पनवेल महापालिकेत ई-ऑफीस प्रणाली

पनवेल : शासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी ई-ऑफिस अंमलबजावणी करण्याबाबत मानक कार्यपध्दती  शासनाच्या वतीने सुचित करण्यात आली आहे. त्यानुसार पनवेल महापालिकेतील कार्यालयीन कामकाजाकरिता आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार ई-ऑफिस सॉपटवेअर प्रणालीचा वापर महापालिकेतील विविध विभागासाठी तसेच महापालिका हद्दीतील वॉर्ड ऑफिसेसमध्ये करण्याच्या दृष्टीने २७ नोव्हेंबर रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात एनआयसी सेंटरच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणावेळी उपायुक्त कैलास गावडे यांनी आपल्या प्रस्तावनेत ई-ऑफिस सॉपटवेअर प्रणलीचे स्वरुप आणि महत्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासनाने कार्यालयीन कामकाज ई-ऑफीसद्वारे करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २ महिन्यापासून प्रयत्न सुरु असून सर्व डाटा गोळा करुनच सदरची संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. याचा दुसरा भाग म्हणजे प्रशिक्षणास सुरुवात झाली आली असल्याचे गावडे यांनी सांगितले.

याप्रसंगी महापालिका उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उपायुक्त रविकिरण घोडके, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, शहर अभियंता संजय कटेकर, लेखा अधिकारी संग्राम ऱ्होरकाटे, सहाय्यक आयुक्त स्वरुप खारगे, सहाय्यक आयुक्त स्मिता काळे, विविध विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ई-ऑफीस सॉपटवेअर विनामुल्य पुरविण्यात आले असून एनआयसी संस्थेच्या माध्यमातून महापालिकेत सदरची प्रणाली राबविण्यात येत आहे. एनआयसी संस्थेच्या प्रकल्प समन्वयक लक्ष्मीकांत गर्जे आणि सुरेश सुरा यांनी यावेळी ई-ऑफीस प्रणालीमधील विविध घटक त्यांचे कामकाज कसे चालते याबाबत माहिती दिली.

कार्यालयात चालणारे कागदोपत्री कामकाज सोप्यारितीने आणि जलदगतीने होण्याकरीता आयुक्त मंगेश चितळे यांनी ई-ऑफिस सॉपटवेअर प्रणाली महापालिकेत राबविली जावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार सदर प्रणाली येत्या १० दिवसात या कार्यप्रणालीची प्रत्यक्षात सुरुवात महापालिकेत केली जाणार आहे.

ई-ऑफीस प्रणालीमुळे कार्यालयात येणाऱ्या कागदपत्रांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. यामुळे कागदपत्रे, फाईल गहाळ होण्याची समस्या उद्‌भवणार नाही. कार्यालयातील फाईल्स डिजीटल स्वरुपात झाल्यास कामकाज जलदरित्या होण्यास मदत होणार आहे. या अनुषंगाने एनआयसी या संस्थेस संबंधित प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी नियुक्त करण्यात आले असून यावेळी प्राथमिक स्तरावर महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ई-ऑफीस कार्यप्रणालीची  प्रत्यक्षात सुरुवात झाल्यावर महापालिकेतील प्रत्येक विभागांना याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महापालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सदर प्रणाली बंधनकारक असून नागरिकांसाठी देखील ती लाभदायक ठरणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मालमत्ता कर विभागात आता गुणवत्ताधारक अनुभवी कर्मचाऱ्यांची निवड