एपीएमसी संचालक मंडळ निवडणूक बाबत प्रशासन संभ्रमात?

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) संचालक मंडळाचा कार्यकाळ २ मार्च २०२५ संपणार आहे. मात्र, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती नियुक्ती ऑगस्ट-२०२० मध्ये करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक नेमकी कधी होणार?, याबाबत एपीएमसी प्रशासन देखील संभ्रमात आहे.

राज्यातील ३०५ बाजार समिती आणि ६२५ उपमार्केटची शिखर संस्था म्हणून वाशी मधील ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार  समिती'ची ओळख आहे. मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये एकुण २७ संचालक असतात. सहा महसूल विभागातून प्रत्येकी २ शेतकरी प्रतिनिधी, वाशी मधील कांदा-बटाटा-लसूण, भाजीपाला, फळ, धान्य आणि मसाला बाजारातून प्रत्येकी १ मिळून ५ संचालक तर माथाडी, हमाल, कामगारांमधून १ संचालक निवडला जातो, अशी १८ मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती संचालकांची निवडणूक होते. याआधी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीवर २०१३ ते २०२० दरम्यान सलग सात वर्ष प्रशासक राजवट होती.त्यानंतर २८ फेब्रुवारी २०२० रोजी ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती'ची निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीचा २ मार्च २०२० रोजी निकाल लागला होता. मात्र, निकाल लागताच देशात कोविड संक्रमण आल्याने टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्यामुळे मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकी अभावी सभापतींची नेमणूक करण्यात आली नव्हती. ३१ ऑगस्ट २०२० रोजी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत बीड येथल शेतकरी प्रतिनिधी अशोक राव डक यांची सभापती पदी नेमणूक करण्यात आली. त्यामुळे मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाचा कार्यकाळ २ मार्च २०२० पासून धरायचा की ३१ ऑगस्ट २०२०पासून पकडायचा या संभ्रमात मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासन आहे. त्यामुळे पणन विभागाकडून योग्य उत्तर आल्यानंतर मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीची पुढील दिशा ठरणार आहे.

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती संचालकांची निवडणूक २८ फेब्रुवारी २०२० रोजी पार पडली होती. मात्र, ‘कोविड टाळेबंदी'मुळे सभापतींची नेमणूक ३१ ऑगस्ट २०२० रोजी झाली होती.त्यामुळे संचालक मंडळाचा कार्यकाळ कुठला पकडायचा याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन आगामी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणूक बाबत रुपरेषा आखली जाणार आहे. - पी. एल. खंडागळे, सचिव - मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, वाशी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एड्‌सविरोधी जनजागृतीसाठी सरसावले महाविद्यालयीन तरुण तरूणी