मालमत्ता कर विभागात आता गुणवत्ताधारक अनुभवी कर्मचाऱ्यांची निवड

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्तोत्र मालमत्ता कर विभाग असून महापालिकेच्या आर्थिक हिताचा विचार लक्षात घेता मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात सुधारणा करणे गरजेचे असल्याचे आयुक्त विकास ढाकणे यांचे मत आहे. त्याअनुषंगाने आयुवत ढाकणे यांनी मालमत्ता कर विभागाचा आढावा घेतला असता कर्मचाऱ्यांची कर आकारणी, कर संकलन याबद्दलची बौध्दीक पातळी, काम करण्याची कार्यक्षमता आणि वसुलीच्या उदिष्टांच्या पुर्ततेसाठी कर्मचाऱ्यांची चाचणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यामान ज्या कर्मचाऱ्यांना काहीच येत नाही अशा वशिलेबाजांना मालमत्ता कर विभागातून हलवण्यासाठी प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेण्याचे आयुक्तांनी निश्चित केले आहे. यामुळे गुणवत्ता असलेले आणि हुशार कर्मचारी आपल्या प्रयत्नाने परीक्षेतून यश संपादन करुन या विभागात नियुक्ती मिळवू शकतात. यासाठी कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्याचे आदेश आयुक्त ढाकणे यांनी दिले आहेत.

दिवसेंदिवस तेच कर्मचारी त्याच विभागामध्ये काम करीत असल्याचे महापालिकेत दिसून येते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची बदली अन्य विभागात होणे आवश्यक आहे. अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे रिक्त होणाऱ्या पदान्वये महापालिकेतीलच इतर कर्मचाऱ्यांची बदली करावी लागेल. असे कर्मचारी देखील कर विभागात काम करण्यास पात्र ठरण्याकरिता कर विषयक ज्ञानाची परीक्षा घेऊन अशा कर्मचाऱ्यांच्या गुणानुक्रमे येणाऱ्या यादीनुसार सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांची मालमत्ता कर विभागात बदली सर्वात प्रथम केली जाईल. त्यानंतर दुसरा, तिसरा या प्रमाणे आवश्यक त्या बदल्या केल्या जातील. आवश्यक बदल्याच्या नंतर उर्वरीत यादी प्रतिक्षा यादी म्हणून राखीव ठेवली जाईल. आवश्यकतेनुसार त्यातील कर्मचारी कर विभागाकडे पुरविले जातील. तसेच इतर विभागातून कर विभागाकडे बदलीने जाण्यासाठी परीक्षेसाठी पात्रता कोणत्याही विषयाचा पदवीधर आणि महापालिकेच्या सेवेत किमान ५ वर्षाचा अनुभव अशी निश्चित करण्यात आली आहे.

मालमत्ता कर विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची तसेच महापालिकेतील इच्छुक लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील मालमत्ता कराशी निगडीत कलमे आणि नियम याचे विशेष प्रशिक्षण, सामान्य बौध्दीक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षेकरिता विशेष प्रशिक्षण-मार्गदर्शन सत्र ५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत महासभा सभागृह येथे होणार आहे. तर १० डिसेंबर रोजी सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत महासभा सभागृह येथे मालमत्ता कर विषयी चाचणी परीक्षा होणार आहे.

मालमत्ता कर विभागात सद्या कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांना देखील सदर चाचणी परीक्षा देणे बंधनकारक राहील. जे कर्मचारी किमान ५० टक्के गुण लेखी परीक्षेत प्राप्त करतील, त्यांनाच कर आकारणी आणि कर संकलन विभागात कार्यरत ठेवण्यात येतील. अन्यथा त्यांची बदली इतरत्र कोणत्याही खात्यात करण्यात येईल, असे महापालिकेने कार्यालयीन आदेशात म्हटले आहे

इतर विभागातील जे कर्मचारी किमान ५० टक्के गुण प्राप्त करतील किंवा त्यापेक्षा गुण प्राप्त करतील त्या गुणवत्ता क्रमांकानुसार मालमत्ता कर विभागात नियुक्ती दिली जाईल. सदर परीक्षा १०० गुणाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची असेल. तसेच सदर परीक्षेमध्ये सोडविलेल्या प्रत्येक ४ चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील, असे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, उल्हासनगर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना परीक्षेची कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जीटीआय बंदर मधील ऑपरेटर्सना तब्बल १९ हजार रुपये पगारवाढ!