११वे वर्ष आहे. या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला १ लाख रुपये आणि मानाचा ‘अटल करंडक' पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

नाटय चळवळ वृध्दींगत व्हावी, नाट्य रसिकांना आपले नाटयविष्कार प्रदर्शित करता यावेत, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृध्दींगत व्हावा, या उद्देशाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद'चे पनवेल शाखा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा', असे ब्रीदवाक्य घेऊन ‘अटल करंडक एकांकीका स्पर्धा' या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे आणि निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण तसेच सर्वोत्तम स्पर्धा स्थळ यामुळे ‘अटल करंडक एकांकीका स्पर्धा' नाट्यरसिकांच्या गळयातील ताईत बनली आहे.

या स्पर्धेची प्राथमिक फेरी नाशिक केंद्र येथे येत्या १३ डिसेंबर रोजी, जळगाव केंद्र येथे १४, १५ डिसेंबर रोजी, पुणे केंद्र येथे १९ ते २२ डिसेंबर दरम्यान, पनवेल केंद्र येथे २५ डिसेंबर रोजी तसेच मुंबई, ठाणे, कल्याण आणि इतर (पनवेल) केंद्र येथे प्राथमिक फेरी २६ ते २९ डिसेंबर दरम्यान होणार आहे.  स्पर्धेची अंतिम फेरी १० ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.  या एकांकिका स्पर्धेत राज्यभरातून १०० पेक्षा अधिक एकांकिकांचा सहभाग असतो. नवनवीन संकल्पना आणि  दर्जेदार एकांकिका सादर होत असल्याने ‘अटल करंडक' महाराष्ट्रभर सुप्रसिध्द झाला आहे. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत स्पर्धेचा आवाका वाढला आहे.

‘अटल करंडक एकांकीका स्पर्धा' मधील विजेत्या प्रथम क्रमांकास १ लाख रूपये, प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय क्रमांकास ७५ हजार रुपये, तृतीय क्रमांकास ५० हजार रुपये, चतुर्थ क्रमांकास २५ हजार रुपये, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी १० हजार रुपये तसेच इतरही वैयक्तिक प्रकारची पारितोषिके देऊन कलाकारांना सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचा नाट्य संस्था कलाकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद'चे पनवेल शाख अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘तळोजा एमआयडीसी'तील विषारी वायू प्रदुषणाने नागरिक त्रस्त