नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
महापालिका उत्पन्न वाढीसाठी टास्क फोर्स
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्न वाढीकडे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी बारकाईने लक्ष देत विशेष कार्यबळाची अर्थात ‘टास्क फोर्स'ची स्थापन केली आहे. पाच सदस्यीय समिती (टास्क फोर्स) महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याकरिता उपाय सुचविणार आहे. त्यामध्ये थकबाकी वसुलीकरिता आणि विद्यमान वसुलीसाठी नियोजन करुन सोबतच उत्पन्न वाढीचे नवीन स्त्रोत सूचित करणार आहे. याबाबतचा अहवाल १५ दिवसात सादर करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘टास्क फोर्स' कार्यरत असणार असून मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त शरद पवार, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, सहा. संचालक (नगररचना) सोमनाथ केकाण असे चार सदस्य महापालिकेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नियोजन करणार आहेत.
उत्पन्नवाढीसाठी उपाय सूचविताना ‘टास्क फोर्स'ने विद्यमान कार्यपध्दतीमध्ये कोणते बदल करावे लागतील याच्या सूचना कराव्यात आणि असे बदल केल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशा पध्दतीने, किती दिवसात करता येईल आणि कधीपासून उत्पन्नवाढ होईल ते प्रस्तावात नमूद करावे, असे सूचित करण्यात आलेले आहे.
थकबाकी, चालू वसुली आणि नवीन स्त्रोतामधून अपेक्षित वाढ याचे नियोजन सादर करण्याच्याही सूचना देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय खर्चात बचत एक प्रकारे उत्पन्नवाढ असून त्यादृष्टीने आवाजावी खर्च टाळून आणि आवश्यक तेथे काटकसर करुन खर्चामध्ये किती बचत होईल? याचीही माहिती सादर करण्याचे आदेशात नमूद आहे.
त्यासोबतच शक्य आहे तेथून शासन निधी प्राप्त करुन घेण्यासाठी करावयाचे प्रयत्न आणि अशी कामे शासन निधीतून करुन महापालिकेचा निधी इतर सुविधा कामांसाठी वापरण्याबाबत सूचना कराव्यात, असे सूचित करण्यात आले आहे. दुबार योजनांचा शोध घेऊन त्या योजना बंद करण्याबाबत अभिप्राय द्यावेत. तसेच इतर महापालिकांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उत्पन्न वाढीच्या चांगल्या कार्यपध्दती अभ्यासून त्यांचे अनुकरण करण्याबाबत सूचना कराव्यात, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
उत्पन्न वाढीबाबत विविध विभागांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचे सविस्तर अवलोकन करुन ‘टास्क फोर्स'ने महापालिकेच्या उत्पन्न वाढीचा विभागनिहाय प्रस्ताव सादर करावा. तसेच त्याच्या अंमलबजावणीचे नियोजन करावे आणि त्याबाबतचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर करावा असे आदेशात सूचित करण्यात आले आहे.
महापालिकेला विविध करांतून प्राप्त होणाऱ्या महसुलातूनच विविध नागरी सुविधांची परिपूर्ती केली जात असल्याने नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महापालिकेच्या उत्पन्न वाढीकडे विशेष लक्ष दिले आहे. आयुक्त डॉ. कैलास शिंदे प्रत्येक विभागामार्फत होणाऱ्या करवसुलीचा नियमित आढावा घेत असतात. आता उत्पन्न वाढीसाठी आयुक्तांनी ‘टास्क फोर्स'ची स्थापना केली असून या माध्यमातून महापालिकेचे आर्थिक सक्षमीकरण होणार आहे. त्या माध्यमातून नवी मुंबईकरांना अधिक उत्तम आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.
 
                     
                                     
                                         
                                         
                                    