रुग्णालयासाठी आरक्षित भूखंडावर फेरीवाल्यांचे बस्तान

वाशी : नवी मुंबई शहराची निर्मिती करत असताना सिडको तर्फे सामाजिक सुविधांसाठी नवी मुंबई शहरामध्ये अनेक भूखंड आरक्षित ठेवले आहे. मात्र, ‘सिडको'ने आरक्षित ठेवलेले भूखंड सुरक्षित ठेवण्यात नवी मुंबई महापालिका प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे. ‘सिडको'ने आरक्षित ठेवलेल्या बहुतांश भूखंडांवर अवैध इमारती बांधण्यात आल्या असून, काही भूखंडावर फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याचे चित्र घणसोली मध्ये दिसत आहे.

घणसोली सेक्टर-७ मध्ये रुग्णालयासाठी आरक्षित असणाऱ्या भूखंडावर भाजी विक्रेत्यांनी विनापरवाना बाजार मांडला आहे. महापालिकेने आरक्षित ठेवलेल्या अनेक भूखंडावर सध्या फेरीवाल्यांनी डोळा ठेवला आहे. घणसोली सेवटर-७ मधील भूखंडावर भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केलें आहे. या भूखंडावर संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळया आणि गेट गंजल्याने काढून टाकण्यात आल्या आहेत. त्यातच या ठिकाणी रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी घणसोली सेक्टर-७ मधील मैदानावर अतिक्रमण केले आहे. या मैदानात गेट तोडून भाजी विक्रेत्यांनी शिरकाव केला आहे. भाजी विक्रेते, कांदा बटाटा विक्रेत्यांनी मागील काही महिन्यांपासून घणसोली सेक्टर-७ मधील मैदानात विनापरवाना व्यवसाय सुरु केला आहे. महापालिकेने आरक्षित केलेल्या भूखंडावर अतिक्रमण करुन सदर भूखंड गिळंकृत करण्याचा डाव असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घणसोली मधील महापालिका अतिक्रमण विरोधी पथक इतर ठिकाणी रस्त्यावर बसलेल्या फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करते, मग आरक्षित भूखंडावर झालेले अतिक्रमण त्यांच्या निदर्शनास आले नाही का?, असा प्रश्न उपस्थित करीत नागरिकांनी घणसोली सेक्टर-७ मधील मैदानातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
-----------------------------
नवी मुंबई महापालिकेच्या  घणसोली सेक्टर-७ मधील भूखंडावर अतिक्रमण केल्याबाबत पाहणी करण्यात येईल. अतिक्रमण पथकाकडून या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. घणसोली विभागात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करणाऱ्यांवर तसेच पदपथावर बस्तान मांडणाऱ्या बेकायदा फेरीवाले, भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल. - संजय तायडे, घणसोली विभाग अधिकारी - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी संचालक मंडळ निवडणूक बाबत प्रशासन संभ्रमात?